Home / महाराष्ट्र / Nagpur Crime : खळबळजनक! नागपुरात नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवून ३ किमी फरफटत नेले; वाळू माफियांनी ओलांडली क्रूरतेची सीमा!

Nagpur Crime : खळबळजनक! नागपुरात नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवून ३ किमी फरफटत नेले; वाळू माफियांनी ओलांडली क्रूरतेची सीमा!

Nagpur Crime : नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यात अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर मुरूम माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना...

By: Team Navakal
Nagpur Crime  :
Social + WhatsApp CTA

Nagpur Crime  : नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यात अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर मुरूम माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्तव्य बजावणाऱ्या नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवून तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा प्रकार घडल्याने, जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना आणि थरार-
मिळालेल्या माहितीनुसार, कुही तालुक्यातील एका परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी महसूल पथकासह संबंधित ठिकाणी धाड टाकली. पथकाला पाहताच अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांनी आक्रमक पवित्रा धारण केला. कारवाईत अडथळा आणण्यासाठी एका ट्रॅक्टर चालकाने थेट निकाळजे यांच्या अंगावर वाहन चढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत बाजूला उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या गोंधळाचा फायदा घेत ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

जेसीबीला लटकवून तीन किलोमीटर नेले-
त्यानंतर महसूल पथकाने घटनास्थळावरील जेसीबी यंत्र जप्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेसीबी चालकाने वाहन न थांबवता ते वेगाने पळवण्यास सुरुवात केली. वाहन रोखण्यासाठी निकाळजे यांनी जेसीबीवर चढण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने त्यांना लटकलेल्या अवस्थेतच वाहन पळवले. सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत त्यांना अशाच जीवघेण्या स्थितीत नेण्यात आले. या झटापटीत नायब तहसीलदारांचा शर्ट फाटला असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून कुही पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित जेसीबी चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात-
या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, “ज्या राज्यात खुद्द महसूल अधिकाऱ्यांवर भरदिवसा हल्ले होतात आणि तहसीलदाराला जेसीबीला लटकवून नेण्याची गुंडांची हिंमत होते, तिथे सामान्य जनता सुरक्षित कशी असेल? प्रशासनच जर गुंडांच्या धाकाखाली वावरत असेल, तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची?” राज्यात सध्या संविधानाचे नव्हे, तर माफियांचे राज्य सुरू आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या