Home / महाराष्ट्र / Maharashtra Politics: ‘ऑफर आली तर नक्कीच…’; अमोल कोल्हेंच्या विधानाने ऑपरेशन तुतारीची चर्चा

Maharashtra Politics: ‘ऑफर आली तर नक्कीच…’; अमोल कोल्हेंच्या विधानाने ऑपरेशन तुतारीची चर्चा

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अत्यंत वेगवान आणि अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने...

By: Team Navakal
Maharashtra Politics: 'ऑफर आली तर नक्कीच…'; अमोल कोल्हेंच्या विधानाने ऑपरेशन तुतारीची चर्चा
Social + WhatsApp CTA

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अत्यंत वेगवान आणि अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ राबवत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आणि त्यांचे 6 खासदार आपल्या गोटात सामील केले. हा धक्का ताजा असतानाच अवघ्या 8 दिवसांत सचिन अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची लॉटरी लावून शिंदेंनी ठाकरेंना दुसरा झटका दिला.

आता हाच राजकीय मोर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी नाशिकमध्ये केलेल्या एका विधानामुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी सुरू झाली आहे.

खासदार अमोल कोल्हे नक्की काय म्हणाले?

सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्यावरील आगामी मालिकेच्या संदर्भाने खासदार अमोल कोल्हे नाशिकमध्ये आले होते. तिथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा रखडलेला मुद्दा लावून धरला.

“पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली आहे, मात्र यावर तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे,” असे कोल्हे म्हणाले.

या प्रकल्पावर बोलताना कोल्हेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘इन्फ्रामॅन’ म्हणून तोंडभरून कौतुक केले. दिल्लीतही त्यांच्या या कामाची प्रशंसा होते, असे सांगत त्यांनी रेल्वेचा मुख्य मार्ग बदलू नये, अशी मागणी केली.

विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळे या रेल्वेचा मार्ग बदलला का? आणि तुम्हाला सत्ताधाऱ्यांकडून काही ऑफर आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, कोल्हे म्हणाले, “अशी कोणतीही ऑफर अजून आलेली नाही, पण जर आली तर नक्की विचार करू!”

‘ऑफर आली तर विचार करू’ या विधानाचा नेमका अर्थ काय?

अमोल कोल्हेंच्या या एका वाक्यामुळे राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन तुतारी’ यशस्वी होणार का, अशा चर्चांना उधाण आले. त्यावर स्पष्टीकरण देताना कोल्हे यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली.

ते म्हणाले की, “जर राजाभाऊ वाझे आणि अमोल कोल्हे महायुतीत गेले तरच पुणे-नाशिक रेल्वे होणार असेल, तर हा विकास कामाचा प्रकल्प आहे की लोकप्रतिनिधींवर दबाव आणून पक्षांतर घडवण्याचे माध्यम? आधी ऑफर तर येऊ द्यात, जेणेकरून या रेल्वेच्या मुख्य मार्गाबद्दल कोणीतरी बोलेल. मी केवळ ‘विचार करू’ असे म्हणालो आहे, ‘पक्ष सोडून जाऊ’ असे म्हटलेले नाही. माझ्यासाठी वैयक्तिक राजकारणापेक्षा पुणे-नाशिक रेल्वे होणे जास्त महत्त्वाचे आहे.”

‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांवर आमदार रोहित पवारांचा पलटवार

अमोल कोल्हेंच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तातडीने प्रतिक्रिया देत पक्षातील अंतर्गत ऑल इज वेल असल्याचा दावा केला:

  • शरद पवारांवर विश्वास: “राष्ट्रवादीचा कोणताही खासदार किंवा आमदार शरद पवारांची साथ सोडणार नाही. या केवळ हवेतल्या गप्पा आणि चर्चा आहेत,” असे रोहित पवार म्हणाले.
  • मालिका बंद पाडल्याचा आरोप: अमोल कोल्हे यांची सुरू असलेली मालिका सत्ताधारी पक्षातीलच काही नेत्यांनी दबाव आणून बंद पाडली आहे, त्यामुळे ते अशा सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा विचार स्वप्नातही करणार नाहीत, असा दावा रोहित पवारांनी केला.
  • नेत्यांचा थेट संपर्क: आगामी काळात मतदारसंघात फेररचना होणार असल्याने खासदार फोडण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे स्वतः सर्व आमदार आणि खासदारांच्या सतत संपर्कात असून, विरोधकांचे हे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
Web Title:
संबंधित बातम्या