Uddhav Thackeray Attack Amit Shah: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्या ज्या ठिकाणी पक्षासोबत गद्दारी झाली आहे, त्या सर्व मतदारसंघांमध्ये आपण स्वतः जाऊन मतदारांची हात जोडून माफी मागणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसैनिकांनी जीवाचे रान करून आणि रक्ताचे पाणी करून ज्यांना मशालीच्या चिन्हावर निवडून आणले, त्यांनीच विश्वासघात केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकच होते आणि भविष्यातही त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही, तसेच जनता ते कधीही स्वीकारणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूरमधील सभेत ‘शिवसेना फक्त एकनाथ शिंदेंचीच आहे’ असे वक्तव्य केले होते.
या विधानाचा खरपूस समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्या भाजपमध्ये कोणालाही उचलून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले जाऊ शकते, कारण तुमच्याकडे ती पद्धत आहे. पण शिवसेना ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांचीच आहे.
“तुझ्या अवकातीत राहा”; केंद्रीय गृहमंत्र्यांवर डागली तोफ
अमित शाह यांच्यावर थेट हल्ला चढवताना उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कडक शब्दांचा वापर केला:
- उपऱ्यांचा हस्तक्षेप अमान्य: शिवसेनाप्रमुख कोण हे ठरवणारे अमित शाह कोण? त्यांनी आपल्या अवकातीत राहावे. दिल्लीतील नेत्यांना स्वतःचे घर सांभाळता येत नाही आणि ते महाराष्ट्रात येऊन मालकी हक्क सांगत आहेत.
- खुर्चीची भीती: सध्या तुमच्या बुडाखाली सत्ता आणि मोठी खुर्ची आहे, म्हणूनच लोक तुम्हाला घाबरतात. स्वतःला पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत असल्यानेच दुसऱ्यांचे खासदार आणि आमदार फोडून स्वतःची खुर्ची मजबूत करण्याचे कारस्थान दिल्लीतून सुरू आहे.
“ज्या भाजपला बोट धरून मोठे केले, त्यांनीच पाठीत सुरा खुपसला”
काँग्रेस आणि भाजपच्या राजकारणाची तुलना करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, शिवसेनेने २५ वर्षे काँग्रेससोबत राजकीय संघर्ष केला, परंतु काँग्रेसने कधीही शिवसेना संपवण्याचा किंवा फोडण्याचा नीच प्रयत्न केला नाही. मात्र, ज्या भाजपचे बोट धरून आम्ही त्यांना महाराष्ट्रात मोठे केले, त्यांनीच आमचे घर फोडले. स्वतःचे कर्तृत्व शून्य असल्यामुळेच ही मंडळी दुसऱ्यांची पोरं चोरून राजकारण करत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली.
शिवसेनेची स्थापना ही केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या हक्कासाठी झाली आहे. आई जगदंबेचे सुरक्षा कवच आणि निष्ठावंत शिवसैनिक पाठीशी असेपर्यंत कोणीही हा पक्ष संपवू शकत नाही. ज्यांना लढायचे आहे त्यांनी तपास यंत्रणांच्या मागे न लपतात थेट मैदानात येऊन समोरासमोर लढावे, असे खुले आव्हानही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.
हे देखील वाचा – Sanjay Raut Target Rebels: “तुमच्या हिंमत असेल तर …”; बंडखोर खासदारांवर संजय राऊतांचा घणाघात










