Drishyam 3: मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहनलाल यांच्या अभिनयाने सजलेला ‘दृश्यम ३’ हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ या भागांच्या प्रचंड यशानंतर प्रेक्षकांमध्ये या तिसऱ्या भागाबद्दल मोठी उत्सुकता होती. जीतू जोसेफ यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या सिनेमाने अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक सुरुवात केली असून, पहिल्या सहा दिवसांतच अनेक मोठ्या चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत. मल्याळम सिनेसृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ‘ओपनिंग’ मिळवणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाने आपली मोहोर उमटवली आहे.
चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे झाले तर, मोहनलाल पुन्हा एकदा ‘जॉर्जकुट्टी’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्यासोबत मीना, अंसीबा हसन आणि एस्थर अनिल या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकरल्या आहेत. आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी जॉर्जकुट्टी यावेळी कोणती नवीन चाल रचतो आणि कायद्याच्या तावडीतून कसा सुटतो, याचे डोकं चक्रावून टाकणारे थ्रिलर या भागात पाहायला मिळत आहे. याच उत्कंठावर्धक कथानकामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर गर्दी केली असून, पहिल्या आठवड्यात या सिनेमाने आपली पकड घट्ट ठेवली आहे.
कमाईच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, ‘दृश्यम ३’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५.८५ कोटी रुपयांची कमाई करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दुसऱ्या दिवशी ११.०५ कोटी, तिसऱ्या दिवशी १३.७० कोटी, चौथ्या दिवशी १३.८५ कोटी आणि पाचव्या दिवशी ७.७० कोटी रुपयांचे संकलन केले. सॅकनिल्कच्या ताज्या अहवालानुसार, प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी या चित्रपटाने ६.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे भारतातील सहा दिवसांची एकूण कमाई ६८.६० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही या चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे. जगभरातील प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे या चित्रपटाचे ‘ओव्हरसीज कलेक्शन’ ८४.७० कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. अशाप्रकारे, सहा दिवसांत या चित्रपटाची एकूण जागतिक कमाई १६४.३२ कोटी रुपये झाली आहे.










