Home / महाराष्ट्र / Opration Tiger : संसदेच्या उंबरठ्यावर उद्धव ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का!; ६ खासदारांनी पक्षादेश डावलल्याने ‘ऑपरेशन टायगर’ शंभर टक्के यशस्वी!”

Opration Tiger : संसदेच्या उंबरठ्यावर उद्धव ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का!; ६ खासदारांनी पक्षादेश डावलल्याने ‘ऑपरेशन टायगर’ शंभर टक्के यशस्वी!”

Opration Tiger : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत संघर्षाने आता अत्यंत गंभीर आणि निर्णायक वळण घेतले आहे. आज, १८...

By: Team Navakal
Opration Tiger
Social + WhatsApp CTA

Opration Tiger : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत संघर्षाने आता अत्यंत गंभीर आणि निर्णायक वळण घेतले आहे. आज, १८ जून रोजी दिल्लीत बोलावण्यात आलेली ठाकरे गटाच्या संसदीय दलाची बैठक पक्षाच्या अस्तित्वाची आणि खासदारांच्या निष्ठेची ‘लिटमस टेस्ट’ (अंतिम परीक्षा) मानली जात होती. या बैठकीसाठी पक्षाच्या वतीने सर्व खासदारांना अधिकृत ‘व्हिप’ जारी करण्यात आला होता. परंतु, लोकसभेतील एकूण ९ खासदारांपैकी केवळ ३ खासदारांनीच या बैठकीला उपस्थिती लावली. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चिलेल्या एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत तब्बल ६ खासदार या बैठकीला गैरहजर राहिले. या मोठ्या अनुपस्थितीमुळे एकनाथ शिंदे यांचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचे आता स्पष्ट झाले असून ठाकरे गटाला लोकसभेत फार मोठा धक्का बसला आहे.

अधिकच्या माहितीनुसार, ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या या ६ खासदारांनी संसदेत आपला एक स्वतंत्र गट स्थापन केला असून, त्या संदर्भातील अधिकृत पत्रही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केले आहे. हे ‘ऑपरेशन टायगर’ अत्यंत गोपनीय, काटेकोर आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आले असून, काल रात्रभरात दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वायूवेगाने घडामोडी घडल्या. शिंदे गटाने सध्या ‘प्रतीक्षा करा आणि पहा’ अशी रणनीती आखली आहे. या मोहिमेचे कोणतेही पुरावे किंवा माहिती तूर्तास घाईघाईने जाहीर करायची नाही, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठरवले आहे. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच नेमके काय असतील, याचा अंदाज घेऊनच पुढील दोन दिवसांत शिंदे गटाकडून पुढची पावले टाकली जातील.

दुसऱ्या बाजूला, या अनपेक्षित बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत उपस्थित असलेल्या आपल्या उर्वरित ४ खासदारांशी (राज्यसभेसह) सविस्तर चर्चा करून पुढील कायदेशीर लढाईची रणनीती निश्चित केली आहे. व्हिपचे उल्लंघन करून बैठकीला गैरहजर राहिलेल्या ६ खासदारांवर तात्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे एक विशेष पत्र ठाकरे गटाकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवले जाण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून, ठाकरे गटाने तातडीने कारवाई करत अनुपस्थित खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या नोटिसीला उत्तर देण्यासाठी बंडखोर खासदारांना केवळ काही तासांचाच अवधी दिला जाणार आहे. दिलेल्या वेळेत समाधानकारक उत्तर न आल्यास, त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाईची मागणी केली जाईल.

या खासदारांना ठाकरे गटाकडून नोटीस पाठवली जाणार? (Shivsena Opration Tiger)
१. संजय देशमुख – यवतमाळ-वाशिम
२. संजय दिना पाटील – ईशान्य मुंबई
३. संजय जाधव – परभणी
४. नागेश पाटील आष्टीकर – हिंगोली
५. भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी
६. ओमराजे निंबाळकर – धाराशिव

‘ऑपरेशन टायगर’मागील मध्यरात्रीचा तो कॉन्फरन्स कॉल; ६ खासदारांच्या बंडखोरीवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचे महत्त्वपूर्ण विश्लेषण
शिवसेना ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी पुकारलेल्या बंडखोरीच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेतील अनेक धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण तपशील आता समोर आले आहेत. या संपूर्ण मोहिमेची सूत्रे पडद्यामागून कशी हलवली गेली आणि यावर आता कोणती कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते, याबाबींवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मध्यरात्रीचा ‘कॉन्फरन्स कॉल’ आणि खासदार श्रीकांत शिंदेंची दिल्लीतील रणनीती
ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी संसदीय दलाच्या बैठकीला दांडी मारण्यापूर्वी, काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची गुप्त चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी या सर्व सहा खासदारांशी ‘कॉन्फरन्स कॉल’द्वारे (सामूहिक दूरध्वनी) संवाद साधला. सुमारे ३० मिनिटे चाललेल्या या प्रदीर्घ चर्चेत शिंदेनी सर्व खासदारांशी वैयक्तिक आणि सविस्तर संवाद साधला. विशेष म्हणजे, सुरुवातीला संभ्रमात असलेले ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील हे देखील या कॉन्फरन्स कॉलमध्ये सहभागी झाले होते, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

या संवादादरम्यान एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना आश्वस्त केले की, “ऑपरेशन टायगर यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, मुख्य शिवसेना पक्ष सर्व खासदारांच्या पाठीशी खंभीरपणे उभा राहील.” या विश्वासाच्या जोरावरच या सहाही खासदारांनी ठाकरे गटाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीला गैरहजर राहण्याचा अंतिम निर्णय घेतला. दिल्लीतील हे संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिंदेंचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली होती. हे ऑपरेशन पूर्णत्वास नेण्यासाठी श्रीकांत शिंदे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत.

ठाकरे गटाचा व्हिप की बंडखोरांची खेळी? ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचे कायदेशीर विश्लेषण
या सर्व राजकीय नाट्यानंतर आता ६ खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का? यावर देशाचे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि वकील उज्ज्वल निकम यांनी अत्यंत महत्त्वाचे कायदेशीर विश्लेषण मांडले आहे. निकम यांच्या मते, या प्रकरणाची कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी काही प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे नेमकी काय मागणी केली आहे? त्यांनी आपला नवा संसदीय नेता निवडला आहे का? आणि लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या या गटाला अधिकृत मान्यता दिली आहे का? या बाबी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत.

ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, “कोणत्याही राजकीय पक्षातर्फे काढण्यात आलेला व्हिप (पक्षप्रतोदांचा आदेश) हा त्या पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींवर कायदेशीररीत्या बंधनकारक असतो आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने काढलेल्या व्हिपला पूर्ण कायदेशीर महत्त्व आहे. परंतु, या ६ खासदारांनी जर ठाकरे गटाचा व्हिप जारी होण्यापूर्वीच लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली असेल आणि ‘आम्हाला संसदेत स्वतंत्र गट म्हणून बसण्याची परवानगी द्यावी तसेच आम्हाला स्वतंत्र व्हिप काढण्याचा अधिकार द्यावा’ अशी मागणी केली असेल, तर संसदेत नेमका कोणाचा व्हिप लागू होणार, यावर मोठा कायदेशीर पेच आणि रणकंदन निर्माण होऊ शकते.”त्यामुळे बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या दारात नेमकी कोणती कायदेशीर खेळी खेळली आहे, हे पाहणे अत्यंत रंजक आणि महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या