Home / News / NEET Paper Leak; Exam Cancelled ! Students Protest Across India : पेपरफुटीच्या आरोपामुळे यंदाची नीट परीक्षा रद्द! देशभरातील विद्यार्थी संतापले ! सीबीआय चौकशी करणार

NEET Paper Leak; Exam Cancelled ! Students Protest Across India : पेपरफुटीच्या आरोपामुळे यंदाची नीट परीक्षा रद्द! देशभरातील विद्यार्थी संतापले ! सीबीआय चौकशी करणार

NEET Paper Leak; Exam Cancelled ! Students Protest Across India – वैद्यकीय प्रवेशांसाठी 3 मे रोजी घेतल्या गेलेल्या नीट परीक्षेचा...

By: Team Navakal
NEET Paper Leak; Exam Cancelled ! Students Protest Across India
Social + WhatsApp CTA


NEET Paper Leak; Exam Cancelled ! Students Protest Across India – वैद्यकीय प्रवेशांसाठी 3 मे रोजी घेतल्या गेलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटला होता हे उघड झाल्याने आज ही परीक्षाच रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. ही माहिती येताच नीटची परीक्षा दिलेले देशभरातील लाखो विद्यार्थी संतापले. दिल्लीत काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचाच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.


ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. लवकरच या परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात येईल. या प्रकरणाची सीबीआय चौकशीही होईल, असे ही परीक्षा घेणार्‍या एनटीएने(नॅशनल टेस्टिंग एजन्सी) केली आहे. 2024 मध्येही नीट परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडला होता. मात्र चौकशीनंतर पेपरफुटीचा प्रकार देशव्यापी नव्हता, असा निष्कर्ष काढण्यात आला. कुणावरही कारवाई झाली नाही. मात्र यावर्षी पेपरफुटी झाली आणि परिणामी परीक्षा रद्द करण्याची वेळ आली.


रद्द झालेली ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार असून नवीन तारखा आणि प्रवेशपत्रांबाबतची माहिती लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. मे 2026 सत्रासाठी केलेली नोंदणी आणि निवडलेली परीक्षा केंद्र फेरपरीक्षेसाठी कायम राहणार आहेत. कोणतीही नवीन नोंदणी किंवा अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. फेरपरीक्षेचा खर्च एनटीए उचलणार आहे. मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि संभ्रम निर्माण झाला आहे. वर्षभर कठोर मेहनत करून परीक्षा दिल्यानंतर अचानक ती रद्द झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे.

Nashik Neet Paper Leak
Nashik Neet Paper Leak

काही विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर आपल्या गावी परतले होते, तर काही सुट्टीसाठी बाहेर गेले होते. मात्र फेरपरीक्षेच्या अनिश्चिततेमुळे पुढील नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयूआय) च्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. शास्त्री भवन परिसरात घोषणाबाजी करत त्यांनी निषेध व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखर म्हणाले की, ज्यांनी अत्यंत जिद्दीने आणि प्रामाणिकपणे नीट परीक्षेची तयारी केली, त्यांच्या भवितव्याशी खेळ केला आहे. या प्रकरणातील दोषींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. कटात सहभागी प्रत्येकाला कडक शिक्षा मिळाली पाहिजे. या प्रकरणात सरकार आणि प्रशासनातील काही व्यक्तींचाही सहभाग असू शकतो. सरकारने, विशेषतः धर्मेंद्र प्रधान यांनी, या अपयशाची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) वर बंदी घालण्यात यावी.


3 मे रोजी झालेल्या यंदाच्या नीट परीक्षेला देशभरातून 22.79 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मात्र परीक्षेनंतर लगेचच पेपरफुटीचे प्रकरण उघड झाल्याने विद्यार्थी, पालक आणि कोचिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. गेस पेपरच्या माध्यमातून या परीक्षेचा लीक झाल्याचा आरोप झाला होता. आधीच विद्यार्थ्यांमध्ये फिरत असलेल्या 410 प्रश्नांच्या गेस (अपेक्षित) पेपरमधील सुमारे 120 प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेच्या पेपरात होते. तपासात असेही उघड झाले की, प्रश्नपत्रिकेतील तब्बल 600 गुणांचे प्रश्न दोन दिवस आधीच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले होते. एनटीएने 8 मे रोजी या प्रकरणाची माहिती स्वतंत्र पडताळणीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडे पाठवली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.


या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. राजस्थानच्या विशेष कार्यवाही पथकाने डेहराडून, सीकर आणि झुंझुनू येथून संशयितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणात कोचिंग संस्थेशी संबंधित एका समुपदेशकाचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे केरळमधील एका एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने 1 मे रोजी सीकरमधील मित्राला गेस पेपर पाठवल्याची माहिती आहे. या प्रकरणात जयपूरमधून ‘मनीष’ नावाच्या संशयिताला अटक केली आहे. तो पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त आहे. त्याने प्रश्नपत्रिका छापण्यापूर्वीच संभाव्य प्रश्नांची माहिती मिळवली होती, अशी माहिती आहे. फुटलेल्या पेपरची पहिली प्रत नाशिकमध्ये तयार झाली होती.

त्यानंतर ती हरियाणामार्गे इतर राज्यांमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. नाशिक पोलिसांनी एका 30 वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याने हा पेपर 15 लाख रुपयांत पेपर विकल्याचा आरोप आहे. याबाबत नाशिक पोलीस उपयुक्त किरण चव्हाण म्हणाले की, आज सकाळी राजस्थान पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करण्याची विनंती केली होती. त्यानंतर कारवाई करत आम्ही एका 30 वर्षीय तरुणाला अटक केली. आता त्याचा ताबा राजस्थान पोलीस घेणार आहेत.


लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, नीट 2026 परीक्षा रद्द झाल्याने 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने या भ्रष्ट भाजपाई व्यवस्थेने चिरडली आहेत. काहींच्या वडिलांनी कर्ज घेतले, आईने दागिने विकले, लाखो विद्यार्थ्यांनी रात्रभर जागून अभ्यास केला पण त्यांच्या वाट्याला केवळ पेपरफुटी, सरकारी दुर्लक्ष आणि शिक्षण क्षेत्रातील संघटित भ्रष्टाचार आला. हे केवळ अपयश नाही, तर युवकांच्या भवितव्याशी केलेला गुन्हा आहे. जर एखाद्याचे नशीब मेहनतीने नव्हे, तर पैसा आणि प्रभावाने ठरत असेल, तर शिक्षणाला अर्थ तरी काय उरेल? पंतप्रधानांचा तथाकथित ‘अमृतकाळ’ देशासाठी ‘विषकाळ’ बनला आहे.


काँग्रेसने आरोप केला की, नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली. पेपर रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांत 89 पेक्षा अधिक पेपर फुटीच्या घटना घडल्या आहेत. पेपर फुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकार हीच आता भाजपा सरकारची ओळख बनली आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने तुटतात, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. मात्र त्यांची वेदना भाजपा नेत्यांना दिसत नाही, कारण त्यांच्या मुलांचे शिक्षण परदेशात सुरू आहे. आपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल म्हणाले की, या देशात नेमके काय चालले आहे? जे लोक एक परीक्षा नीट घेऊ शकत नाहीत, ते सरकार कसे चालवणार? लाखो मुलांच्या आयुष्याशी हे सरकारचा खेळ चालला आहे. ही सरकार फक्त ‘जनआंदोलन’ची भाषा समजते आणि मी या
विद्यार्थ्यांसोबत आहे.


शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही एक्स पोस्ट करून म्हटले की, पेपर लीक झाल्याने नीट परीक्षा रद्द करून चौकशीचे आदेश दिल्याबद्दल एनटीएचे आभार. परंतु पेपर फुटीनंतर जाग्या होणार्‍या यंत्रणा अगोदर नेमके काय करतात? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. परीक्षा रद्द झाल्यावर विद्यार्थ्यांना पालकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता गैरप्रकार होणार नाहीत याची अगोदरच काळजी का घेतली जात नाही?

आठ वर्षांत 16 वेळा परीक्षा रद्द


देशातील प्रमुख प्रवेश परीक्षा घेणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) 2018 मध्ये स्थापन केली. शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली ही संस्था देशातील प्रवेश परीक्षा अधिक पारदर्शक आणि एकसमान पद्धतीने घेण्यासाठी स्थापन करण्यात आली. मात्र गेल्या आठ वर्षांत 16 वेळा परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलावी लागली आहे, अशी माहिती केंद्र सरकारनेच लोकसभेत दिली होती.

कोविड काळात जेईई मेन 2020, नीट-यूजी 2020, जेईई मेन 2021 आणि नीट-यूजी 2021 या परीक्षांना फटका बसला. त्याचप्रमाणे सीएसआयआर-यूजीसी नेट 2020, यूजीसी-नेट डिसेंबर 2020, यूजीसी-नेट मे 2021 आणि आयसीएआर एआयईईए 2020 या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. डीयूईटी 2020 ही परीक्षा नोंदणीतील अडचणींमुळे स्थगित करण्यात आली, तर सीमॅट 2021 परीक्षा पॅटर्नमधील बदलांमुळे पुढे ढकलली. याशिवाय एआयएपीजीईटी 2021 आणि जिपमॅट 2021 या परीक्षा कोविडमुळे, आयजीएनओयू पीएचडी प्रवेश परीक्षा 2022 प्रशासकीय कारणांमुळे व जीएटी-बी 2023 परीक्षा तांत्रिक कारणांसाठी स्थगित झाली. 2024 मध्ये एनसीईटी परीक्षा तांत्रिक कारणांमुळे आणि सीएसआयआर-नेट परीक्षा लॉजिस्टिक कारणांमुळे पुढे ढकलावी लागली.

2024 मध्येही पेपर लीक झाला होता


नीट यूजी 2024 परीक्षा पेपर फुटल्याच्या आरोपांमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. बिहारमध्ये प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार उघडकीस आला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात प्रश्नपत्रिका 30 ते 50 लाख रुपयांना विकल्या जात असल्याचे समोर आले. या प्रकरणात 13 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. निकालात 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाल्याने संशय अधिक गडद झाला.

या परीक्षेच्या निकालातील अनियमिततेच्या आरोपांमुळे मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले. 23 जुलै 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर महत्त्वाचा निर्णय देत देशव्यापी स्तरावर पेपर लीक झाल्याचे ठोस पुरावे नसल्याचे स्पष्ट केले. बिहारमधील काही ठिकाणी मर्यादित स्वरूपात पेपरफुटी झाल्याचे म्हणत न्यायालयाने संपूर्ण परीक्षा रद्द करण्यास नकार दिला.

अभिषेक सिंह कोण आहेत?


नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)चे नवनियुक्त महासंचालक अभिषेक सिंह हे यावर्षी एप्रिल महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या महिनाभरातच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. यापूर्वी ते कृत्रिम बुद्धिमत्ता या ‘इंडियाएआय’ मोहिमेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे महासंचालक आणि ‘मायगव्ह’चे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. डिजिटल प्रशासनातील अनुभव असलेल्या सिंह यांच्यावर परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान, इंडियाएआय परिषदेदरम्यान युनिट्री गो 2 या रोबोटिक कुत्र्याची निर्मिती इंडिया एआय कंपनीने केला असा दावा करण्यात आला. मात्र हे चिनी उत्पादन आहे हे लगेचच उघड झाल्याने मोठी नाचक्की झाली. या वादामुळेही त्यांचे नाव चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली.

Web Title:
संबंधित बातम्या