Uddhav Thackeray : उबाठातील सहा खासदारांनी बंडखोरी करून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यांनी आजपासून वाशिम-यवतमाळ, हिंगोली या फुटीर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला. यातून ‘पलटवार’ मोहीमच सुरू केली आहे. आज यवतमाळ येथील उबाठाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बंडखोर खासदारांसह भाजपावर टीकेची झोड उठवत ते म्हणाले की, माझ्या सांगण्यावरून मी तुम्हाला निवडणुकीत दिलेले बुजगावणे तुम्ही निष्ठेपोटी निवडून दिले. त्यामुळे मतदारांची मी माफी मागतो. गद्दारी करणाऱ्यांनी जनतेच्या विश्वासाला काळे फासले आहे. त्यांना जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला म्हणजे जनतेलाच आहे. मी हलणार नाही. त्यांना पायदळी तुडवून त्यांच्या छातडावर झेंडा रोवून पुढे जायचे आहे. या गद्दारीची कीड चिरडायची आहे. आता गद्दार दिसला की जाब विचारायचा, त्याची जशी भाषा आहे तशाच पद्धतीने जाब विचारायचा.
फुटीर खासदार संजय देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंनी पहिला मेळावा घेतला. आ. आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई त्यांच्यासोबत उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक सडलेली पाने गेली आहेत. हरामखोर गेले, नमकहराम गेले, पण कट्टर शिवसैनिक हटलेला नाही. आता नमकहरामांना थारा द्यायचा नाही. हे लुटारू एवढे माजलेत की, राम मंदिर लुटायला निघाले. शेतकऱ्याला योग्य हमीभाव मिळत नाही. मात्र यांनी निवडून येऊन स्वत:चा हमीभाव वाढवला. त्यांनी आईची शपथ घेऊन गद्दारी केली. हे विकासनिधीच्या नावाने बोंबा मारत आहेत. पण मागील दोन वर्षांत हे कितीवेळा लोकसभेत हजर होते? कोणती आंदोलने केली? त्यांनी आईची शपथ घेऊन गद्दारी केली. पक्ष चोरला, चिन्ह चोरले तरी ठाकरे उभा आहे.
आमदार फोडल्यावर शिवसेना संपली होती, तर तुमच्या नाकावर टिचून जनतेने मशालीवर निवडून आलेले खासदार फोडण्याची वेळ का आली? यांना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचे म्हणून हे चालले आहे. कोटी कोटी रुपये देतात फोडायला आणि यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत. भाजपावर टीका करताना ते म्हणाले की, एसआयआरनुसार आधार, रेशनकार्ड, पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नाही, मग भाजपाचे सदस्यत्वच नागरिकत्वाचा पुरावा ठरणार का? आम्ही भाजपा सदस्य नाही. हा तो पक्ष नाही आणि हे असेच वागत राहिले तर हा पाकिस्तान जनता पक्ष होईल का हा प्रश्न निर्माण होतो. अयोध्या राममंदिरातील पैसे, चांदी चोरी होत आहे.
भाजपा हिंदूंच्या भावनांशी गद्दारी करत आहे. त्यांनी गद्दारी शिवसेनेशी नाही, तर हिंदुत्वाशी केली आहे. याचा जाब भाजपाला विचारावा लागेल. विकासनिधी भाजपाच्या बापाच्या मालकीचा आहे का? जेथे भाजपाविरोधी उमेदवार जिंकले तेथे भाजपाचे मतदार नाहीत का? ज्यांनी भाजपाविरोधी मतदान केले ती जनता पाकिस्तानातून आलेली नाही. आज जे फोडाफोडी करणारे आहेत त्यांना मला विचारायचे आहे की, अटलजी गेले. परंतु अडवाणी यांना तुम्ही अडगळीत टाकले. काँग्रेससोबत लढताना त्यांना कधी विकासनिधीची चणचण भासली नाही. अटलजी आणि अडवाणी यांनी विकासनिधी मिळत नाही म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता तर मोदी आणि शहा यांचा राजकीय जन्म झाला असता का? यांना फोडाफोडी यासाठी करायची आहे कारण मूळ प्रश्नांपासून जनतेचे दुर्लक्ष झाले पाहिजे.
फुटीरांना जाब विचारला पाहिजे. मी तुला निवडून आणले, तू माझ्याशी गद्दारी केली? मी भगवा आणि शिवरायांच्या निष्ठेला जागलो म्हणून तू खासदार झाला. अन्यथा तुला काडीचीही किंमत नव्हती. तू गद्दारी केली. पुढची तीन वर्षे तुम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे. दोन आठवड्यांपूर्वी खासदारांची बैठक घेतली, तेव्हा यवतमाळच्या खासदार महाशयांनी मला सांगितले की, मुलीची सोयरिक जुळवायची आहे, पाहुणे येणार आहेत. मी व्हिडिओवरून आलो तर चालेल का? शुभकार्याला मी मनाई का करू? आता मला काय माहीत मुलीची सोयरिक जुळवताना हे स्वत:ची सोयरिक तिकडे जुळवतील. मी रात्री फोन करून जुळले का विचारले तर म्हणे हो जुळले. दोन दिवसांनी कळले की, हेच सासरी गेले. हुंडा घ्यायला गेले होते. खोटे बोलत होते. आता गद्दारांच्या कळपात नांदा. खरे हिंदुत्व माणुसकी शिकवणारे आहे. मंदिर लुटणारे तुमचे हिंदुत्व आम्ही आमचे मानू शकत नाही. आम्हाला आता भाजपामुक्त राम पाहिजे. त्यासाठी उबाठा लवकरच आंदोलन करणार आहे.










