Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर शुक्रवारी (८ मे) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील रोमहर्षक सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते. मात्र, त्यांचे हे आगमन केवळ सामन्यापुरते मर्यादित नसून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यावेळी गंभीर यांच्यासोबत निवड समितीचे सदस्य आणि माजी वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग तसेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची विशेष उपस्थिती होती.
मैदानावर निवडकर्त्यांशी दीर्घ चर्चा
सामन्यादरम्यान गौतम गंभीर आणि आर.पी. सिंग यांच्यात बराच वेळ गंभीर विषयांवर चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. आयपीएल २०२६ च्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आगामी आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी संघ निवडताना कोणत्या उदयोन्मुख खेळाडूंना संधी द्यावी, याबाबत मुख्य प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांमध्ये प्राथमिक खलबतं झाल्याचे बोलले जात आहे. गंभीर तब्बल दोन वर्षांनंतर आयपीएलचा सामना पाहण्यासाठी प्रत्यक्ष मैदानावर अवतरल्यामुळे चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.
गंभीरसाठी दोन्ही संघांचे भावनिक नाते
ज्या दोन संघांमध्ये हा सामना रंगला, त्या दोन्ही संघांशी गौतम गंभीरचे जुने आणि जवळचे नाते आहे. गंभीरच्याच यशस्वी नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. तसेच, २०२४ मध्ये मेंटॉर म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले. दुसरीकडे, गंभीरने आपल्या आयपीएल कारकिर्दीचा आरंभ आणि अंतही दिल्लीच्याच संघाकडून खेळताना केला होता. त्यामुळे या दोन्ही संघांच्या कामगिरीवर त्यांचे विशेष लक्ष होते.
कर्णधारपदाच्या शर्यतीत नवे ट्विस्ट: सूर्याच्या जागी संजू सॅमसन?
सर्वात मोठी चर्चा भारतीय टी-२० संघाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत सुरू आहे. रोहित शर्माने २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर निवृत्ती घेतल्यावर सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने यंदाचा टी-२० विश्वचषक जिंकून मोठा पराक्रम केला असून, त्याची विजयाची टक्केवारी ही धोनी, कोहली आणि रोहित यांच्यापेक्षाही अधिक आहे. मात्र, भविष्यातील दीर्घकालीन रणनीती आखण्यासाठी बीसीसीआय नवीन कर्णधाराचा विचार करत असल्याची कुजबुज सुरू आहे.
यापूर्वी श्रेयस अय्यरच्या नावाची जोरदार चर्चा होती, मात्र आता प्राप्त माहितीनुसार संजू सॅमसन हे नाव टी-२० कर्णधारपदासाठी आघाडीवर असल्याचे समजते. आयपीएलमधील त्याचे नेतृत्व आणि सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे निवड समिती त्याच्या नावाचा गांभीर्याने विचार करत असल्याचे वृत्त आहे.












