Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह आणि कुरघोडीचे राजकारण आता अधिकच तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी नुकताच एक दावा केला होता की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे २२ हून अधिक आमदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. रोहित पवारांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्यावर तीव्र शब्दांत पलटवार केला असून अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
रोहित पवारांच्या ‘भविष्यवाणी’वर खोचक टीका-
सुनील शेळके यांनी रोहित पवारांना टोला लगावताना म्हटले की, “रोहित पवार ज्या पद्धतीने सातत्याने भविष्यवाणी करत आहेत, कोणाला पदे मिळणार आणि कोणाची पदे जाणार हे सांगत आहेत, ते पाहता त्यांना आता आमच्या पक्षाचे ‘राष्ट्रीय प्रवक्ते’ केले पाहिजे.” राजकीय विधाने करताना रोहित पवारांनी तारतम्य बाळगावे आणि तथ्यहीन विधाने थांबवावीत, असा सल्लाही शेळके यांनी दिला.
२०२२ मधील सत्तासंघर्षाचा गौप्यस्फोट-
रोहित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या दाव्यावर उत्तर देताना शेळके यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, २०१९ मध्ये मी स्वतः भाजप सोडून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत आलो. मात्र, २०२२ मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, तेव्हा सत्तेत सहभागी होण्यासाठी अजित पवारांकडे आग्रह धरणाऱ्यांमध्ये रोहित पवार हेच पहिल्या क्रमांकावर होते. “भाजपसोबत जाण्यासाठी कोणाची किती ओढ होती आणि कोण रांगेत अग्रस्थानी होते, हे मला वेगळे सांगण्याची गरज नाही,” असे म्हणत त्यांनी रोहित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचे समर्थन-
पक्षांतर्गत नेतृत्वावर भाष्य करताना सुनील शेळके यांनी सुनेत्रा पवार यांचे समर्थन केले. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या खऱ्या उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच आहेत. त्या सध्या उपमुख्यमंत्री पदाची आणि पक्षाची जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. विरोधी गटातील मंडळींनी जाणीवपूर्वक त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच पक्षातील सर्व नेते आणि पदाधिकारी सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘कर्जत-जामखेड सोडून बारामतीवर डोळा’-
सुनील शेळके यांनी रोहित पवारांच्या आगामी राजकीय रणनीतीवरही निशाणा साधला. रोहित पवार आपल्या स्वतःच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात फिरकत नाहीत, असा आरोप करत शेळके म्हणाले की, “रोहित पवार आता बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत आणि ती ही काँग्रेसच्या तिकिटावर. यासाठीच ते आतापासूनच रणनीती आखत असून सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत.”










