Home / महाराष्ट्र / Heat Wave : विदर्भात आज उन्हाचा ‘रुद्रावतार’! घराबाहेर पडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा; ‘या’ चार जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘ऑरेंज अलर्ट’!

Heat Wave : विदर्भात आज उन्हाचा ‘रुद्रावतार’! घराबाहेर पडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा; ‘या’ चार जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘ऑरेंज अलर्ट’!

Heat Wave : विदर्भ सध्या भीषण उन्हाच्या तडाख्याने होरपळत असून उष्णतेच्या लाटेने रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून...

By: Team Navakal
Heat Wave
Social + WhatsApp CTA

Heat Wave : विदर्भ सध्या भीषण उन्हाच्या तडाख्याने होरपळत असून उष्णतेच्या लाटेने रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून, विदर्भातील अनेक जिल्ह्यांनी उष्णतेचे जुने विक्रम मोडीत काढले आहेत. काल, १८ मे रोजी वर्धा जिल्ह्यामध्ये ४६.५ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी कमाल तापमानाची नोंद झाली असून, हे शहर सध्या देशातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरले आहे.

पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’; पारा ४७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
वाढत्या उष्म्याची तीव्रता लक्षात घेता, नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी २१ मे पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत विदर्भातील काही भागांत तापमान ४७ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

विदर्भातील प्रमुख शहरांमधील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये):
१. वर्धा: ४६.५
२. अमरावती: ४६.४
३. अकोला: ४६.३
४. यवतमाळ: ४५.४
५. नागपूर: ४४.४
६. वाशिम: ४४.०
७. चंद्रपूर व गोंदिया: ४३.८
८. बुलढाणा व गडचिरोली: ४३.६

प्रशासनाकडून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन-
तीव्र उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दुपारी १२ ते ३ या वेळेत काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी, ताक, लिंबूपाणी आणि ओआरएस (ORS) यांसारख्या पेयांचे सेवन करावे. बाहेर पडताना हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत, जेणेकरून उष्मघाताचा धोका कमी होईल.

मान्सूनची सुखद वार्ता: अंदमान-निकोबारमध्ये आगमन-
एकीकडे विदर्भ उन्हाने पोळत असतानाच, दुसरीकडे बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, २०२६ चा नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) भारताच्या दिशेने वेगाने सरकत आहे. १८ मे रोजी मान्सूनने अंदमान आणि निकोबार बेटांच्या बहुतांश भागांत यशस्वीपणे प्रवेश केला आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आग्नेय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या अनेक भागांत आपली व्याप्ती वाढवली आहे. मान्सूनची ही प्रगती वेळेपूर्वी आणि समाधानकारक असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या