SBI Manager Salary: सरकारी बँकेत नोकरी करणाऱ्यांचे आयुष्य अगदी ‘सेट’ असते, असा एक सर्वसामान्य समज समाजात आहे. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एका मॅनेजरचे ‘फॉर्म १६’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल झाल्याने सरकारी बँक अधिकार्यांच्या पगाराबाबत एक नवीन चर्चा सुरू झाली आहे.
व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, संबंधित कर्मचारी ८ वर्षांपूर्वी एसबीआयमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) म्हणून रुजू झाला होता आणि सध्या तो प्रगती करत स्केल ३ मॅनेजर पदावर कार्यरत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या या कर दस्तऐवजात (Form 16) या मॅनेजरचा एकूण वार्षिक पगार तब्बल 35,24,315 रुपये दाखवण्यात आला आहे. हा मोठा आकडा पाहून अनेक नेटकरी थक्क झाले आहेत.
३५ लाखांचा आकडा दिसतो मोठा, पण प्रत्यक्षात ‘टेक होम’ सॅलरी खूपच कमी!
हा पगार शेअर करणाऱ्या युझरने स्पष्ट केले आहे की, फॉर्म १६ मध्ये दिसणारी ही रक्कम कर्मचाऱ्याच्या दर महिन्याला बँक खात्यात येणाऱ्या पगाराचे खरे चित्र दर्शवत नाही:
- एकदाच मिळणारे भत्ते समाविष्ट: या वार्षिक ग्रॉस सॅलरीमध्ये नियमित पगाराव्यतिरिक्त लीव्ह फेअर कन्सेशन (LFC) एनकॅशमेंट आणि लीव्ह एनकॅशमेंट (सुट्ट्यांच्या बदल्यात मिळणारे पैसे) यांसारख्या वन-टाइम भत्त्यांचा समावेश आहे. हे मोठे भत्ते दरवर्षी मिळत नसून दर ४ वर्षांतून फक्त एकदाच मिळतात, ज्यामुळे वार्षिक एकूण आकडा खूप मोठा दिसतो.
- मोठ्या प्रमाणावर कपात: या मॅनेजरच्या पगारातून दरमहा इन्कम टॅक्स, नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मधील योगदान आणि एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड (EPF) ची मोठी रक्कम कापली जाते.
- लोनचे हप्ते: याशिवाय बँक अधिकाऱ्याने घेतलेले होम लोन, कार लोन आणि टू-व्हीलर लोन यांचे मासिक हप्ते (EMI) थेट पगारामधून कापले जातात. यामुळे दरमहा हातात येणारी प्रत्यक्ष रक्कमया ३५ लाखांच्या पॅकेजच्या तुलनेत खूपच कमी असते.
नेटकऱ्यांमध्ये दोन गट; ‘बँक अधिकाऱ्यांच्या सेटल्ड लाईफचा’ केवळ भ्रम?
या व्हायरल पोस्टवर युझर्समध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. एका युझरने लिहिले, “३५ लाख रुपयांचे ग्रॉस पॅकेज ऐकायला नक्कीच छान वाटते, पण ४ वर्षांतून एकदा मिळणारे भत्ते, टॅक्स, पीएफ आणि कर्जाचे हप्ते वजा केल्यावर हातात येणारा पगार खूप कमी असतो. बँक अधिकार्यांचे आयुष्य सुखाचे असते हा केवळ एक भ्रम आहे.”
तर दुसऱ्या एका युझरने यावर वेगळे मत मांडले. त्याच्या मते, “कपात काहीही असो, बँक मॅनेजरचा मूळ पगारच वार्षिक 11 ते 12 लाख रुपये असतो. इतर सरकारी भत्ते पाहता त्यांना वर्षाला खात्रीशीर 25 लाख रुपयांचे पॅकेज मिळते, जे देशातील टॉप 10 टक्के श्रीमंत नोकरदारांच्या यादीत बसण्यासाठी पुरेसे आहे.”
एसबीआयमध्ये १५०० पदांसाठी भरती; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस
पगाराची ही जोरदार चर्चा सुरू असतानाच, एसबीआयने आपल्या व्यावसायिक विस्तारासाठी तब्बल 1,500 नवीन प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) पदांची भरती जाहीर केली आहे.
भरती प्रक्रियेची महत्त्वाची माहिती:
- एकूण जागा: एकूण जागांपैकी 1,446 नियमित जागा आहेत, तर 54 जागा या बॅकलॉग प्रवर्गासाठी आहेत.
- शेवटची तारीख: या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आज, 8 जुलै असून, संपूर्ण प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण केली जाईल.
- पात्रता आणि वय: कोणत्याही शाखेतील पदवीधर (ग्रॅज्युएट) उमेदवार या पदासाठी पात्र आहेत. 1 एप्रिल 2026 पर्यंत उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे असणे आवश्यक आहे.










