America’s Time Capsule : अमेरिकेच्या २५० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त फिलाडेल्फियातील ‘इंडिपेंडन्स नॅशनल हिस्टॉरिकल पार्क’मध्ये एक ऐतिहासिक आणि भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा ‘टाइम कॅप्सूल’ (America’s Time Capsule) प्रकल्प राबवण्यात आला असून ही कॅप्सूल जमिनीत सुरक्षितपणे पुरण्यात आली आहे. सुमारे ९०० पौंड (४०८ किलो) वजनाची ही कॅप्सूल २५० वर्षांनंतर, म्हणजेच २२७६ मध्ये अमेरिकेच्या ५०० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (500th anniversary)उघडली जाणार आहे.
भविष्यातील पिढ्यांना (Future Generations) २०२६ मधील अमेरिका कशी होती, तिची जीवनशैली, संस्कृती, तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल कसे होते हे समजावे, यासाठी या कॅप्सूलमध्ये देशातील सर्व ५० राज्ये आणि विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुमारे २०० वस्तू काळजीपूर्वक ठेवण्यात आल्या आहेत. या संग्रहात लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या डिजिटल संग्रहाची मानवनिर्मित ‘सिंथेटिक डीएनए’स्वरूपातील प्रत, ऐतिहासिक दस्तऐवज, नागरिकांचे संदेश आणि सांस्कृतिक प्रतीकांचा समावेश आहे.

या कॅप्सूलमध्ये अमेरिकन इतिहासाचे विविध पैलू दर्शवणाऱ्या अनेक दुर्मिळ वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. त्यात अमेरिकन गृहयुद्धातील गरुडाची पिसे, शीतपेयाची बाटली, व्हेलचे हाड, जगातील सर्वात मोठ्या जिप्सम वाळवंटातील वाळू, राईट बंधूंच्या पहिल्या विमानाचे कापड तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित भविष्यातील अंदाज यांचा समावेश आहे.
ही संपूर्ण कॅप्सूल उच्च दर्जाच्या गंजरोधक ‘स्टेनलेस स्टील’पासून तयार करण्यात आली आहे. पाणी किंवा आर्द्रता आत प्रवेश करू नये यासाठी विशेष बेल-जार प्रकारचे संरक्षक कव्हर बसवण्यात आले आहे, ज्यामध्ये नियंत्रित हवा साठवून कॅप्सूल पूर्णपणे कोरडी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.४ जुलै रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याला २५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा कॅप्सूल अधिकृतपणे जमिनीत स्थापित करण्यात आला. या विशेष आवृत्तीत ५० राज्यांतील नागरिकांनी निवडलेल्या प्रतीकात्मक वस्तूंचाही समावेश आहे.
कॅप्सूलमागील तांत्रिक संरचना
या टाइम कॅप्सूलचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे दीर्घकालीन संरक्षण. वैज्ञानिकांच्या मते, २५० वर्षे वस्तू सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान होते. त्यामुळे पाणी, गंज, आर्द्रता आणि हवामानापासून संरक्षण करणारी बहुपातळी संरचना तयार करण्यात आली.

कॅप्सूल बेलनाकार (सिलिंडर) स्वरूपात तयार करण्यात आली आहे, कारण चौकोनी संरचनेच्या कोपऱ्यांवर वेळेनुसार कमकुवतपणा निर्माण होऊन पाणी शिरण्याचा धोका वाढतो.कॅप्सूल आधीच पूर्णपणे सील करण्यात आली असून त्यासाठी विशेष इंडियम धातूचा वापर करण्यात आला आहे. हा मऊ धातू सूक्ष्म भेगा भरून काढतो आणि पूर्ण सीलिंग सुनिश्चित करतो.कॅप्सूलमध्ये सुमारे ३५% नियंत्रित आर्द्रता राखण्यात आली आहे. जास्त आर्द्रतेमुळे कागद खराब होण्याचा धोका आणि पूर्ण कोरडेपणामुळे वस्तू तुटण्याचा धोका असल्याने हा समतोल राखण्यात आला आहे.ही कॅप्सूल सुमारे १० फूट खोल जमिनीत पुरण्यात आली आहे, जिथे तापमानातील चढ-उतार कमी असतात. त्यावर आणखी एक स्टीलचा संरक्षक सिलिंडर बसवण्यात आला असून दोन्ही थरांमध्ये हवेचा थर ठेवण्यात आला आहे, जो बाहेरचे पाणी आत येण्यापासून रोखतो.प्रमुख वैज्ञानिक मायकल बेरिला यांच्या मते, जर या कॅप्सूलमध्ये पाणी पोहोचले तर त्याचा अर्थ फिलाडेल्फिया शहर गंभीर पूरस्थितीत असेल — त्यामुळे ही रचना केवळ कॅप्सूल नव्हे तर एक मोठी पर्यावरणीय सुरक्षितता प्रणाली आहे.
जगातील प्रसिद्ध टाइम कॅप्सूल
- जगातील सर्वात प्रसिद्ध ‘टाइम कॅप्सूल’मध्ये ‘क्रिप्ट ऑफ सिव्हिलायझेशन’चा उल्लेख केला जातो. हे सुमारे ६,००० वर्षे बंद ठेवण्यासाठी तयार करण्यात आले असून अटलांटा येथील ओगलेथॉर्प विद्यापीठात ठेवले आहे. यात पुस्तके, ऑडिओ रेकॉर्डिंग, उपकरणे आणि दैनंदिन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत आणि ते ८११३ साली उघडले जाणार आहे.
- न्यूयॉर्कमध्ये १९३९ मध्ये दफन करण्यात आलेले ‘वेस्टिंगहाउस टाइम कॅप्सूल’ ६९३९ साली उघडले जाणार आहे.

- भारतातही १९७३ मध्ये लाल किल्ल्याजवळ ‘कलपात्र’ नावाचा टाइम कॅप्सूल दफन करण्यात आला होता, जो १९७७ मध्ये बाहेर काढण्यात आला, मात्र त्यातील माहिती पूर्णपणे सार्वजनिक झाली नाही.
हे देखील वाचा –
अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर; केतनच्या मृत्यूनंतर आजोबांची प्राणज्योत मालवली
पद उपकार म्हणून मिळत नाहीत’; वडिलांच्या समर्थनार्थ किरण अहिर मैदानात
पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी केइको फुजीमोरी; निवडणूक आयोगाची अधिकृत घोषणा










