Cape Verde Goalkeeper Vozinha: फुटबॉल विश्वचषकामध्ये एखाद्या खेळाडूचे नशीब एका रात्रीत बदलण्याची अफाट ताकद आहे, याचा प्रत्यय केप वर्डे या छोट्या आफ्रिकन देशाचा गोलकीपर ओझिन्हा याला आला आहे. स्पेनविरुद्धच्या सामन्यानंतर ओझिन्हाचे इंस्टाग्राम फॉलोअर्स थेट 11.8 दशलक्षांवर (1 कोटी 18 लाख) पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, ही संख्या त्याच्या संपूर्ण देशाच्या 5,30,000 लोकसंख्येपेक्षा तब्बल 22 पट जास्त आहे.
परंतु, या सोशल मीडियावरील लोकप्रियतेच्या आणि मैदानातील ऐतिहासिक कामगिरीच्या मागे एक भावनिक कौटुंबिक कथा दडलेली आहे, ज्याने सध्या क्रीडा विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
स्पेनच्या ताकदीसमोर ४० वर्षांची पोलादी भिंत!
अटलांटा येथे खेळवल्या गेलेल्या या सामन्यातून केप वर्डे संघाने विश्वचषकात आपले पहिले पाऊल ठेवले. त्यांचा सामना थेट विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या स्पेनसोबत होता:
- स्पेनचे वर्चस्व मोडीत: संपूर्ण सामन्यात स्पेनने 75 टक्के वेळ फुटबॉलवर आपले नियंत्रण ठेवले होते. मात्र, त्यांच्या आक्रमक फळीसमोर ओझिन्हा (खरे नाव – जोसिमार डायस) नावाचा 40 वर्षांचा अनुभवी खेळाडू पोलादी भिंत बनून उभा राहिला.
- ७ वेळा बचाव: ओझिन्हाने अप्रतिम गोलकीपिंगचे प्रदर्शन करत फेरन टॉरेस आणि मिकेल ओयारझाबाल यांच्यासारख्या स्टार खेळाडूंचे गोल करण्याचे 7 अत्यंत महत्त्वाचे प्रयत्न हाणून पाडले आणि सामना 0-0 असा बरोबरीत सोडवला.
आईचे ते भाकीत तंतोतंत खरे ठरले!
संपूर्ण फुटबॉल जगतासाठी हा निकाल धक्कादायक असला, तरी ओझिन्हाच्या 59 वर्षांच्या आईला, अना कॅन्डिडा इव्होरा यांना मात्र याचा आधीच अंदाज होता. सामन्याच्या एक दिवस आधी त्यांनी स्थानिक टेलिव्हिजनवर जाहीरपणे सांगितले होते की, माझ्या मुलाच्या गोलपोस्टमध्ये कोणीही चेंडू टाकू शकणार नाही. सामन्यानंतर रॉयटर्सशी बोलताना त्यांनी अभिमानाने सांगितले, “मी जे म्हटले होते तेच घडले, स्पेनला एकही गोल करता आला नाही.”
मैदानावरच रडला गोलकीपर; ‘व्हिसा’च्या नियमांमुळे आई मुकली ऐतिहासिक क्षणाला
सामना संपल्यानंतर एकीकडे संपूर्ण संघ विजय साजरा करत असताना, ओझिन्हा मात्र मैदानावरच ढसाढसा रडू लागला. पत्रकारांशी बोलताना त्याने सांगितले की, आईला प्रत्यक्ष मैदानात पाहता आले नाही, याचे त्याला प्रचंड दुःख आहे.
अमेरिकेच्या कडक व्हिसा नियमांमुळे हा अडथळा निर्माण झाला होता. नियमांनुसार, केप वर्डेच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यासाठी सुरुवातीला सुमारे 15,000 डॉलर्सचा बाँड भरणे बंधनकारक केले होते. जरी नंतर विश्वचषक तिकीटधारकांसाठी हा नियम शिथिल केला गेला, तरी विमान तिकिटांचे वाढलेले दर आणि वेळेअभावी त्याच्या आईला 6,400 किलोमीटरचा प्रवास रद्द करावा लागला.
अमेरिकन नेत्याने दिलामदतीचा हात
ही भावनिक कथा समोर आल्यानंतर आता अमेरिकेचे लोकप्रतिनिधी आणि हाऊस डेमोक्रॅटिक नेते हकीम जेफ्रीस यांनी थेट परराष्ट्र मंत्रालयाला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. ओझिन्हाच्या आईचा व्हिसा तात्काळ मंजूर करावा, जेणेकरून रविवारी उरुग्वेविरुद्ध होणाऱ्या केप वर्डेच्या पुढील सामन्यासाठी त्या स्टेडियममध्ये उपस्थित राहू शकतील, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे देखील वाचा – Shiv Sena Political Crisis: “उद्धवजी, वहिनी आणि आदित्य… आता पक्षात तिघेच उरणार”; रामदास कदमांचा टोला










