Home / महाराष्ट्र / Sachin Ahir : सचिन अहिर बिनविरोध ! मविआची अखेर माघार

Sachin Ahir : सचिन अहिर बिनविरोध ! मविआची अखेर माघार

Sachin Ahir : उबाठातून काल शिंदेसेनेत गेलेले आमदार सचिन अहिर यांची आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतिपदावर बिनविरोध निवड झाली. या...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Sachin Ahir : उबाठातून काल शिंदेसेनेत गेलेले आमदार सचिन अहिर यांची आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतिपदावर बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे  जगन्नाथ अभ्यंकर रिंगणात होते. मात्र, सभागृहाची परंपरा आणि सर्वानुमते निवड व्हावी, या भूमिकेतून महाविकास आघाडीने ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आवाजी मतदानाद्वारे सचिन अहिर यांची एकमताने निवड करण्यात आली.


या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह महायुती आणि विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात उपस्थित होते. विधान परिषदेतील संख्याबळ लक्षात घेता महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. तरीही संसदीय परंपरा जपण्याच्या उद्देशाने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षाला उमेदवारी  अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले. यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात घोषणा करत, उपसभापती  निवड सर्वानुमते व्हावी अशी सभागृहाची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही  उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत, असे सांगितले. त्यानंतर सभागृहात आवाजी मतदान घेण्यात आले आणि सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.


सचिन अहिर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, सचिन अहिर यांच्या निवडीबद्दल विरोधी पक्षाचेही आभार मानतो. 1999 मध्ये मी आणि सचिन अहिर प्रथमच विधानसभेत निवडून गेलो होतो. अहिर या शब्दाचा अर्थ गोपालक आणि निर्भीड असा आहे. माझा त्यांच्याशी अनेक वर्षांचा परिचय असून ते अत्यंत निर्भीडपणे काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. उपसभापतिपदावर बसल्यानंतर प्रत्येक सदस्याला समान न्याय द्यावा लागतो. सचिन अहिर ही जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडतील, असा मला विश्वास आहे. गिरणी कामगार संघटनेतील कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. 1999 मध्ये प्रथम आमदार झाले आणि त्यानंतर सलग तीन वेळा विधानसभेत निवडून आले. 2009मध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. अभ्यासू मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. एखादा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला की काय अपेक्षा आहे? असे विचारून तो सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. अहिर जेव्हा विधान परिषदेत आले, तेव्हा ते धनुष्यबाण चिन्हावरच आले होते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांनी पक्ष बदललेला नाही.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सचिन अहिर यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची शैली वेगळी असते. टीममध्ये ऑलराऊंडर खेळाडू असले तरी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात. अहिर याच्या नावातच सचिन आहे. एक सचिन (तेंडुलकर) देशाचे नाव उज्ज्वल करून निवृत्त झाला. आता दुसरा सचिन पॅड बांधून नव्या इनिंगसाठी मैदानात उतरला आहे आणि मैदान गाजवायला सज्ज आहे.

महापुरुषांंना अभिवादन
सभापतीपदी निवड झाल्यावर सचिन अहिर यांनी सर्वप्रथम गेटवे ऑफ इंडिया येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. सरतेशेवटी त्यांनी हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना
वंदन केले.

बेस्ट कामगार सेनेचा आज मेळावा! नवा अध्यक्ष ठरणार
बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष व उबाठा आमदार सचिन अहिर यांनी साथ सोडल्यानंतर उबाठाकडून डॅमेज कंट्रोलसाठी हालचालींना वेग आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक घेत बेस्ट कामगार सेनेच्या वरळीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. उद्या 2 जुलै रोजी बेस्ट कामगार सेनेचा महत्त्वाचा मेळावा होणार आहे. काल मातोश्री निवासस्थानी ही बैठक पार पडली. 2025 ऑक्टोबरपासून सचिन अहिर हे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बेस्टने तीन दिवसांचा यशस्वी संपही केला होता. अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाकडून हालचाली सुरू असून, उद्या 2 जुलै रोजी बेस्ट कामगार सेनेचा महत्त्वाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात नव्या अध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता असून, आता हे पद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या