Manoj Jamsutkar : मुंबईतील नामांकित सर जमशेटजी जीजीभॉय (जे. जे.) रुग्णालयाच्या औषध भांडार (औषधालय) विभागातील एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आता ऐरणीवर आला आहे. रुग्णालयाच्या या महत्त्वपूर्ण विभागातील असुविधांबाबत नुकतेच विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवण्यात आला असून, यामुळे प्रशासकीय अनास्थेचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
विधानसभेत गाजला मुद्दा-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार मनोज जामसुतकर यांनी विधानसभा अधिवेशनात जे. जे. रुग्णालयातील या गंभीर समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले. अत्यंत गरीब आणि गरजू रुग्णांचे हक्काचे ठिकाण असलेल्या जे. जे. रुग्णालयाच्या औषध भांडार विभागात गेल्या दीड वर्षांपासून वातानुकूलित यंत्रणा (एसी) बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सभागृहात मांडली. यामुळे रुग्णालयातील औषधांच्या गुणवत्तेवर आणि साठवणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
औषध साठवणुकीसाठी वातानुकूलित यंत्रणेचे महत्त्व-
वैद्यकीय क्षेत्रात औषधांची परिणामकारकता टिकवून ठेवण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा अत्यंत अनिवार्य मानली जाते. बहुतांश जीवरक्षक औषधे, लस आणि विविध रसायने एका विशिष्ट तापमानात (कूल टेम्परेचर) साठवून ठेवणे कायदेशीर आणि वैद्यकीयदृष्ट्या बंधनकारक असते. तापमान नियंत्रित न राहिल्यास ही औषधे खराब होण्याची किंवा त्यांची प्रभावी क्षमता कमी होण्याची दाट शक्यता असते. अशा अत्यंत संवेदनशील विभागात गेल्या अठरा महिन्यांपासून ‘एसी’ नसणे, ही रुग्णांच्या जिवाशी खेळणारी आणि अत्यंत खेदजनक बाब आहे.
नवाकाळच्या प्रतिनिधीशी विशेष संवाद
या गंभीर प्रकरणाची सखोल माहिती आणि सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी नवाकाळच्या प्रतिनिधी दिव्या सखाराम तळेकर यांनी आमदार मनोज जामसुतकर यांच्याशी थेट संवाद साधला. या वेळी त्यांनी रुग्णालयातील या दुरवस्थेबद्दल अधिक विस्तृत आणि सविस्तर माहिती दिली.
सर जे. जे. रुग्णालयात औषध घोटाळा आणि दलालांचे रॅकेट? आमदार मनोज जामसुतकर यांचा विधिमंडळात गंभीर आरोप; निपक्षपाती चौकशीची मागणी-
जे. जे. रुग्णालयातील प्रशासकीय अनागोंदी आणि औषध भांडाराची दुरवस्था आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचली आहे. “औषध भांडारात मागील दीड वर्षांपासून वातानुकूलित यंत्रणा (एसी) बंद असल्याने अनेक कफ सिरप आणि जीवनरक्षक औषधे गोठून त्यांची पावडर झाली आहे,” या धक्कादायक वास्तवावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक आमदार मनोज जामसुतकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात बोलताना त्यांनी रुग्णालय प्रशासन आणि बाहेरील खाजगी व्यावसायिक यांच्यात साटेलोटे असल्याचा थेट आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करून दलालांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे.
दीड वर्षांपासून एसी बंद; औषधे झाली खराब-
रुग्णालयातील दुरवस्थेबद्दल माहिती देताना आमदार मनोज जामसुतकर म्हणाले की, जे. जे. रुग्णालयातील औषध भांडाराची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. औषधांचा दर्जा टिकवण्यासाठी चोवीस तास वातानुकूलित यंत्रणेची आवश्यकता असते. परंतु, इथे दीड वर्षांपासून एसी बंद आहे. यामुळे कफ सिरपसारखी द्रव स्वरूपातील औषधे गोठून त्यांचे पावडरीत रूपांतर झाले आहे. मुळातच रुग्णालयात शासकीय कोट्यातून अत्यंत कमी प्रमाणात औषध पुरवठा होतो, आणि जे काही थोडेफार साठे उपलब्ध आहेत, तेही प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे खराब होत आहेत. या गंभीर बाबींकडे रुग्णालय प्रशासन पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“जे. जे. रुग्णालय ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही”आमदार जामसुतकर यांनी रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले-
“जे. जे. रुग्णालय माझ्या भायखळा मतदारसंघात येत असल्याने येथील स्थानिक रहिवासी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या तक्रारींचा ओघ सातत्याने सुरू असतो. जे. जे. हे राज्य सरकारचे अग्रगण्य रुग्णालय आहे, ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून गरीब लोक येथे या आशेने येतात की त्यांना मोफत उपचार आणि औषधोपचार मिळतील. मात्र, येथील बाह्यरुग्ण विभागात (OPD) रुग्णांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून, अडचणी सोडवण्याची जबाबदारी असलेले प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे.”
खाजगी लॅब आणि मेडिकल स्टोअर्ससोबत साटेलोटे?
आमदार जामसुतकर यांनी रुग्णालयाच्या आवारात सुरू असलेल्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. रुग्णालयात शासकीय सोयी-सुविधा उपलब्ध असतानाही, अगदी छोट्या छोट्या रक्ताच्या चाचण्या (ब्लड टेस्ट) आणि इतर तपासण्या रुग्णांना बाहेरून करून आणण्यास सांगितेले जाते. एवढेच नव्हे तर, रुग्णालयाच्या कोट्यातील औषधे देण्याऐवजी डॉक्टरांकडून खाजगी मेडिकल स्टोअर्सची महागडी औषधे चिठ्ठीवर लिहून दिली जातात.
यावरून रुग्णालय प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचारी आणि बाहेरील खाजगी लॅब चालक तसेच औषध विक्रेते यांच्यात मोठे ‘साटेलोटे’ (आर्थिक व्यवहार) असल्याचा दाट संशय निर्माण होत आहे. तिथे गरिबांची लूट करणारे दलाल सक्रिय असून या संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय आणि निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी जामसुतकर यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर केली आहे.
जे. जे. रुग्णालय प्रशासनाची संवेदनशून्यतेची पराकाष्ठा; सुधारणा न झाल्यास ‘हक्कभंग’ आणणार; आमदार मनोज जामसुतकर यांचा निर्वाणीचा इशारा-
मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयाच्या औषध भांडारातील वातानुकूलित यंत्रणा (एसी) दीड वर्षांपासून बंद असल्याचा आणि औषधे खराब होत असल्याचा अत्यंत संवेदनशील मुद्दा विधिमंडळात मांडून तीन ते चार दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही रुग्णालय प्रशासनाने यावर कोणतीही तातडीची पावले उचललेली नाहीत, अशी धक्कादायक माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भायखळ्याचे आमदार मनोज जामसुतकर यांनी दिली आहे. प्रशासनाच्या या ढिम्म आणि उदासीन कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, जर यात त्वरित सुधारणा झाली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विधिमंडळात ‘हक्कभंग प्रस्ताव’ दाखल करण्याचा निर्वाणीचा इशारा आमदार जामसुतकर यांनी दिला आहे.
तीन दिवसांनंतरही प्रशासन सुस्त; लोकप्रतिनिधींना माहिती देण्यास टाळाटाळ?
‘नवाकाळ’चे प्रतिनिधी दिव्या सखाराम तळेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार मनोज जामसुतकर यांनी रुग्णालय प्रशासनाच्या संवेदनशून्य कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, “विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून तीन-चार दिवस झाले आहेत. औषध भांडारातील दुरवस्था हा रुग्णांच्या आरोग्याशी निगडित अत्यंत संवेदनशील विषय आहे. असे असतानाही प्रशासनातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने अद्याप माझ्याशी संपर्क साधलेला नाही. ‘साहेब, तुम्ही हा महत्त्वाचा मुद्दा सभागृहात उचलला आहे, आम्ही यावर तातडीने ही कारवाई करत आहोत,’ असे सांगण्याचे साधे सौजन्यही प्रशासनाने दाखवलेले नाही.”
“निधी कुठे जातो?” शासकीय निधीच्या खर्चाबाबत संभ्रम-
आमदार जामसुतकर यांनी रुग्णालयाला मिळणाऱ्या शासकीय निधीच्या पारदर्शकतेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्य सरकारकडून जे. जे. रुग्णालयासाठी निधी मंजूर केला जातो. परंतु, हा निधी नेमका कुठे खर्च होतो, त्याचा विनियोग योग्य पद्धतीने केला जातो की नाही, की तो निधी तसाच पडून राहतो, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही. रुग्णालयाच्या विकासकामांचा किंवा निधीचा हिशोब गुलदस्त्यात ठेवला जात असल्याच ते म्हणाले.
स्थानिक आमदारांना अंधारात ठेवून कारभार; हक्कभंगाचा इशारा-
प्रशासकीय शिष्टाचाराचे उल्लंघन होत असल्याचे नमूद करत आमदार जामसुतकर म्हणाले:”मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी (स्थानिक आमदार) आहे आणि माझी पत्नी या भागाची नगरसेविका आहे. असे असूनही रुग्णालय प्रशासनाकडून आम्हाला कोणतीही माहिती दिली जात नाही. रुग्णालयातील कोणत्याही विभागाचे काम असो वा नवीन उपक्रमाचा शुभारंभ, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला साधी पूर्वकल्पना किंवा निमंत्रणही दिले जात नाही. अजूनही जर असच सुरु राहील तर मला त्यांच्या विरोधात ‘हक्कभंग प्रस्ताव’ (Breach of Privilege) दाखल करावा लागेल.”
केवळ जे. जे. नव्हे, तर सर्वच सरकारी व पालिकेच्या रुग्णालयांची स्थिती बिकट; ‘एमआरआय’, ‘सिटी स्कॅन’साठी रुग्णांना दोन-दोन महिन्यांची प्रतीक्षा? आमदार मनोज जामसुतकर यांचा संताप-
मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने होणाऱ्या औषधांच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, आता राज्यातील आणि मुंबई महानगरपालिकेच्या इतर सर्वच सरकारी रुग्णालयांच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव समोर आले आहे. “केवळ जे. जे. रुग्णालयच नाही, तर राज्यातील बहुतांश शासकीय आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशीच दुरवस्था असून, रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत,” असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार मनोज जामसुतकर यांनी केला आहे. ‘नवाकाळ’शी बोलताना त्यांनी रुग्णालयातील जुन्या व बंद पडलेल्या वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांना भोगाव्या लागणाऱ्या यातनांवर तीव्र शब्दांत प्रकाश टाकला.
सर्वच सरकारी व पालिका रुग्णालयांत अनागोंदी; मंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी
आमदार मनोज जामसुतकर यांनी स्पष्ट केले की, आरोग्य व्यवस्थेचे हे विदारक चित्र केवळ एका रुग्णालयापुरते मर्यादित नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आणि राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या बहुतांश रुग्णालयांमध्ये कारभार पूर्णपणे कोलमडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सर्व रुग्णालयांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जामसुतकर म्हणाले की, “मला कोणावरही आकसापोटी कारवाई करण्यात अजिबात रस नाही. माझा मुख्य उद्देश रुग्णालयांच्या कारभारात सुधारणा व्हावी हाच आहे. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. जर औषध भांडारातील एसी बंद पडल्याबरोबर तो तातडीने दुरुस्त केला गेला असता, तर कोट्यवधी रुपयांच्या औषधांचे नुकसान टळले असते आणि खराब औषधांमुळे रुग्णांच्या जिवाला असणारा धोकाही निर्माण झाला नसता.”
‘एमआरआय’ आणि ‘सिटी स्कॅन’साठी लांबच्या तारखा; रुग्णांच्या वेदनेत भर-
रुग्णालयातील वैद्यकीय चाचण्यांच्या दुरवस्थेवर बोट ठेवताना आमदार जामसुतकर यांनी अत्यंत वेदनादायी वास्तव मांडले. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना तातडीने तपासणीची गरज असताना, संबंधित विभागाचे डॉक्टर तसे लिहून देतात. मात्र, जेव्हा रुग्ण प्रत्यक्ष ‘एमआरआय’ (MRI), ‘सिटी स्कॅन’ (CT Scan) किंवा एक्स-रे (X-Ray) विभागामध्ये जातो, तेव्हा त्यांना थेट महिना ते दीड महिन्यानंतरची तारीख दिली जाते.
अतितातडीच्या (इमर्जन्सी) रुग्णांनाही अशा प्रकारे लांबच्या तारखा देणे म्हणजे त्यांच्या क्रूर थट्टा करण्यासारखे आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाने तोपर्यंत आपल्या वेदना सहन करत रिपोर्टची वाट पाहत बसायचे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या १-२ महिन्यांच्या विलंबाच्या कालावधीत रुग्णाचा आजार अधिक बळावतो आणि त्याचा शारीरिक त्रास कमालीचा वाढतो.
जुन्या मशिनी बदलून तात्काळ आधुनिक यंत्रणा उभारण्याची मागणी
या समस्येमागील मूळ कारणाचा उलगडा करताना आमदारांनी सांगितले की, जे. जे. रुग्णालयासह अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये आजही अत्यंत जुन्या आणि कालबाह्य झालेल्या मशिनी वापरल्या जात आहेत. यातील अनेक महागड्या मशिनी वारंवार बंद पडतात किंवा दुरुस्तीअभावी धूळ खात पडून आहेत. परिणामी, रुग्णांना वेळेत सेवा मिळत नाही. प्रशासनाने या सर्व जुन्या आणि नादुरुस्त मशिनी युद्धपातळीवर बदलून त्या जागी अत्याधुनिक, नवीन तंत्रज्ञानाची यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली पाहिजे. तसेच, ज्या मशिनी किरकोळ बिघाडामुळे बंद आहेत, दुरुस्त करून रुग्णांना जलदगतीने आरोग्य सेवा दिली पाहिजे.
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम निधीअभावी रखडले; केवळ ‘टाटा’ रुग्णालयात मिळणाऱ्या कर्करोग उपचारांची जे. जे. मध्ये गरज
मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या जागेचा प्रश्न लक्षात घेऊन राज्य सरकारने ‘जे. जे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र, राज्य सरकारकडून वेळेवर निधी उपलब्ध न झाल्यामुळे या अद्ययावत रुग्णालयाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, हा प्रकल्प रखडला असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार मनोज जामसुतकर यांनी केला आहे. ज्या रुग्णालयाचे लोकार्पण दोन वर्षांपूर्वीच होणे अपेक्षित होते, त्याला निधीअभावी आणखी दीड ते दोन वर्षे लागण्याची भीती त्यांनी व्यक्त केली असून, यामुळे गरीब रुग्ण हक्काच्या आरोग्य सेवेपासून वंचित राहत असल्याचे म्हटले आहे.
निधीअभावी कंत्राटदारांचे काम संथ; २ वर्षांपूर्वी होणारे लोकार्पण लांबणीवर
‘नवाकाळ’शी बोलताना आमदार जामसुतकर यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या रखडलेल्या कामाचे वास्तव मांडले. ते म्हणाले की, सध्याच्या जे. जे. रुग्णालयात जागा अपुरी पडत असल्याने आणि विविध चाचण्या तसेच उपचारांवर मर्यादा येत असल्याने सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची इमारत उभारली जात आहे. परंतु, शासनाकडून कंत्राटदारांना वेळेवर देयके (पेमेंट) न मिळाल्यामुळे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल कंत्राटदारांनी कामाचा वेग प्रचंड मंदावला आहे. कंत्राटदार कधी काम थांबवत आहेत, तर कधी आपले कामगार इतर प्रकल्पांवर वळवत आहेत. प्रकल्पाचे ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले असूनही, केवळ निधीच्या तुटवड्यामुळे उर्वरित कामाला कमालीचा उशीर होत आहे. सरकारने वेळीच निधी दिला असता, तर हे रुग्णालय केव्हाच जनतेच्या सेवेत दाखल झाले असते.
“कागदी योजनांचे सोंग बंद करा, मूलभूत आरोग्य सुविधा आधी द्या”
राज्य सरकारच्या धोरणांवर प्रहार करताना आमदार जामसुतकर म्हणाले:”राज्य सरकार केवळ नवीन नवीन योजना आणण्याचे सोंग करत आहे. अनेक योजना तर केवळ कागदावरच राहतात, त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणीच होत नाही. माझी सरकारला विनंती आहे की, अशा पोकळ घोषणा करण्यापेक्षा रुग्णांचे जे हाल होत आहेत ते थांबवा आणि आरोग्यासारख्या मूलभूत गोष्टींना प्राधान्य द्या. जे रुग्णालय दोन वर्षांपूर्वी सुरू व्हायला हवे होते, ते प्रशासकीय अनागोंदीमुळे आणखी दोन वर्षे रखडणार आहे. हा विलंब थेट गोरगरीब जनतेच्या जिवावर बेतणारा आहे.”
‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयात ‘टाटा’सारख्या कर्करोग उपचारांची आवश्यकता
रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाबाबत आमदार जामसुतकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा सुचवल्या आहेत. ते म्हणाले की, जर आपण एखाद्या रुग्णालयाला ‘सुपर स्पेशालिटी’ हे नाव देत असू, तर तिथली व्यवस्थाही जागतिक दर्जाची असायला हवी. संपूर्ण इमारतीमध्ये मध्यवर्ती वातानुकूलित (सेंट्रलाइज्ड एसी) यंत्रणेसह इतर आधुनिक सोयीसुविधा असणे अनिवार्य आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सध्या मुंबईत केवळ ‘टाटा मेमोरियल रुग्णालयात’ उपलब्ध असलेल्या प्रगत कर्करोग उपचार थेरपी (Cancer Therapies) जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. टाटा रुग्णालयावरील रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी आणि इतर गरीब कर्करोग रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी जे. जे. मध्ये ही व्यवस्था उभी राहिली पाहिजे. हे रुग्णालय केवळ नावापुरते ‘सुपर स्पेशालिटी’ न राहता, तिथे सामान्य जनतेला खऱ्या अर्थाने उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी शेवटी केली.
“रुग्णसेवा आमच्यासाठी राजकारण नव्हे, तर जिव्हाळ्याचा विषय; जे. जे. रुग्णालयातील ओपीडीच्या रांगा आणि खाजगी लूट थांबवा-
“सर जे. जे. रुग्णालय हे केवळ माझ्या भायखळा मतदारसंघाचा भाग नाही, तर तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. माझा जन्म आणि कर्मभूमी माझगावची असल्याने या परिसरातील गोरगरीब रुग्णांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळवून देणे, हे मी माझे आद्य कर्तव्य मानतो,” अशा भावना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार मनोज जामसुतकर यांनी व्यक्त केल्या. ‘नवाकाळ’शी विशेष संवाद साधताना त्यांनी जे. जे. रुग्णालयातील प्रशासकीय त्रुटी, बाह्यरुग्ण विभागातील (OPD) लांबच लांब रांगा आणि रुग्णांची होणारी खाजगी लूट थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे काय नियोजन आहे, यावर सविस्तर प्रकाश टाकला.
“रुग्णालय प्रशासन काही बाबतीत हताश; मूळ अडचण निधीची”
आमदार मनोज जामसुतकर यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी म्हणून रुग्णालयातील त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आणि त्या सुधारून घेणे हे आमचे सातत्यपूर्ण काम आहे. रुग्णालय प्रशासन अनेकदा सहकार्याची भूमिका घेते, परंतु काही गोष्टी त्यांच्याही आवाक्याबाहेरच्या असतात. वेळेवर निधी उपलब्ध न होणे ही प्रशासनाची सर्वात मोठी अडचण आहे. निधीअभावी अनेक निर्णय रखडतात आणि तिथे वरिष्ठ अधिकारीही हताश होतात. म्हणूनच, या खात्याच्या मंत्र्यांनी आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात थेट लक्ष घालून निधीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली.
ओपीडीचे नियोजन बदलण्याची गरज; ‘वेळ व्यवस्थापनाचा’ (Time Planning) सल्ला
रुग्णांच्या त्रासाचा पाढा वाचताना आमदार जामसुतकर म्हणाले की, जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला केस पेपर काढण्यापासून ते प्रत्यक्ष औषध मिळेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. ते सांगतात “जर आपण रुग्णालयाचा कायापालट करत असू, तर त्याची सुरुवात ओपीडी (OPD) सुधारण्यापासून झाली पाहिजे. रुग्णांना तासनतास रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी सुटसुटीत आणि अचूक ‘वेळ व्यवस्थापन’ (Time Planning) करणे आवश्यक आहे. तपासणी आणि चाचण्यांची प्रक्रिया जलद गतीने झाल्यास रुग्णांचा वेळ वाचेल आणि त्यांना वेळेवर उपचार मिळतील.”
सरकारी योजना कागदावर; प्रत्यक्ष मात्र बाहेरील लॅबकडून गरिबांची लूट
सर्वसामान्य नागरिक अत्यंत आशेने आणि विश्वासाने सरकारी रुग्णालयाची पायरी चढतात, कारण खाजगी रुग्णालयात गरिबांची मोठी आर्थिक लूट होते, याकडे आमदारांनी लक्ष वेधले. राज्य सरकार सर्व उपचार आणि चाचण्या मोफत केल्याचा डांगोरा पिटते, मोफत चाचण्यांची मोठी यादीही दाखवली जाते; परंतु प्रत्यक्ष जमिनीवर मात्र परिस्थिती पूर्णपणे उलटी आहे.
नव्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हे गैरप्रकार खपवून घेणार नाही
सध्या जे. जे. रुग्णालयाचा पुनर्विकास सुरू असून तिथे नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहत आहे. या पार्श्वभूमीवर ते सांगतात सध्या जुन्या इमारतीत ज्या काही त्रुटी किंवा गैरप्रकार सुरू आहेत, ते नवीन अद्ययावत रुग्णालयात अजिबात करू नका. नवीन वास्तूत सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या, औषधे आणि अद्ययावत सुविधा रुग्णालयाच्या आतच उपलब्ध झाल्या पाहिजेत. ‘नवाकाळ’च्या माध्यमातून सरकारकडे हीच मागणी करत असून, रुग्णांना हक्काचा आणि सन्मानाचा उपचार मिळेपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून आपला लढा अविरत सुरू राहील, असा ठाम निर्धार आमदार मनोज जामसुतकर यांनी शेवटी व्यक्त केला.










