Zerodha Fitness Bet: आजकालच्या धावपळीच्या युगात कामाचा ताण, वेळेची कमतरता आणि रोजची दिनचर्या यांमुळे फिटनेसचे ध्येय गाठणे अनेकांना कठीण जाते. लोक डाएट प्लॅन बनवतात, जिम लावून मोकळे होतात, पण सातत्य राखण्यात अपयशी ठरतात.
परंतु, याच फिटनेसला जर ऑफिसमधील एका आव्हानाचे स्वरूप दिले आणि थेट पैशांची पैज लावली तर काय होईल? याचाच एक रंजक प्रत्यय ‘झेरोधा’ कंपनीत आला आहे.
झेरोधा कंपनीमध्ये लावलेल्या एका साध्या फिटनेसच्या पैजेचे रूपांतर आता एका मोठ्या प्रेरणादायी गोष्टीत झाले आहे. कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने केवळ एका वर्षात आपले तब्बल ३0 किलो वजन कमी केले आहे. इतकेच नाही, तर या कडक ट्रान्सफॉर्मेशमुळे त्याने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नितीन कामत यांच्याकडून २.५ लाख रुपयांचे बक्षीस देखील जिंकले आहे.
“मी पैज हरलो, पण खूप आनंदी आहे”; नितीन कामत यांची प्रतिक्रिया
स्वतः नितीन कामत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर या मजेशीर निकालाची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, “मी फिटनेसची एक पैज हरलो आहे, पण ही पैज हरल्याचा मला प्रचंड आनंद आहे.” नितीन कामत यांनी झेरोधामध्ये कार्यरत असलेले कॉन्टेंट आणि मीडिया स्ट्रॅटेजिस्ट रोहित अगरवाला यांच्या इंस्टाग्राम पोस्टचा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
यावर रोहितने लिहिले आहे, “माझा सर्वात मोठा स्वॅग कोणता? तर मी नितीन कामत यांच्याकडून एका हेल्थ चॅलेंजमध्ये २.५ लाख रुपये जिंकले आहेत.” मात्र, हे सांगताना रोहितने पैशांपेक्षा आरोग्याला जास्त महत्त्व दिले आहे.
त्याच्या मते, पैसे दुय्यम आहेत, पण गेल्या एका वर्षात ३0 किलो वजन कमी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची जी प्रेरणा मिळाली, ती सर्वात मोठे बक्षीस आहे. झेरोधा सोडून इतर कोणतीही कंपनी अशी कडक संधी देऊ शकत नाही, अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
१५ मित्रांचा ग्रुप आणि १ लाखांचा फंड; असा होता संपूर्ण प्लॅन
रोहितने एका व्हिडिओच्या माध्यमातून या आव्हानाचा रंजक प्रवास शेअर केला आहे:
- आव्हानाची सुरुवात: या चॅलेंजची सुरुवात ऑफिसमधील सुमारे १५ सहकाऱ्यांनी एकत्र येऊन केली होती.
- साधे पण कडक ध्येय: जानेवारी महिन्यापर्यंत ९५ किलो वजनावरून थेट ७५ किलोवर येण्याचे साधे ध्येय सर्वांसमोर होते.
- गंभीरता वाढवण्यासाठी पैज: हे आव्हान प्रत्येकाने गंभीरपणे घ्यावे म्हणून संपूर्ण ग्रुपने मिळून सुमारे १ लाख रुपयांचा निधी जमा केला होता.
- सातत्याचा विजय: येथून पुढे हा लढा फक्त वजन कमी करण्याचा राहिला नाही, तर तो रोजच्या सवयी, योग्य दिनचर्या आणि सातत्य राखण्याचा बनला. याच मेहनतीमुळे रोहितने एका वर्षात ३0 किलो वजन घटवून दाखवले.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव आणि नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
ही यशोगाथा समोर येताच सोशल मीडियावर युजर्सनी रोहितचे कौतुक करायला सुरुवात केली आहे. एका युझरने लिहिले, “पैज हरली पण आयुष्य जिंकले! रोहित, या कडक ट्रान्सफॉर्मेशनबद्दल अभिनंदन. नितीन भाई, पैसे हरण्याचा हा जगातील सर्वात सर्वोत्तम मार्ग आहे.” दुसऱ्या एका युझरने म्हटले, “प्रत्येकाला आयुष्यात असा मेंटॉर मिळायला हवा. आधी आरोग्य, पैसे नंतर.”
या संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन फोटोमध्ये रोहितच्या वजनासोबतच नेटकऱ्यांचे लक्ष नितीन कामत यांच्या फिटनेसनेही खेचून घेतले आहे. कामत यांचे बायसेप्स पाहून एका युझरने गंमतीने लिहिले, “तुमचे डोळे आणि बायसेप्स झेरोधाच्या मार्केट कॅपइतकेच मोठे दिसत आहेत!” तर काहींनी त्यांच्या पिळदार शरीराचे तोंडभरून कौतुक केले आहे.











