AIMIM Matin Patel : नाशिकमधील ‘टीजीएस’ धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान हिला कायदेशीर कचाट्यातून वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या मतीन पटेल यांच्याभोवती आता प्रशासनाचा फास आवळला गेला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मतीन पटेल यांच्या अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाईचा बडगा उगारला असून, त्यांच्या नगरसेवक पदावरही गदा येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
बेकायदेशीर बांधकामांना महापालिकेचा दणका-
पोलीस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, निदा खान गेल्या चाळीस दिवसांपासून फरार असताना मतीन पटेल यांनी तिला आपल्या नारेगाव येथील कौसर पार्क परिसरातील नवीन फ्लॅटमध्ये लपवून ठेवले होते. या घटनेनंतर महापालिकेने केलेल्या चौकशीत मतीन पटेल यांची घरे आणि कार्यालय बेकायदेशीर अतिक्रमणावर उभी असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने त्यांच्या तीन मालमत्तांना नोटीस बजावली आहे:
१. ज्या घरात निदा खान लपलेली होती, तो कौसर पार्क येथील फ्लॅट.
२. नारेगाव परिसरातील त्यांचे मूळ निवासस्थान.
३. नारेगाव येथील त्यांचे व्यावसायिक कार्यालय.
महानगरपालिकेने या सर्व बांधकामांवर नोटिसा चिकटवल्या असून, पुढील तीन दिवसांत समाधानकारक खुलासा न झाल्यास ही बांधकामे बुलडोझर लावून जमीनदोस्त केली जातील, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू-
केवळ मालमत्तांवरच नव्हे, तर मतीन पटेल यांच्या राजकीय कारकीर्दीवरही संकट ओढवले आहे. ‘महाराष्ट्र महानगरपालिका कायदा कलम १०-१ ड’ नुसार, अनधिकृत बांधकाम किंवा गंभीर गुन्ह्यातील सहभाग या कारणावरून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महापौर समीर राजूरकर यांनी दिली आहे. मतीन पटेल यांनी गुन्हेगाराला आश्रय देऊन कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून असलेले पद संपुष्टात आणण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.
कोण आहेत मतीन पटेल?
मतीन पटेल हे छत्रपती संभाजीनगरमधील भूखंड विकास (प्लॉटिंग) व्यवसायाशी संबंधित असून गेल्या दशकापासून एमआयएम पक्षात सक्रिय आहेत. माजी खासदार इम्तियाज जलील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मतीन पटेल आणि त्यांची बहीण प्रभाग क्रमांक ९ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र, यापूर्वीही एका आक्षेपार्ह चित्रफितीमुळे (व्हिडिओ) ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
तपासाची चक्रे गतिमान-
नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांचा मोबाईल जप्त केला असून त्यांच्या तांत्रिक संभाषणाची तपासणी सुरू आहे. निदा खान गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्या थेट संपर्कात होती आणि तिला लपवण्यासाठी त्यांनी पूर्ण रसद पुरवल्याचे उघड झाले आहे.










