Home / देश-विदेश / Cockroach Janata Party : कॉकरोच पार्टी’चे पहिले आंदोलन अयशस्वी ! अपेक्षित गर्दी झाली नाही! विस्कळीत नियोजन

Cockroach Janata Party : कॉकरोच पार्टी’चे पहिले आंदोलन अयशस्वी ! अपेक्षित गर्दी झाली नाही! विस्कळीत नियोजन

Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके आज सकाळी 7.45 वाजता अमेरिकेहून दिल्लीत दाखल झाला. त्याच्या...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA
 Cockroach Janata Party  : कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके आज सकाळी 7.45 वाजता अमेरिकेहून दिल्लीत दाखल झाला. त्याच्या स्वागताला विमानतळावर गर्दी होती. तो तिथून मोर्चाची परवानगी मागायला पोलीस स्टेशनला जाणार होता. पण दिल्ली पोलिसांनी प्रथमच लेखी निवेदन न घेता मोर्चाला परवानगी देऊन टाकली. त्यामुळे दीपके थेट जंतरमंतरवर पोहोचला, पण कोट्यवधी लोकांचा ऑनलाईन पाठिंबा मिळालेल्या या पार्टीला प्रत्यक्ष आंदोलनात पाठिंबा मिळाला नाही. जंतरमंतरवर अपेक्षित अशी तुडुंब गर्दी झाली नाही. शिवाय या आंदोलनाची तयारी नीट केली नव्हती. सुरुवातीला स्पीकर नव्हता, मंच नव्हता. त्यामुळे एकूणच हे आंदोलन अपयशी ठरले आणि सायंकाळी 5 पर्यंत होणारे हे आंदोलन दुपारी 3 वाजताच गुंडाळण्यात आले. शेवटी दीपके याने इशारा दिला की, केंद्रिय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुढील पाच दिवसांत राजीनामा दिला नाही तर पुढील शनिवारी पुन्हा आंदोलन केले जाईल.


अभिजित दीपके आज सकाळी 7.45 वाजता अमेरिकेतून दिल्लीला परतला. विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी काही समर्थक हजर होते. आंदोलन दडपण्यासाठी विमानतळावर उतरताच अभिजितला अटक होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, विमानतळावर तशी कोणतीही कारवाई झाली नाही. विमानतळाबाहेर पडल्यावर अभिजित म्हणाला की, माझे विमान दिल्लीच्या धावपट्टीवर उतरण्यापूर्वीचे काही क्षण मला असे वाटत होते की, हे माझ्या स्वातंत्र्याचे अखेरचे क्षण आहेत. मला विमानतळावरच अटक होण्याची दाट शक्यता होती. मात्र, या देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि या पवित्र हेतूसाठी मी माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा त्याग करायला पूर्णपणे तयार होतो. आज अनेक मोठ्या व्यक्ती केवळ तुरुंगवासाच्या आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीने सत्तेसमोर झुकल्या आहेत, त्यांनी स्वतःचा स्वाभिमान विकला आहे. या देशातील तरुण अजून विकले गेलेले नाहीत.


विमानतळावरून बाहेर पडताना अभिजितच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र होते. ते त्याने उंचावून दाखवले. त्यानंतर  अभिजितने थेट जंतरमंतर मैदान गाठले. त्यावेळी पोलीस गाड्या त्याच्या सोबत होत्या.  जंतरमंतरवर कोकरोच पार्टीच्या समर्थकांची गर्दी जमली होती. काही आंदोलक विद्यार्थी चेहर्‍यावर, शरीरावर झुरळांचे मुखवटे लावून आले होते. काहींच्या हातात तिरंगा झेंडा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता. त्यांच्या हातात फलकही होते. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान तुम्हाला जमणार नाही, पेपर लीक होणार नाही अशा परीक्षेची प्रतीक्षा आहे, अशा घोषणा या फलकांवर लिहिल्या होत्या. आंदोलनस्थळी काल सायंकाळपासूनच पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी विमानतळ, मुख्य रेल्वे स्थानक, बस स्थानके आणि दिल्लीच्या सीमा भागांत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. विविध ठिकाणी 1,000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. अभिजित जंतरमंतरवर पोहोचताच समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. नही डरेंगे डरेंगे, धर्म की राजनीती बंद करो अशा घोषणा समर्थक देत होते. कोकरोच पार्टीने लगेच आपल्या एक्स अकाऊंटवर या आंदोलनाची माहिती देत पोस्ट केली की, झुरळे कधीही कोणाला घाबरत नाहीत आणि ती कधीही संपत नाहीत. दरम्यान, कोकरोच पार्टीचे काही विरोधकही जंतरमंतरवर जमा झाले. त्यांनी आंदोलकांवर कारवाईची मागणी केली. एक जण झुरळ मारण्याचा कीटकनाशक स्प्रे घेऊन तिथे आला होता. मात्र कोकरोच पार्टीच्या समर्थकांनी त्याला हाकलून दिले. सकाळी मैदानात गर्दी कमी होती, नंतर ती हळूहळू वाढली, पण तरी जी अपेक्षा होती तेवढी गर्दी झाली नाही. आज एक बडा नेता पक्षात प्रवेश करणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र कोणत्याच नेत्याचा प्रवेश झाला नाही. लडाखचे नेते सोनम वांगचूक दुपारी उशिरा मैदानात आले आणि त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. एकूण स्थिती पाहून अभिजितने 3 वाजताच आंदोलन समाप्त केले.


कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांसमोर भाषण करताना अभिजित म्हणाला की, हा लढा अत्यंत मोठा आणि दीर्घकालीन आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने करत आहोत. परंतु, हे प्रशासन इतके संवेदनशून्य आणि निर्लज्ज झाले आहे की, परीक्षा पद्धतीतील त्रुटींवर ठोस कारवाई करण्याऐवजी ते आमचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न करत आहेत. आमची अधिकृत खाती हॅक करणे आणि आमचे सोशल मीडियावरील निषेधाचे पोस्ट हटवणे यातच हे लोक व्यस्त आहेत. मी सरकारला स्पष्ट सांगू इच्छितो की, तुम्ही आमचे डिजिटल संदेश नक्कीच हटवू शकता, परंतु या जंतरमंतरवरून आणि देशाच्या कानाकोपर्‍यातून आमचे प्रत्यक्ष अस्तित्व तुम्ही कधीही पुसू शकणार नाही.


अभिजित पुढे म्हणाला की,  मी जेव्हा अमेरिकेला गेलो, तेव्हा माझी आई रडत होती. पण ती त्यावेळी जेवढी रडली नव्हती तेवढी ती मी परत येताना रडली. दोन-तीन दिवसांपासून माझी आई आणि बहीण रडत आहेत. कारण त्यांना भीती आहे की, मी परत आलो तर मला तुरुंगात टाकतील. ही माझ्या आईची एकटीची भीती नाही, तर या देशात जो विद्यार्थी, जो तरुण सरकारविरोधात बोलत आहे, त्यांच्या आईचीही हीच भीती आहे. आपल्या मुलाला तुरुंगात टाकतील, अशी भीती त्यांनाही वाटत आहे. पण किती दिवस आपण भीतीखाली जगणार? एकदा त्यांना दाखवून देऊ  या की, आम्ही तुमच्या भीतीच्या राजकारणाला घाबरत नाही. धर्माचे राजकारण बंद करा. हिंदू-मुस्लीम राजकारण बंद करा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आंदोलन स्थळी पोहोचल्यावर म्हणाल्या की, 2021 पासून आतापर्यंत सगळ्या परीक्षेत तोच तोच गोंधळ झाला आहे. त्यामुळे निष्क्रिय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आम्ही अतिशय शांततेत आंदोलन करत आहोत. हे आंदोलन नेपाळसारखे नाही. आम्ही व्यवस्था बदलण्यासाठी आंदोलन करत आहोत. सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. या आंदोलनाला कव्हरेज देऊ नका, असे सरकारने पत्रकारांना सांगितले आहे. पण आम्ही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय थांबणार नाही. या आंदोलनात कुठलीही सुसुत्रता नव्हती. आंदोलनात कोण कोण सहभागी होणार आहे, याची माहितीही मिळत नव्हती.  संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या आंदोलनाला परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. परंतु साडेतीन वाजता अभिजित व कोकरोच पार्टीचे समर्थक जंतरमंतर मैदानावर निघून गेले. परंतु आंदोलन मागे घेण्याचे कोणतेही कारण देण्यात आले नाही. कुठलीही पत्रकार परिषद झाली नाही. अभिजित दीपके पुढे कोणती पावले उचलेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

त्याने मला-भावाला बोलावले नाही
दीपकेच्या काकांनी खंत व्यक्त केली

छत्रपती संभाजीनगर –  कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके भारतात परतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील मूळ निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. संभाव्य गर्दी आणि सार्वजनिक आकर्षण लक्षात घेऊन दीपके कुटुंबियांनी खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात अन्यत्र स्थलांतर केले. त्याच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबियांनी काळजी व्यक्त केली आहे. त्याने मला किंवा भावाला बोलावले नाही, अशी खंत व्यक्त करत अभिजित दीपकेचे काका विलास दीपके यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तर आई अनिता दीपके यांनी आंदोलन करू नको, असा सल्ला दिला आहे. अभिजित यांचे काका विलास दीपके यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले की, अभिजित परत आला ही चांगली गोष्ट आहे. आजचा दिवस आमच्यासाठी चिंतेचा आहे. तो आमच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या काळजीमुळे आम्हाला झोप लागत नाही. सरकार काय करेल याचा अंदाज नाही. त्याला अटक होईल अशी भीती वाटते. तसे होऊ नये, ही आमची इच्छा आहे. अभिजितशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. तसेच दिल्लीला जाऊन त्याला पाठिंबा देण्याचीही इच्छा होती, पण तसे होऊ शकले नाही. अभिजित यांची आई अनिता दीपके यांनी मुलाने राजकारण आणि आंदोलनाच्या वाटेवर न जाता आपल्या व्यावसायिक कारकिर्दीकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, अभिजितने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे, अशी आमची इच्छा आहे. यापूर्वी तो आम आदमी पक्षासोबत काही वर्षे कार्यरत होता. त्यावेळीही आम्ही त्याला राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. परदेशात किंवा पुणे-दिल्लीसारख्या शहरांत काम करावे, असेही सांगितले होते. मात्र त्याने आपल्या आवडीनुसार मार्ग निवडला. त्याने हे आंदोलन करू नये, असे आमचे मत आहे. आम्ही त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देणार नाही. त्याने राजकारणापासून दूर राहून कुटुंबासोबत राहावे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या