Home / महाराष्ट्र / Rohit Pawar : तटकरे-पटेलांसह 22 आमदार भाजपात जाणार? एकनाथ शिंदे गटाचेही 18 फुटणार! रोहित पवारांचा बॉम्ब

Rohit Pawar : तटकरे-पटेलांसह 22 आमदार भाजपात जाणार? एकनाथ शिंदे गटाचेही 18 फुटणार! रोहित पवारांचा बॉम्ब

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून, पक्षातील गटबाजी शिगेला पोहोचली आहे. खासदार सुनील तटकरे...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून, पक्षातील गटबाजी शिगेला पोहोचली आहे. खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. याबाबतच पक्षातील वरिष्ठ नेत्यांची काल रात्री महत्त्वपूर्ण बैठक पार पडली ज्यामध्ये पार्थ पवार यांच्या कामकाजावर सखोल चर्चा करण्यात आली. ही चर्चा सुरू असतानाच रोहित पवार यांनी राजकीय बॉम्ब फोडला. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की, तटकरे, पटेल यांच्यासह त्यांचे 22 आमदार भाजपात प्रवेश करून 2029 ची निवडणूक भाजपाकडून लढवणार आहेत. शिंदेंचेही 18 आमदार फुटणार आहेत. सर्व तयारी झाली आहे.


आमदार रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे मिळून 40 आमदार भाजपात जाणार आहेत. ज्या गोष्टी ठरल्या आहेत, त्याविषयी मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. ते आत्ताच प्रवेश करणार की, नंतर इतका विषय आहे. आत्ता प्रवेश केला तर निवडणूक लागेल आणि शिंदे गटच त्यांना पराभूत करील. भाजपासोबत जे आहेत, त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही.
रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ उडाली. त्यावर प्रतिक्रिया देत शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की,  राज्यात अनेक भोंदूबाबा आणि भविष्य सांगणार्‍यांवर कारवाई झाली आहे. आता रोहित पवार भविष्य सांगण्याची जबाबदारी घेत असतील तर आम्हीही आमच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ.  सुनील तटकरे म्हणाले की,  रोहित पवार यांच्या मताला आम्ही कोणतीही किंमत देत नाही. त्यांच्या  दाव्यांना आधार नाही.

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनीही आक्रमक भूमिका घेत रोहित पवारांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून रोहित पवार सातत्याने खोटे दावे करत आहेत. प्रसिद्धीसाठी ते जनतेची दिशाभूल करत आहेत. बारामती पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा उमेदवार असावा असा हट्ट धरला होता. ते आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावे का? रोहित पवारच 2029 मध्ये काँग्रेसकडून बारामतीत उभे राहण्याची योजना करत आहेत. हे आम्हाला माहिती आहे, पण आम्ही ते बोलून दाखवत नाही. त्यांनी पक्षात कितीही चलबिचल करण्याचा प्रयत्न केला, तरी काही फरक पडणार नाही. आमच्या पक्षात सर्व काही सुरळीत सुरू आहे.  


पण दुसरीकडे राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष आता अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे आधी कार्यकारिणीत घेतली नव्हती, आता ती चूक सुधारली असे म्हणत नवे पत्र जारी केले. त्यात दोघांची नावे आहेत, पण त्यांना कोणतीही ठोस जबाबदारी देण्यात आलेली नाही. आता पुन्हा टायपिंग चूक झाली सांगत असले तरी वारंवार हे प्रकार घडत असल्याने नाराजीचीच चर्चा रंगली आहे. पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवरून पक्षात नाराजी वाढत असून, यामुळे वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद उघड झाले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर  त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला  पत्र लिहून 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत पक्षाकडून झालेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केली होती.

 या पत्रामुळे 16 फेब्रुवारी रोजी तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी आयोगाला पाठवलेले पत्र रद्द झाले. यानंतर 29 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणी यादीवरून वाद अधिकच चिघळला. या यादीत सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आला. पार्थ पवार यांना सरचिटणीस, तर जय पवार यांना राष्ट्रीय सचिव म्हणून स्थान देण्यात आले. पण पक्षाचे प्रमुख चेहरे मानले जाणारे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची नावे या यादीतून गायब होती. यावर स्पष्टीकरण देताना सुनेत्रा पवार यांनी ही केवळ तांत्रिक आणि क्लेरिकल चूक होती, असे सांगितले.  आता या दोघांची नावे आहेत ,पण त्यांना कोणतीही जबाबदारी दिलेली नाही.


अशात आसाम दौर्‍यावरून परतताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रवास टाळला. दोघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रवास केला. आसामहून परतल्यानंतर तटकरे यांनी उशिरा रात्री शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे तटकरे आणि इतर नाराज नेते काही वेगळा राजकीय निर्णय घेणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे, तटकरे यांना महासचिव पदाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका न मांडता मौन बाळगले. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे. अशा स्थितीत रोहित पवार यांनी केलेला गौप्यस्फोट आगीत तेल ओतणारा ठरला आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या