Raj Thackeray : विधान परिषद निवडणुकीतील बिनविरोध निवडीवरून वाद सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतपत्रिकेवर निवडणुका घेतल्या जात नाहीत, तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका मांडली आहे. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर ही माहिती दिली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी ही भूमिका सर्व निवडणुका पार पडल्यावर मांडली आहे. राज्याच्या पुढील निवडणुका 2029 मध्ये होणार आहेत. या निवडणुका येईपर्यंत हा मुद्दा कितपत कायम राहील, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
संजय राऊत यांनी काल राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीबाबत बोलताना आज राऊत म्हणाले की, आमची एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. यावेळी बॅलट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकावा, असे राज ठाकरे यांनी सांगितले. हा मुद्दा ते वारंवार मांडत आहेत. राज ठाकरे यांचे हे मत मला पटले आहे. मी उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांना राज ठाकरे यांची भूमिका सांगितली आहे. उद्धव ठाकरे यांनाही ही भूमिका मान्य असून, त्यावर चर्चा होणे आणि निर्णय घेणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत आहे. आमदार-खासदार फोडले जात आहेत. त्यामुळे जोपर्यंत बॅलट पेपरवर निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकावा, असे आम्हाला वाटते.
ते पुढे म्हणाले की, विधान परिषद बरखास्त करावी असे सुधीर मुनगंटीवार यांना का वाटते? यासंदर्भात त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांसोबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करावी. त्यांच्या या मतामागे कारण आहे. काही लोकांनी घोडेबाजार सुरू केला आहे. एका दिवसात 150 कोटी रुपये खर्च करणार्यांविषयी मी बोलत आहे. या पैशांच्या जोरावर विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका लढवल्या जात आहेत. त्यामुळे लोकांना अशा निवडणुका नको आहेत. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुका घ्याव्यात आणि त्या मतपत्रिकेवर (बॅलेट पेपरवर) घ्याव्यात, अशी मागणी मुनगंटीवार यांनी आपल्या पक्षाकडे करावी.
आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही विधान परिषद निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा दावा केला करत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लोकसभेत विधेयक मांडण्याचा निर्धार बोलून दाखवला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात विधान परिषदेच्या 8 जागांवर मविआच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामध्ये काही जण काँग्रेसचे सुज्ञ आहेत ना. घोडेबाजार होऊ नये म्हणून आम्ही पुण्याचा निर्णय घेतला. सरपंच निवडीपासून ते थेट लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वच ठिकाणी गुप्त मतदानाऐवजी हात वर करून जाहीर मतदान पद्धत लागू झाली पाहिजे, यासाठी आपण संसदेत बिल आले तर त्यांचे स्वागत करू. पारदर्शकपणे निवडणूक झाल्यास त्या निवडणुकीत मजा येते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर देताना म्हटले की, माणसे पैशांपेक्षा प्रेमाने जिंकता येतात. हे समजले तर अशा प्रकारचे विधेयक आणण्याची गरजच पडणार नाही. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा झाली पाहिजे. माझा त्याला विरोध नाही. निवडणूक व्यवस्थेत आवश्यक ते बदल झाले पाहिजेत. या संदर्भात कोणी विधेयक आणत असेल तर त्याला आमचा विरोध नाही.










