NEET Paper Leak : संपूर्ण देशात खळबळ माजवणाऱ्या ‘नीट’ (NEET UG) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सोमवारी एक अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. लातूरमधील सुप्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध शिक्षक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली आहे. मोटेगावकर यांची तब्बल ११ तास कसून चौकशी केल्यानंतर, त्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्याने सीबीआयने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या अटकेमुळे केवळ लातूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘डॉक्टर घडवणारी फॅक्टरी’ संशयाच्या भोवऱ्यात:
शिवराज मोटेगावकर यांनी २००३ साली ‘रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस’ (RCC) या नावाने आपल्या शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ लातूरमध्ये रोवली होती. अल्पावधीतच या संस्थेने ‘लातूर पॅटर्न’च्या यशात महत्त्वाचा वाटा उचलत आपले नाव महाराष्ट्रभर पोहोचवले. ‘आरसीसी’च्या विद्यार्थ्यांने वैद्यकीय (NEET) आणि अभियांत्रिकी (JEE) परीक्षांमध्ये सातत्याने मिळवलेले दैदिप्यमान यश, यामुळे ही संस्था ‘डॉक्टर आणि इंजिनिअर घडवणारी फॅक्टरी’ म्हणून नावारूपास आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संस्थेची वार्षिक आर्थिक उलाढाल १०० कोटी रुपयांहून अधिक आहे. पुणे, नाशिक, संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि अकोला अशा प्रमुख शहरांमध्ये या क्लासेसच्या शाखा विस्तारलेल्या असून, हजारो विद्यार्थी प्रचंड शुल्क भरून येथे प्रवेश घेतात.
मोटेगावकर यांचा शैक्षणिक प्रवास आणि सद्यस्थिती:
शिवराज मोटेगावकर हे स्वतः रसायनशास्त्र (Chemistry) विषयात सुवर्णपदक विजेते पदव्युत्तर पदवीधर (M.Sc. Gold Medalist) आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील SET/NET-JRF, GATE, DRDO, BARC आणि TIFR यांसारख्या अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दावा त्यांच्या संस्थेकडून वारंवार केला जातो. एका आदर्श शिक्षकाची प्रतिमा असलेल्या मोटेगावकर यांचा नीट पेपरफुटी सारख्या गैरप्रकारात सहभाग समोर आल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यापूर्वी लातूरमधीलच काही शिक्षकांवर या प्रकरणात कारवाई झाली होती, मात्र आता एका मोठ्या संस्थेच्या संस्थापकालाच अटक झाल्याने या घोटाळ्याची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे स्पष्ट होत आहे.
नेमके कोण आहेत प्रोफेसर शिवराज मोटेगावकर?
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका अत्यंत सामान्य आणि गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवराज मोटेगावकर यांनी शिक्षणाच्या जोरावर उभं केलेलं अवाढव्य साम्राज्य आज कायदेशीर पेचात अडकलं आहे. आपल्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान घरगुती शिकवणी (होम ट्युशन) देऊन स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलणाऱ्या मोटेगावकर यांनी लातूर आणि उमरगा येथील महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र, केमिस्ट्री विषयावरील पकड आणि शिकवण्याची हातोटी यामुळे त्यांनी ‘रेणुकाई कोचिंग क्लासेस’च्या माध्यमातून खासगी शिकवणी क्षेत्रात पाऊल ठेवले आणि पाहता पाहता ‘आरसीसी’ (RCC) हा एक मोठा ब्रँड महाराष्ट्रात विकसित केला.
आरसीसी पॅटर्न आणि डिजिटल क्रांतीचा प्रवास:
गेल्या २३ वर्षांपासून केमिस्ट्री विषयाचे मार्गदर्शन करणाऱ्या मोटेगावकर यांनी “सर्व विषय एकाच छताखाली” ही संकल्पना राबवून महाराष्ट्रातील पुणे, संभाजीनगर, नांदेड आणि लातूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये आरसीसीचे जाळे विणले. कोरोनाच्या काळात जेव्हा संपूर्ण शिक्षण क्षेत्र ठप्प होते, तेव्हा मोटेगावकर यांनी आपल्या तांत्रिक यंत्रणेचा वापर करून डिजिटल आणि ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश मिळवला. त्यांच्या आक्रमक जाहिरातबाजीमुळे आणि “नीट परीक्षेत आरसीसीचेच प्रश्न येतात” या दाव्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी आणि पालक या क्लासेसकडे आकर्षित झाले होते. मात्र, याच दाव्यांनी आता त्यांच्याभोवती संशयाचे जाळे विणले आहे.
नीट पेपरफुटीतील धक्कादायक खुलासे:
नीट २०२६ च्या परीक्षेत कथित ‘गेस पेपर’ (अंदाजित प्रश्नपत्रिका) जंतू तंतू जुळल्याने मोटेगावकर यांचे नाव चर्चेत आले होते. सीबीआयने केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मोटेगावकर यांचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीशी (NTA) संबंधित असलेल्या काही प्राध्यापकांशी आणि पी.व्ही. कुलकर्णी यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. मोटेगावकर यांनी परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका मिळवून त्या उत्तरांसह विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये पेपरफुटीशी संबंधित अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
सीबीआयची कारवाई आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायदा:
सीबीआयने मोटेगावकर यांच्या मोबाईलमधील डेटा, व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सची कसून तपासणी सुरू केली आहे. त्यांच्या कुटुंबाला दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) अटक करण्यात आली आहे.










