IRCTC Kashi Tour Package: उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारलेले भव्य श्रीराम मंदिर आणि काशीची जगप्रसिद्ध गंगा आरती पाहण्याचे प्रत्येक भारतीय भाविकाचे स्वप्न असते. देशातील या सर्वात लोकप्रिय धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवण्यासाठी आयआरसीटीसीने एक अतिशय सुटसुटीत आणि कडक प्लॅन तयार केला आहे.
भाविकांच्या सोयीसाठी आयआरसीटीसी ‘भारत गौरव स्पेशल टूरिस्ट ट्रेन’च्या माध्यमातून 9 दिवसांची विशेष ‘काशी तीर्थ यात्रा’ आयोजित करत आहे. जर तुम्हीही कमी बजेटमध्ये एकाच वेळी अनेक पवित्र धार्मिक स्थळांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर या टूर पॅकेजचे संपूर्ण नियोजन आणि खर्चाचे गणित खालीलप्रमाणे आहे.
प्रवासाचे वेळापत्रक आणि प्रमुख धार्मिक स्थळे
हे संपूर्ण टूर पॅकेज 8 रात्री आणि 9 दिवसांचे असणार आहे. या यात्रेची सुरुवात 9 सप्टेंबर 2026 रोजी होणार असून यामध्ये 4 प्रमुख शहरांमधील पवित्र मंदिरांचे दर्शन घडवले जाईल:
- गया: येथे भाविकांना बोधगया आणि ऐतिहासिक विष्णुपद मंदिराला भेट देता येईल.
- वाराणसी (काशी): या पवित्र भूमीत काशी विश्वनाथ मंदिर, विशालाक्षी मंदिर, अन्नपूर्णा मंदिर, कालभैरव मंदिर यांचे दर्शन घेता येईल. तसेच संध्याकाळच्या वेळी विलोभनीय गंगा आरतीचा अनुभव घेता येईल.
- अयोध्या: प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत नवनिर्मित भव्य राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेता येईल.
- प्रयागराज: गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमावर जाण्याची संधी मिळेल, जिथे भाविकांना पवित्र स्नान करता येईल.
तिकिटाचे दर आणि रेल्वेकडून ३३% सवलत
देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘भारत गौरव ट्रेन’ योजनेअंतर्गत या पॅकेजवर सुमारे ३३% सवलत दिली आहे. भाविकांच्या सोयीनुसार बजेटचे ३ भाग करण्यात आले आहेत:
- इकॉनॉमी क्लास (स्लीपर क्लास – १५० जागा): यासाठी प्रति व्यक्ती फक्त १७,९०० रुपये खर्च येईल.
- कम्फर्ट क्लास (थर्ड एसी – ४०० जागा): यासाठी प्रति व्यक्ती ३१,००० रुपये मोजावे लागतील.
- सुपीरियर क्लास (सेकंड एसी – ५० जागा): अधिक चांगल्या सुविधेसाठी प्रति व्यक्ती ४३,५०० रुपये खर्च येईल.
कोणत्या स्टेशनवरून पकडता येईल ट्रेन?
दक्षिण भारतातून सुरू होणारी ही विशेष ट्रेन तिरुनेलवेली येथून निघेल. प्रवासादरम्यान ही रेल्वे खालील प्रमुख स्थानकांवर थांबेल, जिथून प्रवाशांना ट्रेनमध्ये चढता येईल:
- विरुधुनगर, मदुरै, डिंडीगुल, त्रिची, विल्लुपुरम, चेंगलपट्टू, तांबरम, चेन्नई एगमोर, गुडूर आणि विजयवाडा.
पॅकेजमध्ये कोणत्या सुविधा मोफत मिळतील?
या टूर पॅकेजचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकदा बुकिंग केल्यानंतर प्रवाशांना इतर कोणत्याही खर्चाची काळजी करावी लागणार नाही. या किमतीमध्ये प्रवाशांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था, दोन्ही वेळचे जेवण आणि संपूर्ण प्रवासाचा विमा या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. या यात्रेचे अधिकृत बुकिंग करण्यासाठी भाविक आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच irctctourism.com ला भेट देऊ शकतात.
हे देखील वाचा – Shiv Sena Political Crisis: “उद्धवजी, वहिनी आणि आदित्य… आता पक्षात तिघेच उरणार”; रामदास कदमांचा टोला










