Salim Sarang Emotional Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) प्रदेश उपाध्यक्ष तथा मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे (Muslim Welfare Association) राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांच्या एका भावनिक फेसबुक पोस्टने (Salim Sarang Emotional Post) राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. “दादा, तुमच्या जाण्याने फरक पडलाय” अशा शब्दांत त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीची खंत व्यक्त करत पक्षातील संवाद आणि कार्यपद्धतीबाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्याचा दावा
https://www.facebook.com/share/p/199r6ARSYM
सलीम सारंग यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवार (Former DCM Ajit Pawar) यांच्याशी असलेल्या नात्याचा उल्लेख करताना म्हटले आहे की, “दादा, तुम्हाला जाऊन आज पाच महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकत आहे, मात्र तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी दिवसेंदिवस अधिक जाणवत आहे. तुम्ही आमच्यासाठी फक्त पक्षाचे नेते नव्हता, तर कार्यकर्त्यांचा विश्वास होता.”

त्यांनी पुढे म्हटले की, पूर्वी कोणतीही अडचण आली की थेट नेतृत्वापर्यंत पोहोचणे शक्य होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून भेटीसाठी अपॉइंटमेंट (Appointment) घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते आणि अनेकदा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नाही.
‘माझ्या पाठीशी नेता आहे’ ही भावना हरवली
सारंग यांनी आपल्या पोस्टमध्ये कार्यकर्त्यांच्या मनातील भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. “तुमच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्त्याला वाटायचे की, माझ्या पाठीशी माझा नेता आहे. आज ती भावना हरवत चालली आहे. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, प्रश्न आणि संवादाकडे पूर्वीसारखे लक्ष दिले जात नाही,” असे त्यांनी नमूद केले.

बैठका (Meetings) कमी झाल्या आहेत, संवादाचा अभाव जाणवत आहे आणि कार्यकर्त्यांचा आवाज वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचतो आहे की नाही, असा प्रश्न पडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पक्षात नाराजीच्या चर्चांना उधाण

सलीम सारंग यांच्या या पोस्टनंतर पक्षातील काही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. सारंग हे पक्षातील महत्त्वाचे मुस्लिम चेहरा (Muslim Face) मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या सार्वजनिक भूमिकेमुळे ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे. काही राजकीय वर्तुळांमध्ये त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबतही तर्क-वितर्क (Speculation) व्यक्त केले जात आहेत.
रोहित पवारांचीही भावनिक पोस्ट चर्चेत
दरम्यान, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज पाच महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या या अपघाताने संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून सोडले होते. या घटनेला पाच महिने लोटले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर (Social Media) भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “प्रिय अजितदादा…., या महाराष्ट्राने तुमची आठवण काढली नाही असा एकही दिवस गेला नाही,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
रोहित पवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या रेवतीच्या विवाहसोहळ्याचा उल्लेख करताना म्हटले की, “प्रिय अजितदादा….. लग्नात मोठा जल्लोष होता, पण मामा म्हणून तुमची अनुपस्थिती सर्वांच्या मनाला चटका लावून गेली. जयच्या लग्नात तुम्ही केलेली धम्माल आजही सर्वांच्या स्मरणात आहे. रेवतीच्या लग्नातही तोच थाट, तोच रुबाब आणि तीच ऊर्जा (Energy) पाहायला मिळाली असती तर किती आनंद झाला असता.
प्रिय अजितदादा….. pic.twitter.com/k61bc4tsu5
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 28, 2026
शेतकरी प्रश्नांवरून सरकारवर टीका
आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी राज्यातील शेतकरी प्रश्नांवरूनही सरकारवर निशाणा साधला आहे. “तुम्ही असता तर फसवी कर्जमाफी (Loan Waiver) झाली नसती. अन्नदात्याला फसवले गेले नसते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मला रस्त्यावर उतरावे लागले नसते,” असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत सरकारने दिलेला शब्द अद्याप पूर्ण झालेला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
राजकीय चर्चांना वेग
सलीम सारंग आणि रोहित पवार या दोघांच्या भावनिक पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या परिस्थितीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः कार्यकर्ते आणि नेतृत्व यांच्यातील संवाद (Communication Gap), संघटनात्मक पोकळी (Organisational Vacuum) आणि निर्णय प्रक्रियेतील बदल यासंदर्भात विविध स्तरांवर चर्चा रंगत आहे.
सलीम सारंग यांच्या पोस्टमधील “दादा, तुमच्या जाण्याने फक्त एक नेता गेला नाही, तर कार्यकर्त्याला आपले म्हणणारा माणूस हरपला आहे” हा उल्लेख सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर पक्षातील कार्यकर्त्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
हे देखील वाचा –
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू
मन की बात’मध्ये नांदेडच्या पेठकर कुटुंबाचे कौतुक; ३,५०० ग्रामस्थांना दिले अपघात विमा संरक्षण
बीजिंगच्या १०९ मजली इमारतीवर विमान आदळले; पायलटचा मृत्यू, १३ जण जखमी










