Tamil Nadu : तामिळनाडू निवडणुकीत सर्वाधिक 108 जागा जिंकूनही टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांचा सत्तास्थापनेचा दावा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज सलग दुसर्या दिवशी फेटाळला. टीव्हीके पक्षाला काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना आणखी पाच आमदारांची गरज आहे. यावर बोट ठेवून आधी 118 आमदारांच्या सह्या घेऊन या, त्यानंतरच शपथ घ्या, अशी आडमुठी भूमिका राज्यपालांनी घेतली. त्यामुळे आज होणारा विजय यांचा शपथविधीही रद्द करण्यात आला. यावरून लोकभवनाच्या आडून भाजपा राजकारण करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, फोडाफोडीच्या भीतीने अण्णा द्रमुकने आपल्या आमदारांना पुद्दुचेरीच्या रिसॉर्टमध्ये पाठवले आहे. त्यामुळे तामिळनाडूतील सत्ताकारण आता काय नवे वळण घेते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
तामिळनाडूत राज्यपाल विरुद्ध राज्यकर्ते या संघर्षाचा दुसरा अंक पाहायला मिळत आहे. विजय यांनी काल 113 आमदारांचे पत्र घेऊन लोकभवनात राज्यपाल आर्लेकर यांची भेट घेतली होती. यावेळी राज्यपालांनी बहुमतासाठीचे 118 चे संख्याबळ नसल्याचे सांगून त्यांना परत पाठवले होते. आज विजय यांनी पुन्हा राजभवनात जाऊन त्यांची भेट घेतली. परंतु आजही राज्यपालांनी टीव्हीकेकडे अद्याप आवश्यक संख्याबळ नसल्याचे सांगत बहुमताचा लेखी पाठिंबा सादर करण्यास सांगितले. राज्यपाल यांनी नमूद केले की, 118 आमदारांच्या सह्या घेऊन या आणि टीव्हीकेकडे बहुमत असल्याचे सिद्ध करा. त्यानंतरच शपथविधी होऊ शकतो. सरकार स्थापन झाल्यानंतर ते कोसळू नये, यासाठी लेखी समर्थन आवश्यक आहे.
दरम्यान, दुसर्या कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले जाणार नसल्याचे आश्वासन राज्यपालांनी विजय यांना दिले आहे. मात्र भाजपा तामिळनाडूच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दलित नेते तिरुमावलवन यांनी, राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी आणि नंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करू द्यावे, अशी मागणी केली आहे. तामिळनाडूतील कम्युनिस्ट पक्षानेही राज्यपालांनी संविधानानुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. शपथविधीपूर्वी बहुमत सिद्ध करण्यास सांगणे अयोग्य असल्याचे पक्षाने म्हटले आहे. काँग्रेसनेही अशी प्रतिक्रिया दिली आहे की, तमिळ जनतेने स्पष्ट आणि ठोस बहुमत दिले असताना राज्यपाल अडवणूक करत आहेत. तर मक्कल निधि मय्यम पक्कषाचे प्रमुख, सिनेअभिनेते कमल हसन यांनी अशी एक्स पोस्ट केली आहे की, विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके या पक्षाने 108 जागांवर विजय मिळवला आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित न करणे, हे तामिळनाडूच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करण्यासारखे ठरेल. 233 निवडून आलेले सदस्य अद्यापि पदाची शपथ घेऊ शकलेले नाहीत. हा राज्याचा अपमान आहे, हा लोकशाहीला धक्का आहे. विजय हे जिंकलेल्या दोन जागांपैकी एक जागा रिक्त करणार असल्याने विधानसभेतील टीव्हीकेची संख्या आणखी एकने कमी होऊन 107 होणार आहे.
काँग्रेसच्या 5 आमदारांचा पाठिंबा धरून एकूण संख्या सध्या 112 होणार असल्याने बहुमतासाठी टीव्हीकेला आणखी सहा आमदारांची गरज आहे. यासाठी टीव्हीकेला अण्णा द्रमुक किंवा द्रमुक यांचा पाठिंबा घेण्याशिवाय गत्यंतर नाही. अण्णा द्रमुकच्या 20 हून अधिक आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा द्यावा, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. मात्र, अण्णा द्रमुकने याचा इन्कार केला आहे. मात्र, आज अण्णा द्रमुकने फोडाफोडीच्या भीतीने आपल्या 25 आमदारांना पुद्दुचेरीच्या रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. अण्णा द्रमुक आणि द्रमुक यांनी एकत्र येऊन सत्तास्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, अधिकृतरित्या यावर दोन्ही पक्षांनी काही भाष्य केले नाही.
विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 9 मे रोजी संपत असल्याने राज्यपालांकडे निर्णय घेण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, भारतीय संविधानातील कलम 164(1) नुसार राज्यपालांना मुख्यमंत्री नेमण्याचा अधिकार आहे. त्रिशंकू विधानसभेच्या परिस्थितीत योग्य उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्यही राज्यपालांना दिले गेले आहे. यापूर्वी अनेक राज्यांमध्ये सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला अल्पमत सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्यात आलेले आहे.
दरम्यान, तामिळनाडूमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेंबू यांनी केली आहे. वेंबू यांनी सोशल मीडियावर म्हटले की, सध्याचे आकडे जुळताना दिसत नाहीत. कशीही जुळवाजुळवी करून स्थापन केलेले सरकार स्थिर राहण्याची शक्यता कमी आहे. पुन्हा निवडणुका झाल्यास टीव्हीकेलाच बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपाने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी.
विजय यांच्या 300 कोटींच्या
एफडीची सोशल मीडियावर चर्चा
अभिनेता-राजकारणी विजय यांच्या निवडणुकीतील यशानंतर आता त्यांच्या मालमत्तेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः त्यांच्या जवळपास 313 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) चर्चेचा विषय ठरल्या आहेत. एक्सवरील अनेक युजरनी विजय यांच्या गुंतवणुकीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, विजय जोखीम टाळणारे गुंतवणूकदार दिसतात. मात्र त्यांना योग्य आर्थिक सल्ला मिळालेला नसावा. विजय यांनी मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या उच्च लाभांश देणार्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. आणखी एका युजरने, अशा खराब गुंतवणुकीचा सल्ला त्यांना कोणी दिली? असा सवाल उपस्थित केला.










