Beauty Cream Ban: गोरे होण्यासाठी किंवा चेहरा उजळण्यासाठी जर तुम्ही बाजारातील विविध ब्युटी प्रॉडक्ट्स वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) प्रयोगशाळेतील चाचणीनंतर महाराष्ट्रात ३ नामांकित ब्युटी क्रिम्सवर तातडीने बंदी घातली आहे. या क्रिम्सच्या वापरामुळे, विक्रीमुळे आणि वितरणावर राज्यात तात्काळ रोख लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एफडीएने केलेल्या तपासणीत या सौंदर्य प्रसाधनांमध्ये पारा (मर्क्युरी) आणि शिसे (लेड) यांसारखे अत्यंत विषारी जड धातू सुरक्षिततेच्या मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचे आढळून आले आहे. आरोग्य अधिकार्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, या क्रिम्सच्या सततच्या वापरामुळे त्वचेचे गंभीर आजार, किडनीचे विकार आणि मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात.
बंदी घालण्यात आलेल्या ३ ब्युटी क्रिम्सची नावे
प्रशासनाने खालील तीन सौंदर्य प्रसाधनांना असुरक्षित आणि मानकांनुसार अत्यंत निकृष्ट दर्जाचे घोषित केले आहे:
- गोरी ब्युटी क्रिम (Goree Beauty Cream): मूळची पाकिस्तानी बनावट असलेली ही क्रिम भारतात मोठ्या प्रमाणावर विकली जात होती.
- फेस फ्रेश गोल्ड ब्युटी क्रिम आणि ब्युटी सिरम (Face Fresh Gold Beauty Cream & Beauty Serum): या क्रिमला देखील आरोग्यासाठी घातक ठरवण्यात आले आहे.
- गोल्डन स्टार ब्युटी क्रिम (Golden Star Beauty Cream): या क्रिमच्या दर्जाबाबत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.
पॅकिंगवर उत्पादकाची माहितीच नाही; मुंबईत गुन्हा दाखल
तपासणीदरम्यान या कंपन्यांनी सौंदर्य प्रसाधनांच्या नियमांचे उघड उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. या प्रॉडक्ट्सच्या पॅकिंगवर उत्पादक कंपनीचे नाव, पत्ता, बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग तारीख आणि एक्स्पायरी तारीख यांसारखी कोणतीही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली नव्हती.
या कारवाईपूर्वी काही दिवसांपूर्वीच, केंद्र सरकारने पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर बंदी घातलेली असतानाही ‘गोरी ब्युटी क्रिम’ विकल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चेंबूरमधील एका दुकानदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला होता. आता एफडीएने सर्व किरकोळ, घाऊक व्यापारी आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना या क्रिम्सची विक्री त्वरित थांबवण्याचे तसेच बाजारातील सर्व स्टॉक गोळा करून जवळच्या एफडीए कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
कमिशनर तुकाराम मुंढेंची धडक मोहीम; ४.१२ कोटींचा माल जप्त
निकृष्ट दर्जाची औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांच्या विरोधात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात राज्याभरातील 34 उत्पादन कंपन्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत तब्बल 4.12 कोटी रुपये किमतीची बेकायदेशीर औषधे, वैद्यकीय उत्पादने आणि सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली आहेत. यापैकी 2.86 कोटी रुपयांचा माल थेट जप्त केला असून, 1.26 कोटी रुपयांच्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
जून महिन्यातील कारवाईचा अहवाल:
- ७८७ नमुन्यांची चाचणी: प्रयोगशाळेत औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांच्या 787 सॅम्पल्सची चाचणी घेण्यात आली. यातील 752 नमुने मानकांनुसार योग्य आढळले, तर 35 नमुने निकृष्ट दर्जाचे ठरले.
- या उत्पादनांचा समावेश: फेल झालेल्या नमुन्यांमध्ये सनस्क्रीन, विविध क्रिम्स, शाम्पू, सिरप, गोळ्या, कुंकू आणि इंजेक्शन्सचा समावेश आहे, जे जंतू संसर्ग आणि इतर नियमांच्या कसोटीवर अपयशी ठरले.
- गुन्हे आणि अटक: या धडक मोहिमेदरम्यान एकूण 9 एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे.
नागरिकांनी सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी आणि आरोग्याशी कोणतीही तडजोड करू नये, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.










