Home / महाराष्ट्र / Maharashtra Politics : ठाकरेंनंतर आता शरद पवारांना मोठा धक्का बसणार? पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘या’ विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Maharashtra Politics : ठाकरेंनंतर आता शरद पवारांना मोठा धक्का बसणार? पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘या’ विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Maharashtra Politics : काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला...

By: Team Navakal
Maharashtra Politics : ठाकरेंनंतर आता शरद पवारांना मोठा धक्का बसणार? पृथ्वीराज चव्हाणांच्या 'या' विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
Social + WhatsApp CTA

Maharashtra Politics : काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. या ‘ऑपरेशन टायगर’च्या धक्क्यातून विरोधक सावरत नाहीत, तोच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या ऑफरबाबत केलेल्या विधानानंतर आधीच ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा सुरू झाली होती. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांच्या खासदारांबाबत एक मोठा आणि खळबळजनक दावा केल्यामुळे विरोधकांच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

“शरद पवारांच्या पक्षाची अवस्थाही ठाकरेसारखी होणार”; पृथ्वीराज चव्हाणांचे विधान

माध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत परिस्थितीवर थेट बोट ठेवले. त्यांनी व्यक्त केलेली भीती आणि केलेले दावे खालीलप्रमाणे आहेत:

  • ५ ते ६ खासदार अस्वस्थ: शरद पवार यांच्या गटातील जवळपास 5 ते 6 खासदार सध्या पक्षात प्रचंड अस्वस्थ आहेत.
  • मोदी-शाह सरकारचा दबाव: हे खासदार पुढे काय पाऊल उचलणार हे अद्याप स्पष्ट नसले, तरी त्यांच्या मागे मोदी-शाह सरकार हात धुवून लागले आहे. देशात विरोधी पक्षच शिल्लक राहू नये, अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे.
  • इतिहास पुनरावृत्तीची भीती: ज्या पद्धतीने यंत्रणांचा वापर करून उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यात आली, अगदी तशीच परिस्थिती आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही निर्माण केली जाऊ शकते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

खासदार भाजपमध्ये जाणार की शिंदेंच्या शिवसेनेत? चव्हाणांचे स्पष्टीकरण

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यानंतर पत्रकारांनी त्यांना थेट प्रश्न विचारला की, हे अस्वस्थ असलेले खासदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार?

यावर उत्तर देताना चव्हाण यांनी सांगितले की, “ते नेमके कुठे जातील किंवा कोणत्या पक्षात प्रवेश करतील, याबद्दल माझ्याकडे सध्या कोणतीही खात्रीशीर माहिती नाही. मात्र, ते सध्या पक्षात खूश नाहीत आणि ते सोडून जाण्याच्या मनःस्थितीत आहेत, एवढेच मी सांगू शकतो. ते प्रत्यक्ष पक्ष सोडणार की पक्षातच राहणार, हे येणारा काळच ठरवेल; पण राजकीय गोटात त्यांच्या अस्वस्थतेची मोठी चर्चा आहे.” त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत आगामी काळात मोठी पडझड होणार का, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या