MPSC News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आपल्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयोगाच्या नवीन निर्णयानुसार, आता इथून पुढच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना देण्यात आलेले ‘ऑप्टिंग आऊट’ (Opting Out) आणि ‘संमती’ (Give Up / Accepted) हे दोन्ही पर्याय कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
MPSC News: नेमका बदल काय आहे?
यापूर्वी, निवड यादीत नाव आलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून स्वतःच्या इच्छेने बाहेर पडता येत होते, ज्याला ‘ऑप्टिंग आऊट’ म्हटले जायचे. मात्र, आयोगाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हा नियम बदलण्यात आला आहे.
- प्रतिक्षा यादी (Waitlist): एकल संवर्गाच्या भरतीसाठी प्रतिक्षा यादी पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. मात्र, बहुसंवर्गीय पदांच्या भरतीसाठी कोणतीही प्रतिक्षा यादी असणार नाही.
- पसंतीक्रम नियम: जर एखाद्या उमेदवाराला आधीच एखाद्या पदावर नियुक्ती मिळाली असेल आणि त्याने पुन्हा त्याच किंवा त्यापेक्षा खालच्या पदाचा पसंतीक्रम दिला, तर त्याच्या नावाचा विचार शिफारशीसाठी केला जाणार नाही.
आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी स्पष्ट केले की, हे नवीन नियम १३ मे २०२६ पासून तातडीने लागू झाले आहेत.
MPSC News: काँग्रेसच्या टीकेला एमपीएससीचे सडेतोड उत्तर
दुसरीकडे, महाराष्ट्र काँग्रेसने ‘गट ब पूर्व परीक्षा २०२६’ मधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून आयोगावर टीका केली होती. काँग्रेसच्या मते, एएसओ (ASO) आणि एसटीआय (STI) पदांसाठी एससी (SC) प्रवर्गाच्या जागा शून्य असल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
यावर आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे की, “आयोगाकडे शासनाकडून जे मागणीपत्र प्राप्त होते, त्यानुसारच जाहिरात प्रसिद्ध केली जाते. आरक्षणाचा सर्व तपशील हा शासनाच्या मागणीनुसार असतो. त्यामुळे आयोगाकडून उमेदवारांवर अन्याय होत असल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही.”
हे देखील वाचा- Pune Bomb Scare: पुण्यातील नामांकित रुग्णालयाबाहेर ‘बॉम्ब’ सापडल्याने खळबळ! ७ तासांचा टायमर अन् स्फोटके; पोलिसांनी काय माहिती दिली?








