Home / महाराष्ट्र / Raj Thackeray : आमची डोकी भडकली तर काय होईल? राज ठाकरेंकडे जैनांचा मराठीत लेखी माफीनामा

Raj Thackeray : आमची डोकी भडकली तर काय होईल? राज ठाकरेंकडे जैनांचा मराठीत लेखी माफीनामा

Raj Thackeray : मुंबईत गेले काही दिवसांपासून पांढरे पट्टे मारण्यावरून तापलेल्या मराठी-जैन वादानंतर आज मालाडमधील जैन समाजाच्या शिष्टमंडळाने मनसेचे...

By: Team Navakal
BMC Election 2026 Voting Raj Thackeray
Social + WhatsApp CTA

 Raj Thackeray : मुंबईत गेले काही दिवसांपासून पांढरे पट्टे मारण्यावरून तापलेल्या मराठी-जैन वादानंतर आज मालाडमधील जैन समाजाच्या शिष्टमंडळाने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन मराठी भाषेत लिहिलेला माफीनामा सादर केला. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना सुनावले की आमची माथी भडकली तर काय होईल याचा विचार करा.काही दिवसांपूर्वी मालाडच्या चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाच्या प्रतिमेवर जैन समाजाचा ध्वज लावण्यात आला. यामुळे मराठी माणूस भडकला. मनसेने जाब विचारल्यावर जैन ध्वज काढण्यात आला. त्यात मुंबईत जैन समाजाकडून सार्वजनिक जागेत पांढरे पट्टे ओढले जात होते. त्यातून जैन समाजाविरोधात संताप वाढत होता. या घटनांनंतर निर्माण झालेला तणाव  मिटविण्यासाठी जैन समाजातील शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्याकडे मराठी भाषेतील लेखी माफीनामा सादर केला. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना कडक शब्दांत स्पष्ट इशारा दिला की, राजकीय पक्षांच्या नादाला लागून माथी भडकवून घेऊ नका. अति करत असाल आणि आमची डोकी भडकली, तर केवढे होईल याचा विचार करा. तुम्ही व्यापारी आहात, तुम्ही शांतपणेव्यापार करा. पांढरे पट्टे कशाला रंगवता आहात? त्यामागे हेतू काय? तुमचे मुनी येणार असतील तर त्यांच्यासाठी गालिचा घाला आणि नंतर ते गेल्यावर तो काढून टाका. मराठी अस्मितेचा आदर राखा.


गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील घाटकोपर, दादर, बोरिवली आणि गिरगाव आणि अन्य भागांतील काही सोसायट्यांमध्ये जैन धर्मगुरूंना चालण्यासाठी रस्त्यांवर आणि आवारात पांढर्‍या रंगाचे पट्टे मारण्याच्या प्रकारावरून वाद निर्माण झाला होता. यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. रस्त्यावर पांढरे पट्टे मारणे म्हणजे ‘सांस्कृतिक दहशतवाद’ असल्याचा आरोप करत मनसे नेत्यांनी हे पट्टे हटवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मालाड येथील दफ्तरी रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा पांढरा ध्वज लावल्याची घटना घडल्याने शिवप्रेमी आणि मनसैनिक संतापले होते. या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या व्यापारी आणि सामाजिक प्रतिनिधींनी राज ठाकरे यांची भेट घेत आपली चूक मान्य केली. यावेळी कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी राज ठाकरे म्हणाले की, तुम्हाला काय वाटते की वर दोन गुजराती बसले आहेत म्हणजे काहीही करू? तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्या अंगावर येऊ नका. तुमचा वापर केला जात आहे. तुमची माथी भडकवली जात आहेत. तुमची डोकी थोडीशी भडकतील, पण आमची डोकी भडकली, तर केवढे होईल याचा विचार करा. तुम्ही पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करत आहात. सोसायटीमध्ये धर्मगुरू येणार असतील तर त्यांच्या स्वागतासाठी कार्पेट टाका आणि भेट संपल्यानंतर ते काढून टाका. पांढरे पट्टे कसले मारत आहात? काय करायचे आहे पांढरे पट्टे मारून? तुम्ही वाहतूक विभागात आहात का पांढरे पट्टे मारायला? कोणत्याही सोसायटीने किंवा धर्माच्या लोकांनी असे करावे का? ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. मी ज्या परिसरात राहतो तिकडे आधीपासून कितीतरी गुजराती लोक राहतात. तेव्हा काही वाद झाला नाही. आताच का वाद होत आहे? गेल्या 10-12  वर्षांत हे सर्व का सुरू झाले आहे? तुम्ही व्यापारी लोक आहात, व्यापार करा आणि शांत जगा. राजकीय पक्षांकडून तुमचा वापर केला जात आहे. मराठी आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण व्हावा, हाच काहींचा उद्देश असावा.  धर्माचे कार्य करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखलेले नाही. जैन मुनी पद्मसागर हे माझ्या घरीही येऊन गेले आहेत. पण सार्वजनिक ठिकाणी पांढरे पट्टे मारून इतरांना त्रास होईल, असे प्रकार करू नका. मराठी अस्मितेचा आदर राखलाच गेला पाहिजे. तुमच्या समाजाच्या लोकांना तुम्ही आता हे समजावून सांगा.


यावेळी जैन समाजाच्या प्रतिनिधींनी घडलेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. कोणत्याही समाजाच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. जैन समाजाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या पत्रात नमूद केले की, 17 जून रोजी मालाड येथील दफ्तरी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोप पुतळ्यावर काही समाजकंटकांकडून जैन समाजाचा ध्वज लावण्यात आला होता. या घटनेमुळे शिवप्रेमी आणि मराठी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, याची आम्हाला जाणीव आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, त्यांचा जिरेटोप हा शौर्य, स्वाभिमान आणि मराठी अस्मितेचे प्रतीक आहे. अशा प्रतीकाचा सन्मान राखला गेला पाहिजे, याबाबत आम्ही पूर्णपणेसहमत आहोत. पत्रात पुढे म्हटले आहे की, या प्रकरणी मनसेचे विभाग अध्यक्ष महेश मनोहर फरकसे यांच्या आंदोलनानंतर ध्वज तत्काळ हटविण्यात आला आणि संबंधित घटनेबद्दल माफीही मागण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, मराठी बांधव, शिवप्रेमी, राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल जैन समाजाने दिलगिरी व्यक्त केली असून, भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही.

कामाला लागा, नाहीतर पद काढेन
राज ठाकरेंचा पदाधिकार्‍यांना इशारा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी दादर येथील सावरकर सभागृहात पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पदाधिकार्‍यांची कानउघाडणी करत संघटनात्मक कामात अधिक सक्रिय होण्याचे निर्देश दिले. स्थानिक प्रतिनिधींनी घरात बसून न राहता मैदानात उतरून काम करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामगिरी सुधारण्यासाठी 29 जूनपर्यंतची मुदत दिली. संघटन वाढीसाठी कोणत्या विषयांवर आणि कोणत्या पद्धतीने काम करायचे, याबाबत मार्गदर्शनही केले. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, शेवटचे  सांगत आहे, कामाला लागा. माझ्याकडे रिपोर्ट आल्यानंतर पदावरून हटवले तर माझ्याकडे येऊ नका. एसआयआर संदर्भातील  कामाला गती देण्याचे निर्देश देत त्यांनी मुंबईत पक्षाच्या बीएलओ नियुक्तीवर भर दिला. ते म्हणाले की, मुंबई शहरात किमान 3 हजार आणि उपनगरात 8 हजार बीएलओ हवेत. मात्र सध्या मनसेच्या बीएलओंची नोंदणी संख्या केवळ 997 इतकी आहे. पदाधिकार्‍यांनीही ढिम्म बसून राहू नका. घरात बसू नये. पायाला भिंगरी लावून फिरा. कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवा आणि संघटन मजबूत करा, असे निर्देश दिले.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या