Sharad Pawar : देशातील सद्यस्थिती, ढासळता रुपया आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धाचे सावट या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. सत्तेत बसलेल्या व्यक्तींनी केवळ परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यापेक्षा ते गांभीर्य आपल्या कृतीतून आणि भाषेतून दाखवून द्यावे, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना सुनावले आहे.
पंतप्रधानांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह-
शरद पवार म्हणाले की, देशापुढील आव्हाने पाहता सर्व नेत्यांची एकत्रित बैठक बोलावणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांतील अनुभव अत्यंत निराशाजनक आहे. “गेल्या ३-४ वर्षांत सर्वपक्षीय बैठका नक्कीच झाल्या, पण त्यातील एकाही बैठकीला पंतप्रधान स्वतः उपस्थित नव्हते. जर पंतप्रधान परिस्थिती गंभीर असल्याचे वारंवार सांगत असतील, तर त्यांनी तितक्याच गांभीर्याने सर्व पक्षांना विश्वासा घेऊन चर्चा करणे अपेक्षित आहे,” असे मत पवारांनी व्यक्त केले.
१७ गाड्यांचा ताफा आणि दिखाऊगिरीवर टीका-
प्रशासकीय खर्चात कपात करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांचाही पवारांनी समाचार घेतला. एका मंत्र्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, “कोणी मोटारसायकलवरून प्रवास करत आहे, तर कोणी चालत जात असल्याचे मी दूरदर्शनवर पाहत आहे. एका मंत्र्याने तर अभिमानाने सांगितले की त्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या १७ वरून ८ वर आणल्या आहेत. १७ गाड्यांचा ताफा असणे हेच मुळी धक्कादायक आहे. यावरून सत्ताधाऱ्यांचा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती उथळ आहे, हे स्पष्ट होते.”
राहुल गांधींबद्दलच्या अयोग्य भाषेचा निषेध-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संदर्भात वापरलेल्या शब्दांचा पवारांनी जाहीर निषेध केला. “राहुल गांधी हे संसदेतील विरोधी पक्षनेते आहेत. हे एक घटनात्मक आणि महत्त्वाचे पद असून ते जनतेच्या कौलातून आलेले आहे. अशा संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल बोलताना मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी आपल्या भाषेचा स्तर राखणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी वापरलेले शब्द अत्यंत अयोग्य आणि लोकशाहीच्या परंपरेला न शोभणारे आहेत,” असे पवार यांनी ठणकावून सांगितले.
निवडणूक संपली की गांभीर्य आठवते?
रुपयाचे मूल्य घसरणे आणि इराणमधील युद्धाचा परिणाम यावर भाष्य करताना पवारांनी केंद्र सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली. निवडणुका सुरू असताना सरकारला या आर्थिक संकटाचे गांभीर्य नव्हते का? जनतेमध्ये जागृती करण्यापेक्षा निवडणुका जिंकण्यावर भर दिला गेला आणि निकाल लागताच महागाई व आर्थिक प्रश्नांचे ओझे जनतेवर टाकण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
सोनं खरेदी आणि सरकारी विरोधाभास-
सरकारने नागरिकांना सोनं खरेदी न करण्याचा जो सल्ला दिला आहे, त्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, रुपयाचे मूल्य टिकवण्यासाठी घेतलेला हा निर्णय तांत्रिकदृष्ट्या चुकीचा नाही. मात्र, एका बाजूला जनतेला काटकसर करायला सांगायचे आणि दुसरीकडे पंतप्रधान स्वतः विमानांचा ताफा घेऊन शक्तिप्रदर्शन करायचे, हा विरोधाभास जनतेला समजतो. जर खरोखरच आर्थिक स्थिती बिकट असेल, तर ती सर्वच स्तरांवर आणि सरकारी खर्चातही दिसून आली पाहिजे, असे परखड मत त्यांनी मांडले.










