Offer for Gujarati-Marwari : मुंबईत नोकरीच्या जाहिरातीवरून पुन्हा एकदा स्थानिक विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला आहे. एका खासगी कंपनीने लिंक्डइन व नोकरी डॉट कॉम, या व्यावसायिक सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत ‘फक्त गुजराती किंवा मारवाडी उमेदवारांनी अर्ज करावा’ अशी अट घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वार्षिक सुमारे 25 लाख रुपयांचे पॅकेज असलेल्या नोकरीसाठी मराठी उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणावरून महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले की, दोन दिवसांत ही कोणती कंपनी आहे ते शोधून काढून आम्ही थेट कारवाई करू. या प्रकरणातील पुढील परिणामांसाठी सरकार जबाबदार असेल. संबंधितांवर तातडीने दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करावा. मराठींसाठी हिंसा नको, असे म्हणणारे मुख्यमंत्री आता संबंधित यंत्रणेला आदेश देऊन कारवाई करतील का? राज्यातील असे प्रकार थांबवले जातील का? मुंबईत मराठी माणसाला नोकरी मिळत नाही. परप्रांतीय विशेषतः काही गुजराती कंपन्या मराठी उमेदवारांना डावलतात. मराठींना प्राधान्य देण्याची सक्ती झाली पाहिजे. मराठी माणसाच्या अस्तित्वाचा आणि रोजगाराचा प्रश्न सोडवणे अत्यंत गरजेचे आहे. अर्थकारण बदलून नोकरी -व्यवसायात मराठींना प्राधान्य मिळाले तरच खर्या अर्थानेपरिस्थिती बदलेल.
टीका झाल्यावर अहमदाबादच्या भरती एजन्सीकडून वादग्रस्त जाहिरातीवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कंपनीने म्हटले आहे की, आमची कंपनी ही रिक्रुटमेंट कंपनी आहे. प्लेसमेंट देण्याचे काम आमच्या कंपनीकडून केले जाते. विविध कंपन्यांना विविध पदांवर त्यांच्या गरजेनुसार पद भरायची असतात. एखाद्या कंपनीला एखाद्या विशिष्ट जागेसाठी त्या भाषेत ज्ञान असलेली व्यक्ती हवी असेल, त्यानुसार रिक्रुटमेंट कंपनीकडून जाहिरात दिली जाते. आमच्याकडे येणार्या कंपन्यांमध्ये कोणत्याही एका जातीची किंवा भाषेची व्यक्ती काम करत नाही. विविध भागातून आलेले विविध भाषा बोलणारे लोक कंपन्यांमध्ये काम करतात. त्यामुळे या जाहिरातीचा वेगळा अर्थ घेऊ नये, कंपन्यांच्या गरजेनुसार त्या पदासाठी भाषेची गरज पाहून तशा प्रकारची जाहिरात दिली आहे.
2024 मध्ये गिरगाव परिसरातही एका खासगी कंपनीच्या जाहिरातीत ‘मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. एचआर जान्हवी सराना या नावाने लिंक्डिनवर एक जाहिरात करण्यात आली होती. ही जाहिरात व्हायरल झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त झाला होता. नेटकर्यांनी लिंक्डइनसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ट्रोलिंग केल्यानंतर एचआर कंपनीने आपली पोस्ट डिलीट केली होती.









