Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज थेट दुचाकीवरून विधान भवन गाठले. मुख्यमंत्री स्वतः ‘रॉयल एनफिल्ड ३५०’ ही दुचाकी चालवत विधानभवनात दाखल झाल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफादेखील यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचे कौतुक होण्याऐवजी आता त्यावरून ‘पीयुसी’ (PUC) आणि ‘एक्स्पायर्ड माल’ या शब्दांवरून मोठे राजकीय युद्ध पेटले आहे.
वर्षा गायकवाड यांचा ‘एक्स्पायर्ड’ वार-
काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या बुलेटची कागदपत्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करत खळबळ उडवून दिली. “काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख ‘एक्स्पायर्ड माल’ असा केला होता, मग आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः चालवलेली ही मुदतबाह्य पीयुसी असलेली दुचाकी चालते का?” असा बोचरा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी केवळ प्रसिद्धीच्या स्टंटसाठी ज्या वाहनाची निवड केली, त्याचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) कालबाह्य झाल्याचा दावा करत त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
भाजपचे सडेतोड प्रत्युत्तर आणि तांत्रिक स्पष्टीकरण-
काँग्रेसच्या या आरोपांवर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. “सदर वाहन हे पोलीस विभागाचे असून मुख्यमंत्री महोदय ते चालवणार असल्याने त्याची रीतसर सर्व्हिसिंग करण्यात आली होती. सध्या ‘वाहन’ प्रणालीचे सर्व्हर ९ ते १८ मे दरम्यान देखभालीसाठी बंद असल्याने ऑनलाइन नोंदणीत तांत्रिक अडचणी आहेत. मात्र, पोलिसांनी सदर वाहन पर्यावरणीय निकषांनुसार सक्षम असल्याचे प्रमाणपत्र आधीच मिळवले होते,” असे स्पष्टीकरण बन यांनी दिले आहे. काँग्रेस केवळ तांत्रिक त्रुटींचा आधार घेऊन स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
‘इधर-उधर की बात ना कर’-
भाजपने काँग्रेसला प्रतिसवाल केला आहे की, तांत्रिक बाबींवर चर्चा करण्याऐवजी काँग्रेसने आधी हे स्पष्ट करावे की ते पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला पाठिंबा देणार आहेत की नाही? “वर्षाताईंनी ट्विट करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहिली असती, तर त्यांची फजिती टळली असती,” असे म्हणत भाजपने या वादात आपली बाजू लावून धरली आहे.










