Sanatan Dharma Row: तमिळनाडूच्या राजकारणात ‘सनातन धर्मा’वरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. डीएमके नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सभागृहात पुन्हा एकदा ‘सनातन धर्म नष्ट’ करण्याबाबत विधान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी हे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले उदयनिधी स्टॅलिन?
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बोलताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, “लोकांमध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या सनातन धर्माचे उच्चाटन झालेच पाहिजे.” यापूर्वीही त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली होती, ज्यावरून त्यांच्यावर अनेक न्यायालयीन खटले दाखल झाले होते. मात्र, यावेळी त्यांनी हे विधान विधानसभेच्या आत केल्याने त्यांना कायद्याचे संरक्षण मिळण्याची शक्यता आहे.
घटनेचे संरक्षण आणि कायदेशीर पेच
भारतीय संविधानाच्या कलम 194 नुसार, लोकप्रतिनिधींना विधानसभेत केलेल्या भाषणाबद्दल विशेष संरक्षण आणि अधिकार (Immunity) मिळतात. यामुळे सभागृहातील त्यांच्या विधानांवर थेट न्यायालयीन कारवाई करता येत नाही. याच मुद्द्यावरून भाजपने स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमित मालवीय यांचा पलटवार
भाजपचे राष्ट्रीय निमंत्रक अमित मालवीय यांनी सोशल मीडियावरून स्टॅलिन यांच्यावर कडाडून टीका केली. “स्टॅलिन आता सभागृहाच्या विशेषाधिकारांमागे लपून कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेची चेष्टा करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी असे बोलण्याची हिंमत त्यांनी आता गमावली आहे, कारण जनतेने त्यांच्या पक्षाला आधीच विरोधी बाकांवर बसवले आहे,” असे मालवीय म्हणाले. तसेच, कोट्यवधी लोकांच्या धर्माला लक्ष्य करणे हे राजकीय धैर्य नसून अहंकार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री विजय यांची शांतता
विशेष म्हणजे, उदयनिधी स्टॅलिन यांनी हे विधान केले तेव्हा राज्याचे नवीन मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय सभागृहात उपस्थित होते. मात्र, स्टॅलिन यांच्या या वादग्रस्त विधानावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन पाळणे पसंत केले. दुसरीकडे, भाजप नेते विनोज पी. सेलवम यांनी टोला लगावला की, “स्टॅलिन यांच्या अशा विधानांमुळे सनातन धर्म नाही, तर डीएमके पक्षच तमिळनाडूतून हद्दपार झाला आहे.”
हे देखील वाचा – NEET-UG 2026 Re-exam Date: पेपरफुटीच्या आरोपानंतर NEET परीक्षा पुन्हा कधी होणार? NTA ने दिली माहिती










