Cloudburst : राज्यात गेले काही दिवस सुरू असलेले जोरदार पावसाचे सत्र आजही कायम राहिले. या पावसामुळे आज नव्याने बांधलेल्या मिसिंग लिंक बोगद्याजवळ दरड कोसळल्याने पुणे-मुंबई जुना व नवा महामार्ग आणि कनेक्टिंग लिंक हे सर्वच वाहतुकीसाठी बंद होऊन दोन्ही शहरांतील संपर्क पूर्णपणे तुटला. उरण येथील जेएनपीए परिसरात वाहणार्या जोरदार वादळी वार्यामुळे जहाजातील कंटेनर हवेने उडून खाली पडल्याने एका कामगाराचा मृत्यू, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूर, दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींच्या दुर्घटनांची मालिका सुरू राहिली. मुंबईत पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. राज्यभर उद्याही मुसळधार पाऊस सुरू राहाणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले असून, उद्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसदृश अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यानुसार प्रशासनाने हाय अलर्ट जारी करून शाळा, महाविद्यालये आणि त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी देवस्थाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात उद्या ढगफुटीसदृश पावसाची शक्यता व्यक्त करत प्रशासनाला सावधगिरीच्या सूचना दिल्या. या परिसरात सुमारे 300 मिमीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान विभागाच्या इशार्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना सूचित केले की, नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी या पाच तालुक्यांतील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ग्रामीणमधील आठवडी बाजारही रद्द केले आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तशृंगी देवस्थान एक दिवसासाठी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा आणि शेतकर्यांनीही शेतात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पूरप्रवण भागातील नागरिकांचे स्थलांतर, नाले-जलवाहिन्यांची स्वच्छता, लहान बंधार्यांचे दरवाजे उघडे ठेवणे, धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदोबस्त तसेच बचाव पथक, पोलीस, होमगार्ड, रुग्णवाहिका आणि यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणेतयारीत आहे.
मुसळधार पावसाचा फटका आज मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि मुंबई-पुणे रेल्वे मार्गाला बसला. खंडाळा घाटाजवळ दरड कोसळल्याने द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारा मार्ग बंद झाला. कर्जत-लोणावळा दरम्यान मंकी हिल परिसरात रेल्वे रुळांवर दगड व माती आल्याने मध्य रेल्वेने मुंबई-पुणे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द केल्या.पुण्याच्या मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण गावात दरड कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. पहाटे साडेचारच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग घरावर कोसळल्याने नंदकुमार दत्तू तिकोणे, त्यांची पत्नी अनिता तिकोणे आणि मुलगा ज्ञानेश्वर (माऊली) तिकोणे हे मातीच्या ढिगार्याखाली गाडले गेले. तर ओझर्डे-सडवली रस्ता वाहून गेला असून शिवणे-सडवली पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावर दरडी कोसळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुणे-मुंबईदरम्यानची एसटी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. सकाळी मुंबईकडे निघालेल्या चार एसटी बसेस उर्से टोलनाका परिसरातून सुरक्षितपणे पुण्याकडे परत बोलावण्यात आल्या. मुंबई-पुणे महामार्गावरील फूड मॉलमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. पुणे-सीएसएमटी रेल्वे मार्गावरील डेक्कन, सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. दरड कोसळल्याने बंद केलेली खंडाळा ते मंकी हिल दरम्यानची वाहतूक दुपारनंतर सुरू केली होती.
मुंबईत कांजूरमार्ग-विक्रोळी स्थानकांदरम्यान ओव्हरहेड ईलेक्ट्रिक वायरवर प्लास्टिक अडकल्याने मध्य रेल्वेची लोकल वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या बिघाडामुळे दोन लोकल गाड्या मार्गातच थांबल्या होत्या. मुंबईतील हिंदमाता, सायन, अंधेरी सबवे, कुलाबा आणि अन्य सखल भागांत आज पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी साचले. कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांनुसार जुलै महिन्याच्या सरासरी पावसाच्या 90 टक्क्यांहून अधिक पाऊस अवघ्या पाच दिवसांत झाला. मीरा-भाईंदर शहरात मेट्रो-9 प्रकल्पातील दीपक हॉस्पिटलसमोरील मेडतिया मेट्रो स्थानकावर जोरदार वार्यासह झालेल्या पावसामुळे स्थानकावरील काही पत्रे उडाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर खवटी येथे दरड कोसळली. कशेडी घाटातही रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
रायगडमध्ये कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केले. नदीच्या पुराच्या पाण्याने रोहा शहराला वेढले. रेवदंडा -नागोठणे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाली येथील प्रसिद्ध बल्लाळेश्वर मंदिरात पाणी साचले. रोहा बाजारपेठ पाण्याखाली गेली. सावित्री नदीला पूर येण्याची स्थिती निर्माण झाल्याने महाडच्या नागरिकांनी मुंबई – गोवा महामार्गावर वाहने उभी केली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे पाणी साचल्याने चिपळूणची बाजारपेठ बंद झाली. या परिसरातील शिव, वशिष्ठी नदीला पूर आला आहे. खेडला आज सकाळपर्यंत 213 मिमी पावसाची नोंद झाली. कोकणात जाणार्या जनशताब्दी, तुतारी, कोकणकन्या एक्स्प्रेस सुमारे 2 तास उशिरा धावत होत्या. कोल्हापुरात राजापूर बंधार्याची पाणी पातळी वाढली. तर पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. 42 बंधारे पाण्याखाली गेले. गडहिंग्लज – गगनबावडा परिसरात तुफान पाऊस झाला. मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
मुंबईसह राज्यात अतिवृष्टी
पंजाब डख यांचा अंदाज खरा
मुंबईसह राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून दिवसभर अतिमुसळधार झाल्याने हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात व्यक्त केलेला अतिवृष्टीचा अंदाज खरा ठरल्याची चर्चा आहे. डख यांनी मुंबई, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यांनी म्हटले होते की, 2 ते 8 जुलैदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय होऊन त्याचा परिणाम राज्यावर होईल. मुंबईत या कालावधीत एकूण 1,000 मिमीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो. या काळात दररोज 150 ते 200 मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले होते.
जेएनपीएत दुर्घटना
उरण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी मध्यरात्रीपासून वादळी वार्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. या वादळी वार्यामुळे जेएनपीए परिसरातील एनएसएफटी टर्मिनलमध्ये उभे असलेले काही कंटेनर अचानक कोसळून त्याखाली कामगार अडकल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत बिहार येथील अमितकुमार किशोर प्रसाद (19) या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची, तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळत आहे.
आज सकाळी टर्मिनलमध्ये नियमित काम सुरू असताना अचानक जोरदार वार्यामुळे उभे असलेले काही रिकामे कंटेनर वार्याने उडून कामगारांच्या अंगावर कोसळले. हा प्रकार इतका अचानक घडला की, कामगारांना स्वतःचा बचाव करण्याचीही संधी मिळाली नाही. दुर्घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या गंभीर दुर्घटनेबाबत जेएनपीए प्रशासनाशी संपर्क साधूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. इतर संबंधित शासकीय यंत्रणांनीही याबाबत मौन बाळगल्याचे दिसून आले. त्यामुळे नेमकी घटना काय घडली, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, वादळी वार्याचा अंदाज असतानाही काम सुरू का ठेवण्यात आले, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही कामगारांनी कंटेनर कोसळल्याच्या घटनेला दुजोरा दिला असून, सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पुन्हा झाडे कोसळली
मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वार्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात झाडे कोसळण्याची मालिका सुरूच आहे. वांद्रे येथे विक्रांत सर्कल परिसरात आज आणखी एक मोठे झाड कोसळून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार कारचा चक्काचूर झाला. अंधेरी पश्चिमेतील गावठाण, गल्ली क्रमांक 1, मदिना हाऊस परिसरात वृक्ष कोसळला. मीरा-भाईंदर येथे झाड कोसळून 2 जण जखमी झाले. ठाणे, मीरा-भाईंदर आणि नालासोपारा येथे वादळी वार्यामुळे होर्डिंग, पत्रे आणि झाड कोसळण्याच्या घटना घडल्या. ठाण्यात आरटीओ कार्यालयाबाहेर झाड कोसळले. त्याचबरोबर वृंदावन बसथांबा परिसरात झाड कोसळून इमारतीवर टेकले. झाड हटविण्याच्या कामादरम्यान 32 वर्षीय अग्निशमन जवान अंकित यादव यांच्या पायाला कटर मशीनमुळे गंभीर दुखापत झाली. पोखरण रोड क्रमांक 1 उपवन तलावाजवळ झाड कोसळल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला. ठाणे-बेलापूर मार्गावर झाड उन्मळल्याने वाहनाचे नुकसान झाले. जीटीबी नगर स्थानक पनवेलकडे जाणार्या डाऊन हार्बर मार्गावर झाडाची फांदी रेल्वे रुळांवर पडल्याने रेल्वे वाहतूक सुमारे 25 मिनिटे विस्कळीत झाली होती. सानपाडा येथे नाना कोळेकर सोसायटीच्या भिंतीवर झाड कोसळले. दादर पूर्व येथील चित्रा सिनेमागृहाबाहेर मोठे झाड कोसळले. त्यामुळे एका गाडीचे नुकसान झाले. झाड कोसळण्याच्या घटनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत म्हणाले की, मुंबईत गेल्या वर्षी 800 झाडे पडली होती. काल एका दिवसात 350 झाडे कोसळली. आपण सर्व तयारी केली होती, पण निसर्ग बदलल्याने आपत्ती ओढावली.
7,120 कोटींच्या ’मिसिंग लिंक’ची संरक्षक भिंत 2 महिन्यांतच कोसळली
मुंबई-पुणे ’मिसिंग लिंक’ प्रकल्पालाही पहिल्याच पावसाचा फटका बसला. दोन महिन्यांपूर्वी गाजावाजा करत उद्घाटन केलेल्या या मार्गावरील बोगद्याच्या संरक्षक भिंतीचा काही भाग पुलावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. बोगदा आणि मिसिंग लिंकवर अक्षरशः धबधबा कोसळत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. सुमारे 7,120 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात बदल होऊन स्लॅब व संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला असून, बोगद्याला कोणतीही हानी झालेली नाही. पाऊस ओसरल्यानंतर तज्ज्ञांकडून तांत्रिक तपासणी केली जाणार असून, मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेबाबत विधानसभेत निवेदन देताना म्हटले की, मुंबई-पुणे महामार्गावरील ज्या ठिकाणी दरड कोसळली, त्या भागात सरासरीपेक्षा जवळपास तिप्पट पाऊस झाला. त्यामुळे 100 टनांहून अधिक माती आणि दगड खाली आले. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही निर्माण झाली नव्हती. त्यामुळे काही लहान वाहने अडकली होती. विरोधकांच्या टीकेवर उत्तर देताना त्यांनी म्हटले की, ज्यांना केवळ टीका करायची आहे, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, कनेक्टिंग लिंकला कोणतीही हानी पोहोचलेली नाही. दरड समोरील डोंगर उतारावर कोसळल्याने ही परिस्थिती उद्भवली. भ्रष्टाचाराचे आरोप करणार्यांनी स्वतःच्या कार्यकाळातील कामगिरीही पाहावी. 2013 मध्ये हा प्रकल्प अशक्य असल्याचे सांगून फाईल बंद केली होती. मात्र महायुती सरकारने धाडस दाखवत हा प्रकल्प पूर्ण केला.
मुंबईसह नाशिकला रेड अलर्ट
ताशी 80 किमीने वारे वाहणार
हवामान विभागाने उद्यासाठी मुंबई, ठाणे, रायगडसह नाशिक, पुणे आणि सातारा भागांसाठी रेड अलर्ट कायम ठेवला आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. जोरदार वार्यांमुळे झाडे उन्मळून पडणे, जुन्या व कच्च्या इमारतींचे नुकसान होणे, पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, झाडे, होर्डिंग आणि वीज खांबांपासून दूर राहावे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन हवामान विभागाचे बिक्रम सिंग यांनी केले आहे. मुंबईत उद्याही शाळा-कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे उद्या ढगफुटीचा इशारा असल्याने तेथेही शाळा, कॉलेज उद्या बंद राहणार आहेत.










