Normal vs Premium Petrol: बहुतांश वाहन चालक जेव्हा पेट्रोल पंपावर जातात, तेव्हा त्यांच्यासमोर ‘नॉर्मल पेट्रोल’ आणि ‘स्पीड, पॉवर किंवा एक्सपी९५’ या नावांनी मिळणारे ‘प्रीमियम पेट्रोल’ असे दोन पर्याय असतात. अनेकदा आपण असा विचार करतो की महागडे पेट्रोल भरल्याने गाडीला एक्स्ट्रा ताकत मिळेल किंवा मायलेज वाढेल.
परंतु, स्वतःच्या खिशाला जादा चाट लावण्यापूर्वी प्रत्येक वाहन चालकाने आपल्या गाडीच्या चावीसोबत मिळणारी ‘मार्गदर्शिका’ (युझर मॅन्युअल) तपासणे अत्यंत आवश्यक आहे. जर त्या मॅन्युअलमध्ये ९५ ऑक्टेन असा स्पष्ट उल्लेख असेल, तरच प्रीमियम पेट्रोलचा पर्याय निवडावा. अन्यथा, तुमच्या नेहमीच्या गाडीसाठी नॉर्मल पेट्रोलच सर्वात सर्वोत्तम आणि किफायतशीर पर्याय आहे.
महागड्या स्पोर्ट्स कार आणि सुपरबाईक्ससाठी प्रीमियम इंधन का सक्तीचे?
गाड्यांच्या इंजिनची रचना वेगवेगळ्या इंधनानुसार केलेली असते. म्हणूनच प्रीमियम पेट्रोल सर्वांसाठीच उपयुक्त ठरत नाही:
- टर्बोचार्ज्ड इंजिनची गरज: जर तुमच्याकडे एखादी अतिशय महागडी स्पोर्ट्स कार, कंप्रेसर किंवा टर्बोचार्जर इंजिन असलेली अत्याधुनिक गाडी किंवा हाय-स्पीड सुपरबाईक असेल, तर तिच्यासाठी प्रीमियम पेट्रोल अत्यंत आवश्यक आहे.
- सामान्य गाड्यांना फायदा नाही: तुम्ही जर दैनंदिन वापरासाठी सामान्य कार किंवा १०० ते १५० सीसी क्षमतेची नेहमीची बाईक चालवत असाल, तर तुम्हाला प्रीमियम पेट्रोलची अजिबात गरज नाही. या गाड्यांचे इंजिन कमी ऑक्टेनवरच सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी बनवलेले असते. यात महागडे इंधन टाकून मायलेज किंवा ताकत वाढत नाही.
इंजिनची अंतर्गत स्वच्छता आणि ‘नॉकिंग’चा काय आहे संबंध?
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोलमध्ये तांत्रिक दृष्ट्या सर्वात मोठा फरक ‘ऑक्टेन रेटिंग’चा असतो. नेहमीच्या पेट्रोलचे ऑक्टेन रेटिंग ९१ असते, तर प्रीमियम पेट्रोलचे ९५ किंवा त्याहून अधिक असते. या ऑक्टेन रेटिंगचा थेट परिणाम इंजिनच्या आयुष्यावर होतो:
- वेळेआधी होणारा ब्लास्ट रोखणे: कमी ऑक्टेनचे इंधन इंजिनच्या सिलिंडरमध्ये ठराविक वेळेआधीच जळते. यामुळे इंजिनमधून खट-खट असा आवाज येतो, ज्याला ‘नॉकिंग’ म्हणतात. हाय-ऑक्टेन पेट्रोल हा वेळेआधी होणारा स्फोट रोखते.
- मेंटेनन्सचा खर्च कमी: नॉकिंग थांबल्यामुळे इंजिनच्या पिस्टन आणि इतर अंतर्गत भागांवर कोणताही अतिरिक्त ताण पडत नाही. यामुळे इंजिनचे आयुष्य वाढते आणि दुरुस्तीचा खर्च आपोआप कमी होतो.
- कार्बन जमा न होणे: प्रीमियम पेट्रोलमध्ये काही विशेष केमिकल्सचे मिश्रण असते, जे इंजिनच्या आत अजिबात कार्बन किंवा कचरा जमा होऊ देत नाहीत, ज्यामुळे इंजिन आतून पूर्णपणे स्वच्छ राहते.
थोडक्यात सांगायचे तर, प्रीमियम पेट्रोल हे नक्कीच उत्तम आहे, पण ते फक्त त्याच इंजिनसाठी योग्य आहे ज्याला त्याची खरोखर गरज आहे.










