Home / महाराष्ट्र / Vidhan Parishad Election 2026 : काँग्रेसच्या व्हिपला अमरावतीत धक्का; ६ नगरसेवकांनी पक्षादेश झुगारत मतदान करून वाढवली यशोमती ठाकूर यांची डोकेदुखी

Vidhan Parishad Election 2026 : काँग्रेसच्या व्हिपला अमरावतीत धक्का; ६ नगरसेवकांनी पक्षादेश झुगारत मतदान करून वाढवली यशोमती ठाकूर यांची डोकेदुखी

Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील एकूण १७ जागांपैकी ६ जागांवर आधीच उमेदवार...

By: Team Navakal
Vidhan Parishad Election 2026
Social + WhatsApp CTA

Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील एकूण १७ जागांपैकी ६ जागांवर आधीच उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर, उर्वरित ११ जागांसाठी आज अत्यंत चुरशीच्या वातावरणात परंतु शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. आता या सर्व जागांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, आगामी २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे आणि निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत अमरावती मतदारसंघात मात्र काँग्रेस पक्षाला अतिशय मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या निवडणुकीत संपूर्णपणे तटस्थ राहण्याचा अधिकृत ‘व्हिप’ (पक्षादेश) जारी करण्यात आला होता. परंतु, अमरावती महानगरपालिकेतील काँग्रेसच्या १६ नगरसेवकांपैकी तब्बल ६ बंडखोर नगरसेवकांनी पक्षाचा हा आदेश जाहीरपणे धुडकावून लावत मतदानाचा हक्क बजावला. या बंडखोरांमध्ये धीरज हिवसे, जयश्री जठाले, लुबना तनवीर, अप्सर जहा सादिक शाह, विकी वानखडे आणि प्रशांत महाले या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आपली ओळख लपवण्यासाठी काही बंडखोर नगरसेवक चक्क चेहऱ्याला दुपट्टा बांधून मतदान केंद्रावर पोहोचले असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बंडखोरीचे हे लोण केवळ शहरापुरते मर्यादित राहिले नसून, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यातही पक्षाला सुरुंग लागला आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील १४ काँग्रेस नगरसेवकांपैकी ३ जणांनी पक्षादेश झुगारून मतदान केले; ज्यामध्ये सीमा खाकसे, सचिन बोरे आणि संगीता राऊत या बंडखोर सदस्यांचा समावेश आहे. या अंतर्गत बंडखोरीमुळे काँग्रेस गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे, आज राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशीव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या ११ मतदारसंघांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी पार पडलेल्या बिनविरोध प्रक्रियेत वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अरुण लखाणी, पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे, ठाणे मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे रवींद्र फाटक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे दुष्यंत चतुर्वेदी, तर अहिल्यानगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्राजक्त तनपुरे हे उमेदवार आधीच बिनविरोध विजयी घोषित झाले आहेत.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या