Home / महाराष्ट्र / Mumbai Manhole Incident: पाहणी दौऱ्यातच बीएमसीचा कारभार उघडा! महापौर रितू तावडेंच्या समोरच पालिकेचा कर्मचारी मॅनहोलमध्ये कोसळला; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Manhole Incident: पाहणी दौऱ्यातच बीएमसीचा कारभार उघडा! महापौर रितू तावडेंच्या समोरच पालिकेचा कर्मचारी मॅनहोलमध्ये कोसळला; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Manhole Incident: मुंबईत मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांना तलावाचे स्वरूप आले. रस्ते वाहतूक...

By: Team Navakal
Mumbai Manhole Incident: पाहणी दौऱ्यातच बीएमसीचा कारभार उघडा! महापौर रितू तावडेंच्या समोरच पालिकेचा कर्मचारी मॅनहोलमध्ये कोसळला; व्हिडिओ व्हायरल
Social + WhatsApp CTA

Mumbai Manhole Incident: मुंबईत मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांना तलावाचे स्वरूप आले. रस्ते वाहतूक मंदावली असून काही चाळींमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. असे असूनही, २४ तासांत सरासरी २५0 मिलिमीटर इतका प्रचंड पाऊस होऊनही मुंबईतील जनजीवन सुरळीत राहिले, ही महापालिकेच्या चांगल्या कामांची पावती आहे, असा दावा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बुधवारी केला.

महापौर रितू तावडे यांनी सकाळी हिंदमाता, गांधी मार्केट, मीलन सबवे, अंधेरी आणि मालाड भुयारी मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचा निचरा वेगाने करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्याच वेळी शहरात उघड्या राहिलेल्या मॅनहोल्समुळे (गटारांची झाकणे) महापालिकेच्या नियोजनाचे धिंडवडे निघाले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे.

महापौरांच्या डोळ्यांदेखत कर्मचारी मॅनहोलमध्ये कोसळला; व्हिडिओ व्हायरल

पावसाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे स्वतः रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र, त्या घटनास्थळी हजर असतानाच एक नागरिक अचानक उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची थरारक घटना घडली. तिथे उपस्थित कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने तत्परता दाखवल्यामुळे त्या व्यक्तीला वाचवण्यात यश आले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यावरून मुंबई महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून प्रमुख नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर खालीलप्रमाणे तीव्र शब्दांत प्रहार केला आहे:

  • आदित्य ठाकरे (शिवसेना ठाकरे गट नेते): “मुंबईच्या महापौरांच्या डोळ्यांदेखतच एक व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याचे चित्र मी पहिल्यांदाच पाहिले आहे. त्यामुळे आता मुद्दा हाच आहे की मुंबईची काळजी कशी घ्यायची? यावर मी जास्त बोलणार नाही, कारण त्यांना मुंबईची काळजी कधी नव्हतीच,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
  • किशोरी पेडणेकर (माजी महापौर व नेत्या): “महापौरांच्या समोर अशी दुर्घटना घडणे हा थेट महापौरांचा अपमान आहे. पडलेली व्यक्ती महापालिकेचा कर्मचारी आहे की नाही, हेही महापौरांना माहिती नसावे, हा त्या कर्मचाऱ्याचाही अपमान आहे. नालेसफाईची मुदत ३१ मे पर्यंत असताना अतिरिक्त १५ दिवस मिळूनही कामे पूर्ण झाली नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.
  • यशवंत किल्लेदार (मनसे गटनेते): “एका रात्रीच्या पावसाने मुंबईची तुंबई केली असून अनेक चेंबर उघडे असल्याच्या तक्रारी येत आहेत. यापूर्वी अशाच एका मॅनहोलमुळे डॉ. अमरापूरकर यांना आपला जीव गमवावा लागला होता. महापालिका प्रशासन अजून अशा मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.

प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर; महापौरांचे बचावात्मक आदेश

विरोधकांच्या चौफेर टीकेला उत्तर देताना महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, अतिसखल भागातून पाण्याचा वेगाने निचरा करण्यासाठी सर्व पंम्पिंग स्टेशन आणि यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असून, नागरिकांना कुठेही अडचण येऊ नये म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. कुठेही मॅनहोल उघडे राहणार नाही आणि साचलेल्या पाण्याचा वेळीच निचरा होईल, यावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या