Home / महाराष्ट्र / Sanjay Raut : नीट पेपरफुटीवरून संजय राऊतांनी भाजपला घेरले!”काही वाईट घडायचं असेल की ‘शाह’ कनेक्शन असतंच!”

Sanjay Raut : नीट पेपरफुटीवरून संजय राऊतांनी भाजपला घेरले!”काही वाईट घडायचं असेल की ‘शाह’ कनेक्शन असतंच!”

Sanjay Raut : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाने देशासह राज्यात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव...

By: Team Navakal
Sanjay Raut
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाने देशासह राज्यात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत सडकून टीका केली. या पेपरफुटीचे धागेदोरे थेट महाराष्ट्राशी जोडले गेले असतानाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री गप्प का, असा सवाल करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणामागे भाजपचेच ‘नेटवर्क’ असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. “देशाची अर्थव्यवस्था अत्यंत गंभीर वळणावर असून राहुल गांधी यांनी वर्तवल्याप्रमाणे आर्थिक तुफान येण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान जनतेवर इंधन दरवाढीचा बोजा टाकून परदेश दौऱ्यावर जात आहेत. सर्व व्यवस्था उद्ध्वस्त होत असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान जमिनीवर नसून हवेत आहेत,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली. जनतेची फसवणूक करून त्यांच्याशी असत्य बोलणारे हे सरकार असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी ‘शाह’ कनेक्शनचा उल्लेख करत भाजपला घेरले. “नीट पेपरफुटीचे केंद्र हे महाराष्ट्रच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लातूरपासून पुण्यापर्यंत याचे जाळे पसरले असून, या प्रकरणाचा मास्टरमाईंड चेतन शाह याला सीबीआयने अटक केली आहे. जेव्हा काही वाईट घडते, तेव्हा त्यामागे ‘शाह’ कनेक्शन कोठे तरी असतेच,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी लावून धरली.

खासदार राऊत यांनी भाजपवर थेट आरोप करताना म्हटले की, “आपल्याच लोकांना पेपर आधी मिळावेत आणि त्यांनी परीक्षेत चांगला गुणानुक्रम मिळवावा, यासाठी भाजपने हे पेपर फोडण्याचे नेटवर्क तयार केले आहे. ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा आपल्या ताब्यात घेतली, त्याचप्रमाणे आता स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या यंत्रणाही भाजपने आपल्या नियंत्रणाखाली आणल्या आहेत. ही एका संपूर्ण पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करणारी कृती असून, यामागे भाजपमधील प्रमुख लोकांचा हात आहे.”

महाराष्ट्राच्या गौरवशाली शिक्षण परंपरेला या पेपरफुटीमुळे काळिमा फासला गेल्याची खंत राऊत यांनी व्यक्त केली. सीबीआय या प्रकरणात कारवाई करत असली, तरी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि त्यांचे पोलीस खाते अद्याप सुस्त का आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या