Nanded Politics : राज्याच्या राजकारणात सध्या विधानपरिषद निवडणुकीचे वारे जोराने वाहत असून, महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात मध्यरात्री एका हॉटेलमध्ये सुमारे तासभर गुप्त बैठक पार पडली. डॉ. शिंदे सध्या नांदेड दौऱ्यावर असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असून, या भेटीचे अन्वयार्थ लावले जात आहेत.
विशेष म्हणजे, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ही भेट झाली आहे. आगामी काळात भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काही नवीन समीकरणे आकाराला येत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यापूर्वी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत जो राजकीय प्रयोग केला होता, त्याचीच पुनरावृत्ती विधान परिषद निवडणुकीत होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. चिखलीकर आणि शिंदे यांच्यातील या चर्चेत नेमकी कोणती रणनीती ठरली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली तरी, या भेटीने महायुतीमधील अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या भेटीबाबत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी ही जागा ते स्वतःच्या कुटुंबासाठी नव्हे, तर पक्षासाठी मागत आहेत. चिखलीकर यांनी पुढे असेही नमूद केले की, ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता त्यांना माहित आहे, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला ही संधी मिळावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली आहे. पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवणार, अन्यथा सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चेवरही त्यांनी पडदा टाकला. मुंबईतील ‘देवगिरी’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षवाढीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली असून, खासदार सुनील तटकरे यांच्या मनात असलेले काही गैरसमज दूर झाल्याचे त्यांनी सांगितले.











