Sreesanth vs Harbhajan Singh : भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या वादांपैकी एक असलेले २००८ मधील ‘थप्पड प्रकरण’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत यांच्यातील संबंध सुधारले असे वाटत असतानाच एका जाहिरातीमुळे हा वाद नव्या वळणावर पोहोचला आहे. हरभजन सिंगने नुकतीच या थप्पड प्रकरणावरून प्रेरित असलेली एक जाहिरात केली, ज्यावरून श्रीसंत कमालीचा संतापला आहे.
एका प्रसिद्ध मुलाखतीदरम्यान श्रीसंतला हरभजनसोबतचा एक जुना फोटो दाखवण्यात आला, ज्यामध्ये दोघेही बॉक्सिंगच्या पोशाखात दिसत होते. हा फोटो पाहताच श्रीसंतचा पारा चढला आणि त्याने हरभजन सिंगला थेट बॉक्सिंग रिंगमध्ये येऊन दोन हात करण्याचे जाहीर आव्हान दिले.
“जाहिराती कशाला करता, हिंमत असेल तर रिंगमध्ये ये”; श्रीसंतचा हल्लाबोल
मुलाखतीदरम्यान श्रीसंतने हरभजनला उद्देशून अत्यंत आक्रमक विधाने केली, “तुझ्यामध्ये हिंमत आहे का? माझ्यासोबत बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्याची हिंमत तू दाखवू शकतोस का? ग्लव्हज घालून माझ्यासमोर ये, हे मी तुला थेट विचारत आहे. हा कोणताही अभिनय नाही, हे माझे खुले आव्हान आहे.”
श्रीसंतने पुढे सांगितले की, तो सध्या ‘बेअर नकल फाईट लीग’शी जोडला गेला आहे आणि प्रसिद्ध फायटर कॉनर मॅकग्रेगरच्या व्हिडिओच्या मुख्य प्रायोजकांमध्ये त्याचा मित्र सामील आहे, ज्यामुळे त्याचे प्रमोशनही झाले आहे.
मल्याळी आणि सरदार अस्मितेचा दिला हवाला
श्रीसंत एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या वादाला भावनिक जोड देत हरभजनला सुनावले:
- पैशांचा टोला: “भज्जी, जर तुला त्या थप्पड मारण्याच्या घटनेची आणि माझी इतकीच अडचण असेल, आणि तू यातून इतकी कमाई करत असशील, तर मलाही थोडी कमाई करू दे. व्यावसायिक जाहिराती करून जुन्या गोष्टींचे भांडवल करण्यापेक्षा थेट रिंगमध्ये या.”
- अस्मितेची लढाई: “आपल्याला जर स्वतःचा स्वाभिमान असेल, तर जाहिराती बंद करूया. सर्व मल्याळी आणि सर्व सरदार लोकांसाठी मी तुला रिंगमध्ये येण्याची विनंती करतो. मी तुझी वाट पाहत आहे,” असे म्हणत श्रीसंतने हा वाद वैयक्तिक पातळीवर नेला आहे.
काय आहे आयपीएल २००८ मधील ‘थप्पड’ प्रकरण?
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात म्हणजेच २००८ मध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यानंतर मैदानावर मोठी खळबळ उडाली होती. सामन्यानंतर हरभजन सिंगने श्रीसंतच्या श्रीमुखात भडकवली होती, ज्यानंतर श्रीसंत मैदानावरच रडताना दिसला होता. या घटनेनंतर हरभजनवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. अनेक वर्षांनंतर या दोघांमधील मैत्री पुन्हा झाली होती, मात्र आता एका व्यावसायिक जाहिरातीने या वादाची ठिणगी पुन्हा पेटवली आहे.











