Home / महाराष्ट्र / Ashok Kharat Film : भोंदू अशोक खरातचा काळा कारनामा आता थेट रुपेरी पडद्यावर! ‘ही’ बडी महिला नेता साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका?

Ashok Kharat Film : भोंदू अशोक खरातचा काळा कारनामा आता थेट रुपेरी पडद्यावर! ‘ही’ बडी महिला नेता साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका?

Ashok Kharat Film : नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला होता. महिलांचे शोषण...

By: Team Navakal
Ashok Kharat Film
Social + WhatsApp CTA

Ashok Kharat Film : नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला होता. महिलांचे शोषण आणि अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या या प्रकरणाचे पडसाद केवळ सामाजिक स्तरातच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही उमटले होते. आता याच बहुचर्चित आणि वादग्रस्त प्रकरणावर आधारित एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात शिवसेना नेत्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद एका महत्त्वपूर्ण राजकीय भूमिकेत दिसणार असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दीपाली सय्यद यांचा ‘सस्पेन्स’ आणि खुलासा-
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, अशोक खरात याच्या प्रकरणावर आधारित चित्रपटाची पटकथा त्यांच्याकडे आली असून, त्या यात एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. जरी त्यांनी आपण नेमकी कोणती व्यक्तिरेखा साकारत आहोत, याबाबत गुप्तता पाळली असली, तरी राजकीय वर्तुळात आणि चित्रपट सृष्टीत त्या रुपाली चाकणकर यांच्याच भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. “स्क्रिप्ट वाचल्यानंतर आणि मला ती भूमिका आवडल्यानंतर मी कामाला सुरुवात करेन. पुढील महिन्यापासून चित्रीकरणाला प्रारंभ होणार असून, तेव्हाच सर्व गुपिते उघड होतील,” असे सांगत दीपाली यांनी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे.

राजकीय आणि सामाजिक पैलूंचे चित्रण-
हा चित्रपट केवळ अशोक खरात याच्या वैयक्तिक गैरकृत्यांपुरता मर्यादित नसेल, तर त्यामागील राजकीय साटलोटं आणि प्रभावशाली व्यक्तींचा हस्तक्षेप यावरही प्रकाश टाकणारा ठरेल. अशोक खरात प्रकरण समोर आले तेव्हा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले होते, ज्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. या संदर्भात बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या की, राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे पाचवीलाच पुजलेले असतात; मात्र खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची नेमकी काय भूमिका होती किंवा वास्तव काय होते, हे चित्रपट पाहिल्यावरच स्पष्ट होईल.

अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृतीचा संदेश-
अशोक खरातने ज्या प्रकारे महिलांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून त्यांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण केले, त्या घटनांनी समाजमन विषण्ण झाले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून अशा ढोंगी बाबांपासून समाजाने सावध राहणे किती गरजेचे आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दीपाली सय्यद यांनीही जनतेला आवाहन केले आहे की, समाजात अजूनही अनेक ‘खरात’ लपलेले असू शकतात, त्यामुळे कोणत्याही बाबाकडे जाताना किंवा कोणावरही विश्वास ठेवताना नागरिकांनी सजग आणि जागरूक राहिले पाहिजे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या