Home / News / Eid Tensions Rise in Ghatkopar, Mira Road : मुंबईच्या सोसायट्यांमध्ये ईदच्या दुर्रानीवरून वाद सोमय्यांनी वातावरण तापवले! पालिकेकडून दबावात परवानगी रद्द

Eid Tensions Rise in Ghatkopar, Mira Road : मुंबईच्या सोसायट्यांमध्ये ईदच्या दुर्रानीवरून वाद सोमय्यांनी वातावरण तापवले! पालिकेकडून दबावात परवानगी रद्द

Eid Tensions Rise in Ghatkopar, Mira Road – बकरा कुर्बानीवरून मीरा रोड येथे वाद झाल्यानंतर आज मुंबईतील घाटकोपर, गोरेगाव, मीरा-भाईंदर...

By: Team Navakal
Eid Tensions Rise in Ghatkopar, Mira Road
Social + WhatsApp CTA


Eid Tensions Rise in Ghatkopar, Mira Road – बकरा कुर्बानीवरून मीरा रोड येथे वाद झाल्यानंतर आज मुंबईतील घाटकोपर, गोरेगाव, मीरा-भाईंदर येथेही वातावरण तापले. रहिवासी सोसायट्यांच्या परिसरात उघड्यावर बकरा कुर्बानीला कडाडून विरोध करण्यात आल्यानंतर पालिकेने दबावाखाली माघार घेत परवानगी रद्द केली. त्यामुळे मुस्लीम बांधव नाराज झाले. त्यातच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर येथे जाऊन इथे कुर्बानी होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने वातावरण तापले. त्यानंतर महापालिकेने कुर्बानीचे सर्व बकरे ताब्यात घेतल्याने ईदच्या सणावेळी तणाव निर्माण झाला आहे.


घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीमध्ये गेल्या सुमारे 30 वर्षांपासून बकरा कुर्बानीची परंपरा सुरू असल्याचे मुस्लीम नागरिकांनी सांगितले. मात्र यावर्षी मध्यरात्री मुंबई महानगरपालिकेकडून कुर्बानीची परवानगी रद्द करण्यात आल्याने वादाला सुरुवात झाली. या निर्णयानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडीही घटनास्थळी दाखल झाली. या निर्णयामुळे सोसायटीतील मुस्लीम बांधवांनी नाराजी व्यक्त करत आम्ही सोसायटीच्या आवारात कुर्बानी करणार नाही. महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.

आम्हाला सोसायटीचे नाव खराब करायचे नाही, अशी भूमिका मांडली. याचवेळी भाजपा नेते किरीट सोमय्या सोसायटी परिसरात पोहोचले. त्यांनी इथे कत्तल होऊ देणार नाही, कुर्बानी देण्यासाठी पालिकेने वेगळी व्यवस्था करावी, तिथे जाऊन तुमचे धार्मिक विधी करा, त्याला आमचा विरोध नाही, अशी मागणी केली. याचदरम्यान, काही जण बकरे घेऊन सोसायटीमध्ये आल्याने पुन्हा वाद झाला. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी येथील सर्व बकरे ताब्यात घेतले.


यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, कुर्बानीसाठी आणलेल्या 31 बोकडांपैकी 23 बोकड महापालिकेने ताब्यात घेतले आहेत. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे की, अपूर्ण माहिती दिल्याने परवानगी दिली होती, पण इथे बकरीची कत्तल होऊ शकत नाही. मला सोसायटीचा एक पदाधिकारी स्वतः भेटला आणि त्यांनी सांगितले की, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीची कागदपत्रे दिली होती. मात्र, या सोसायटीत कुर्बानीला परवानगी नाही. उद्याही इथे कुर्बानी होऊ देणार नाही. पण पालिकेनेही जबाबदारीने काम केले पाहिजे. सुरक्षा राखणे हे पोलिसांचे काम आहे. प्रत्येक जागेवर सोमय्या जाणार का? दोन दिवसांपूर्वी हिंदू रस्त्यावर उतरले म्हणून हे घाबरले आहेत.


गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरातही बकऱ्याच्या कुर्बानीवरून वाद झाला. सॅटेलाईट गार्डन फेज-2 मधील आझाद नगर डी-3 इमारतीच्या आवारात उघड्यावर कुर्बानीला स्थानिकांनी विरोध केला. याबाबत भाजपाच्या स्थानिक नगरसेविका प्रिती सातम यांनी पालिकेचे सहाय्यक आयुक्त, पी (दक्षिण) विभाग यांच्याकडे लेखी निवेदन देऊन, मागील वर्षीही नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने या ठिकाणची परवानगी रद्द केली होती. यंदा कोणत्याही परिस्थितीत उघड्यावर कुर्बानीस परवानगी देऊ नये, अशी मागणी केली.


गोकुळधाम परिसरातील नागरिक म्हणाले की, सण साजरा करायचा असेल तर तो घरात करावा. त्यावर कोणतीही मनाई नाही. मात्र तो उघड्यावर करू नये. सातम म्हणाल्या की, माझ्या शेजारील सोसायटीमध्येच खुल्या जागेत बकऱ्याची कुर्बानी दिली जाते आणि त्याला आम्ही कडाडून विरोध करत आहोत. सणासाठी एकत्र यायचे असेल, तर शेड उभारावी, कव्वाली आयोजित करावी, आपल्या बांधवांना भेटावे. मात्र खुल्या जागेत बकऱ्याची कुर्बानी देण्यास स्थानिक नागरिकांचा ठाम विरोध आहे. या परिसरात दोन शाळा आहेत, इस्कॉन सेंटर आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. महानगरपालिकेच्या नियमांनुसार, कुर्बानीसाठी अधिकृत जागा निश्चित केलेली आहे. त्याच ठिकाणी कुर्बानी दिली पाहिजे. सोसायटीच्या खुल्या जागेत कुर्बानी देण्यास आधीच मनाई करण्यात आलेली आहे. कोणी उघड्यावर कुर्बानी देण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण गोकुळधाम परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरतील.


शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनीही या वादावर प्रतिक्रिया देत म्हटले की, निवासी सोसायट्यांमध्ये अशा प्रकारे कत्तलखाने तयार करणे योग्य नाही. धार्मिक सण साजरे करण्यास कुणाचाही विरोध नाही, मात्र ज्या ठिकाणी लोक राहतात त्या निवासी भागात अशा प्रकारे प्राण्यांची हत्या होणे योग्य नाही.


दरम्यान, मिरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर-1 सोसायटीत ईदसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून काल निर्माण झालेल्या वादात काशिमिरा पोलिसांनी आज कडक कारवाई करत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. सोसायटीत डुक्कर घुसविण्याचा प्रयत्न, धार्मिक घोषणाबाजी आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे 50 जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या वादादरम्यान एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अब्दुल कादरबाशा शेख (22) याला अटक करण्यात आली. पोलिसांशी धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी काही जणांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


तणाव वाढू नये म्हणून पोलीस आणि पालिका प्रशासनाने सोसायटीच्या आवारात ठेवलेले 51 बकरे अन्य ठिकाणी हलवले. सध्या परिसरात परिस्थिती नियंत्रणात असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बकरे ठेवण्यासंदर्भात नवीन नियमावली तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मिरा-भाईंदर शहरात आणखी एक अधिकृत कत्तलखाना उभारण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.


Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या