Petrol & diesel prices increased 4th time within 10 days – इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत आजपासून पुन्हा वाढ केली आहे. दहा दिवसांतील ही चौथी दरवाढ आहे. आजपासून पेट्रोल प्रति लीटर 2.72 रुपयांनी तर डिझेल प्रति लीटर 2.81 रुपयांनी महागले आहे. त्यामुळे महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक जबर झटका बसला आहे. मात्र तेल कंपन्यांना यातून चांगले दिवस आले असून, त्यांचा नफा 103 टक्के झाला आहे. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत सरकारने एकदाही दरवाढ केली नव्हती. परंतु निवडणुका संपताच सरकारने दरवाढीचा सपाटा लावला आहे.
सरकारने आज लागू केलेली दरवाढ ही एप्रिल 2022 नंतरची सर्वात मोठी दरवाढ ठरली आहे. एप्रिल 2022 पासून देशात इंधनाचे दर जवळपास स्थिर होते. मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने मतदारांना खूश करण्यासाठी पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त केले होते. 15 मे रोजी तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसह पाच राज्यांमधील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर त्याच दिवशी 15 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात अचानक 3 रुपयांची वाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांना पहिला झटका दिला. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत 19 मे रोजी पुन्हा पेट्रोलची 87, तर डिझेलची 91 पैशांची वाढ केली. तिसऱ्यांदा 23 मे रोजी पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग झाले होते.
इंधन दरवाढीवरून आज काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट करून पंतप्रधान मोदींवर पुन्हा निशाणा साधला. 15 मेपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कशी वाढ होत गेली याचा तपशील राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये देत म्हटले की, महंगाई मानव मोदींनी पुन्हा हल्ला केला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर टप्प्याटप्प्याने वाढवले जात आहेत, जेणेकरून लपूनछपून खिसा कापला जावा. मी अनेक महिन्यांपासून देशात आर्थिक संकट येण्याचा इशारा देत आहे. पण, पंतप्रधान मोदी निवडणुकांमध्ये मग्न होते. निवडणुका संपताच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एकूण 8 रुपयांनी वाढ करण्यात आली. यापुढेही इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणुकांमध्ये आश्वासने द्यायची आणि उर्वरित काळात जनतेच्या खिशावर वार करायचा, हेच मोदी सरकारचे एकमेव काम आहे.
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही सरकारवर टीका करत म्हटले की, गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात साडेसात ते आठ रुपयांनी वाढ झाली आहे. रशिया आणि इराण आम्हाला स्वस्तात आणि पुरेसे तेल विकायला तयार आहेत, पण आपण त्यांच्याकडून खरेदी का करत नाही? मोदींची अशी काय मजबुरी आहे?
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी सोशल मीडियावर आकडेवारीच देत म्हटले की, तीन सरकारी तेल कंपन्यांनी 2025-26 मध्ये एकूण 77,280.65 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. ही मागील वर्षाच्या तुलनेत 130 टक्के वाढ आहे. जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान, जेव्हा इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे जग संकटात होते, तेव्हादेखील या कंपन्यांनी 19,470 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. ही मागील वर्षाच्या तुलनेत 40 टक्क्यांची वाढ आहे. कंपन्या इतका नफा कमावत असताना, दररोज गुपचूप किमती का वाढवल्या जात आहेत?
काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते विजय वडेट्टीवार यांनी मोदींच्या धोरणामुळे देशात कोरोना काळापेक्षा वीसपट वाईट परिस्थिती निर्माण होणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, सध्याची इंधन टंचाई कृत्रिम नाही. काल अमेरिकेने असा फतवा काढला आहे की, भारताने इराण व रशियाकडून तेल खरेदी करू नये. अमेरिकेचे तेल कितीही महाग असले तरी तेच तेल भारताने खरेदी केले पाहिजे. त्यामुळे ही टंचाई कृत्रिम नाही. ती निर्माण होण्यास सरकार जबाबदार आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल – डिझेल मिळत नाही. ब्रेंट क्रूड आंतरराष्ट्रीय बाजारात 100 डॉलर्सच्या खाली घसरले आहे. कच्चे तेल स्वस्त झाले आहे, पण भारतात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. हा थेट सामान्य माणसाच्या खिशावर टाकलेला दरोडा नाही तर काय?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचे मुळीच आश्चर्य वाटत नाही, असे सांगत प्रतिक्रिया दिली की, युद्ध सुरू झाल्यापासून राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे सर्व नेते सरकारला वारंवार इशारे देत होते. हे राष्ट्रीय संकट आहे. सर्वांनी एकजुटीने त्याचा सामना केला पाहिजे. मात्र सरकारला आमचे ऐकायची इच्छाच नाही. मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकांची सातत्याने दिशाभूल करत आहेत. गेल्या आठवड्यात फडणवीस एकीकडे लोकांना सांगत होते की, आपल्याकडे आवश्यक तेवढा पेट्रोल – डिझेलचा साठा आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही. तर दुसरीकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सांगत होते की, केवळ एक महिना पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. ही शुद्ध बनवाबनवी आहे. सरकार या इंधन संकटावर कधी खरे बोलणार?शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका करताना इशाराच दिला की, आणखी काही दिवसांत पेट्रोल-डिझेलमध्ये 30 ते 40 रुपयांची वाढ होईल.पेट्रोल पंपांवर दंगली होतील.
विविध शहरांमधील दर
| शहर | पेट्रोल | डिझेल |
| मुंबई | 111.21 रुपये | 97.83 रुपये |
| पुणे | 111.21 रुपये | 97.83 रुपये |
| नागपूर | 112.01 रुपये | 98.78 रुपये |
| ठाणे | 111.61 रुपये | 98.22 रुपये |
| नाशिक | 112.02 रुपये | 98.66 रुपये |
| कोल्हापूर | 112.0 8 रुपये | 98.84 रुपये |
| चेन्नई | 107.77 रुपये | 99.55 रुपये |
| कोलकाता | 113.51 रुपये | 99.82 रुपये |
| दिल्ली | 102.12 रुपये | 95.20 रुपये |











