Ebola Alert : आफ्रिकेतील काँगो आणि युगांडा या देशांमध्ये सध्या इबोला विषाणूने धुमाकूळ घातला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी लागू केली असून, भारताच्या आरोग्य मंत्रालयानेही परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर कडक देखरेख सुरू केली आहे. याच कडक नियमांचा फटका नागपुरात आलेल्या एका प्रवाशाला बसला आहे.
युगांडाहून नुकतीच एक 47 वर्षांची व्यक्ती नागपूर विमानतळावर उतरली. ही माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाने तात्काळ हालचाल करत या प्रवाशाला पुढील 21 दिवसांसाठी घरातच बंदिस्त (होम क्वारंटाईन) राहण्याचे कडक आदेश जारी केले आहेत.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, संबंधित व्यक्तीमध्ये सध्या तरी आजाराचे कोणतेही अंश किंवा धोक्याची लक्षणे दिसलेली नाहीत. मात्र, इबोलाचा धोका लक्षात घेता मनपाचे डॉक्टर रोज या व्यक्तीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष देखरेख ठेवत आहेत.
२१ दिवसांचाच कालावधी का ठरवला?
वैद्यकीय शास्त्रानुसार, इबोला विषाणू शरीरात गेल्यानंतर त्याची लक्षणे पूर्णपणे बाहेर येण्यासाठी 1 ते 21 दिवसांचा कालावधी लागतो. याच कारणामुळे मनपाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. जर या 21 दिवसांच्या काळात प्रवाशाची तब्येत बिघडली, तर त्याला थेट शासकीय रुग्णालयातील विशेष कक्षात हलवले जाईल, अशी पूर्वतयारीही प्रशासनाने केली आहे.
आरोग्य विभागाची ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ नेमकी काय करणार?
महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा प्रशासनांना केंद्र सरकारने हाय अलर्टवर ठेवले आहे. त्यानुसार राज्यातील आरोग्य यंत्रणांनी आपली यंत्रणा खालीलप्रमाणे सज्ज केली आहे:
- पोर्ट आणि एअरपोर्टवर ट्रॅकिंग: आफ्रिकी देशांमधून प्रवास करून भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा प्रवासाचा इतिहास तपासला जात आहे.
- तातडीची टास्क फोर्स: कोणतीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा स्तरावरील ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ तात्काळ घटनास्थळी धाव घेईल.
- पुण्याची लॅब सज्ज: संशयित रुग्णांचे रिपोर्ट वेळेत मिळण्यासाठी पुण्याची राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV) हायटेक चाचण्यांसाठी चोवीस तास खुली ठेवण्यात आली आहे.
नागरिकांनी कोणत्या लक्षणांवर लक्ष ठेवावे?
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींमध्ये खालील समस्या दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे:
- अचानक प्रचंड ताप येणे आणि शरीरातील ताकद पूर्णपणे निघून जाणे.
- स्नायू आणि सांधे दुखणे, तीव्र डोकेदुखी आणि घसा खवखवणे.
- आजार वाढल्यास उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि अंगावर लाल पुरळ येणे.
महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये युद्धपातळीवर तयारी
जरी देशात किंवा राज्यात सध्या इबोलाचा एकही संसर्ग झालेला रुग्ण नसला, तरीही आरोग्य विभागाने गाफील न राहण्याचे ठरवले आहे. सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांना विशेष आयसोलेशन वॉर्ड, स्वतंत्र रुग्णवाहिका, प्रशिक्षित कर्मचारी आणि पुरेशा प्रमाणात पीपीई किट सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हे देखील वाचा – Vaibhav Sooryavanshi IPL Record: 15 वर्षांच्या पोराचा धमाका! ख्रिस गेलचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडत वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास










