Home / महाराष्ट्र / TET Paper leaked : सीबीएसई, नीट पेपरफुटीचा धक्का ! आता टीईटी पेपर फुटला ! परीक्षा रद्द  

TET Paper leaked : सीबीएसई, नीट पेपरफुटीचा धक्का ! आता टीईटी पेपर फुटला ! परीक्षा रद्द  

TET Paper leaked सीबीएसईचा पेपर फुटला, त्यानंतर नीटचे पेपर फुटले, या धक्क्यातून विद्यार्थी अजून सावरलेले नाहीत तोवर आज शिक्षक पात्रता...

By: Team Navakal
tat
Social + WhatsApp CTA

TET Paper leaked सीबीएसईचा पेपर फुटला, त्यानंतर नीटचे पेपर फुटले, या धक्क्यातून विद्यार्थी अजून सावरलेले नाहीत तोवर आज शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‌‘टीईटी‌’चा पेपर फुटला! त्यामुळे उद्या होणारी टीईटी परीक्षा रद्द करण्यात आली. या प्रकरणाचे धागेदोरे थेट नीटप्रमाणे दिल्लीपर्यंत पोहोचत आहेत. जिथे पेपर तयार करून सुरक्षित ठेवले जातात तिथूनच हा पेपरही फुटला आहे. यात कोणकोण सहभागी आहेत याचा शोध सुरू झाला असून, तूर्त फुटलेला पेपर विकण्यासाठी भिवंडीत आलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ठाण्याचे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन केली.


या घटनेमुळे राज्यातील सुमारे 6 लाख 108 शिक्षक असलेल्या परिक्षार्थींना मोठा फटका बसला आहे. उद्या महाराष्ट्रात 1 हजार 728 केंद्रांवर दोन पेपरची ही परीक्षा होती. शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रिया आणि सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यावर म्हणाले की, राज्यात सध्या सर्वच फुटत आहे. पक्ष फुटले, नेते फुटले, प्रश्नपत्रिका फुटल्या, सरकार कशातच गंभीर नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न बाहेर आल्याची माहिती भिवंडी पोलिसांना मिळाल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर परीक्षा परिषदेने पारदर्शकतेच्या कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या.


या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रश्नपत्रिकेचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणातही प्रश्नपत्रिका उत्तर दिल्लीतून बाहेर पडल्याचे आरोप झाले होते. आता टीईटी परीक्षेतही दिल्ली कनेक्शन समोर आल्याने प्रश्नपत्रिका सुरक्षेची संपूर्ण साखळीच संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.प्रश्नपत्रिका तयार झाल्यानंतर ती बाहेर कशी पोहोचली? त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे? राज्याबाहेरील आरोपींपर्यंत ती कशी पोहोचली? असे अनेक प्रश्न आता तपास यंत्रणांसमोर उभे राहिले आहेत.


या घटनेनंतर भिवंडी पोलिसांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. अपर पोलीस आयुक्त अशोक दुधेंनी सांगितले की,  आम्हाला पेपरफुटीबाबत सकाळी  माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आम्ही कोनगाव पोलीस हद्दीत धाड टाकली. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले. राजीव शाह (बिहार), आकाश कुमार (बिहार) आणि धीरज कुमार (हरियाणा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे वय अनुक्रमे 45, 30 आणि 28 वर्षे आहे. हे तिघे दिल्लीतून आले होते.  ह्यांना दिल्लीतून पेपर मिळाले आहेत. ही प्रश्नपत्रिका तब्बल दीड कोटी रुपयांना त्यांना विकायची होती. कारवाईदरम्यान पोलिसांनी प्रश्नपत्रिकेचे चार संच, मोबाईल फोन, डेबिट कार्ड आणि इतर साहित्य त्यांच्याकडून जप्त केले.   जप्त करण्यात आलेले प्रश्नपत्रिकेचे संच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आले. पडताळणीत या प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न अधिकृत प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका आरोपीने  केंद्रीय  परीक्षेत पैसे देऊन भरती करण्याचा प्रयत्न  केला होता. एकाने परीक्षा दिली होती, पण तो नापास झाला आहे.  या प्रकरणात स्थानिक व्यक्तीचा सहभाग तूर्त आढळला नाही. या प्रकरणासाठी विशेष तपास पथक  स्थापन केले असून विविध कोचिंग क्लासेस, मध्यस्थ आणि संभाव्य ग्राहकांची चौकशी सुरू करण्यात येणार आहे.याबाबत पुणे परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे म्हणाल्या की, परीक्षा परिषदेच्या माध्यमातून आम्ही अत्यंत गोपनीय पद्धतीने पेपर तयार केले होते.  टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या.  आम्हीदेखील पेपर पहिले नाहीत.  ते उद्या वितरीत होणार होते.  कोणत्याही परिस्थितीत शिक्षक पात्रता परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पाडणे हा परीक्षा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या गैरप्रकाराची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.


उद्या टीईटी परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार होती. पेपर क्रमांक 1 सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 या वेळेत, तर पेपर क्रमांक 2 दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत होणार होता.  नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने सुरक्षा व्यवस्था उभारली होती. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक पडताळणी, फेस रेकग्निशन प्रणाली, मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देखरेखीची व्यवस्था करण्यात आली होती. मोबाईल, स्मार्ट वॉच आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर पूर्ण बंदी घालण्यात आली होती. प्रश्नपत्रिका पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या होत्या. पण एवढ्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेनंतरही प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बाहेर आल्याने संपूर्ण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एआय  बायोमेट्रिक, फेस स्कॅनिंग, सीसीटीव्ही सगळे होते. मग पेपर बाहेर आला कसा? असा सवाल आता उपस्थित होत आहे.


सोलापूरमधील विविध शिक्षक संघटनांनी शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. राज्यात वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांसाठी नैतिक जबाबदारी स्वीकारत शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांमुळे परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाला असून, पारदर्शक आणि विश्वासार्ह वातावरणात परीक्षा नेमकी कधी होणार?असा संतप्त सवाल परीक्षार्थी उपस्थित करत आहेत.


या प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. याबाबत  उबाठा आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की,  नीटचा पेपर फुटला, मागील काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटतो व आता टीईटीचा पेपर फुटला. भाजपाने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा, वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवे होते. देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवले आहेत. भाजपाने गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडत असून आपल्या राज्याला बदनाम करून ठेवले आहे. दरवर्षी तरुण-तरुणींनी फक्त आंदोलन करायचे का? आमच्या देशातील तरुणाईने आपल्या भविष्याची स्वप्न कधी पाहायची?


काँग्रेसने एक्सवरील पोस्टमध्ये पेपरफुटीचे सरदार कोण? विद्यार्थ्यांच्या भविष्याचे मारेकरी कोण? असा सवाल उपस्थित केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की,  एकेकाळी शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता आणि स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी महाराष्ट्राची ओळख होती. सध्या राज्याची ओळख पेपरफुटीच्या घटनांमुळे होत असल्याचे अत्यंत दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. काही भ्रष्ट प्रवृत्तींच्या कारवायांमुळे त्यांच्या मेहनतीवर एका क्षणात पाणी फिरले. ही केवळ पेपरफुटी नाही, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या कष्टांची आणि भविष्यातील संधींची चोरी आहे. राष्ट्रवादी  शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर हल्ला केला. ते म्हणाले की,  परीक्षा नीट पार पडत नाही तोच आज शिक्षक पात्रता परीक्षेचा  पेपर फोडून पेपर फोडणाऱ्या रॅकेटने पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिले. या सरकारचा जन्मच फोडाफोडीतून झाल्यामुळे कुठल्याही परीक्षेच्या पेपरफुटीला हे सरकार आळा घालू शकत नाही. सरकारने  याची जबाबदारीही घेऊन माफी मागावी.

भाजपाचे डबल इंजिन सरकार
डबल लीक! दीपकेंची टीका

देशातील नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणारे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी राज्यातील टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, केंद्र असो किंवा राज्यातील भाजपा सरकार, पेपरफुटी किंवा परीक्षा रद्द न करता एकही परीक्षा सुरळीत घेता आलेली नाही. भाजपाचे ‌’डबल इंजिन‌’ सरकार आता ‌’डबल लीक‌’ सरकार झाले आहे. 2017-18 मध्ये पात्र ठरलेल्या 18 हजार उमेदवारांपैकी सुमारे 8 हजार जण फेरतपासणीत अपात्र ठरले होते. लाच घेऊन शिक्षकांच्या जागा भरल्याचे अनेकजण सांगतात. पुण्यासह अनेक ठिकाणी टीईटीमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून शिक्षकांच्या जागांसाठी 1 ते 2 कोटी रुपये घेतले जात आहेत. आधी नीट परीक्षा आणि आता टीईटी पेपरफुटीमुळे परीक्षार्थींचे मोठे नुकसान झाले आहे.

उमेदवारांना नोंदणी शुल्क
पुन्हा भरण्याची गरज नाही

टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी उमेदवारांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या