Voter Registration Update: देशात नवीन मतदार ओळखपत्र बनवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणूक आयोगाने ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेमध्ये एक मोठा बदल केला आहे. आता पहिल्यांदाच मतदानासाठी अर्ज करणाऱ्या किंवा मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांना त्यांच्या पालकांच्या मतदार यादीतील स्थितीची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
हा नवा नियम केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज करणाऱ्या सर्व नागरिकांना लागू असेल. पहिल्यांदा मतदान करणारे तरुण, नवीन पात्र नागरिक आणि यापूर्वी नाव वगळलेले मतदार ज्या ‘फॉर्म 6’ चा वापर करतात, त्या फॉर्ममध्ये हा बदल प्रशासकीय सूचनांद्वारे समाविष्ट करण्यात आला आहे.
ऑनलाईन फॉर्म ६ मधील बदल; ‘या’ ३ पर्यायांपैकी एक निवडणे बंधनकारक
निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज करताना, जोपर्यंत अर्जदार या नवीन घोषणेची माहिती पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत त्यांचा ऑनलाईन अर्ज पुढे जाणार नाही. पोर्टलवर पार्ट जे आणि पार्ट के यांच्या दरम्यान हा नवीन रकाना जोडण्यात आला असून, त्यामध्ये अर्जदारांना खालील 3 पर्यायांपैकी एकाची निवड करावी लागेल:
- पर्याय १: मागील विशेष सघन पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या मतदार यादीत अर्जदाराचे स्वतःचे नाव होते का?
- पर्याय २: मागील विशेष मोहिमेच्या मतदार यादीत अर्जदाराच्या पालकांचे किंवा आजी-आजोबांचे नाव होते का?
- पर्याय ३: मागील मतदार यादीत अर्जदार किंवा त्यांच्या पालकांपैकी कोणाचेही नाव समाविष्ट नव्हते का?
जर अर्जदाराने पहिल्या दोन पर्यायांपैकी एकाची निवड केली, तर त्याला जुन्या यादीनुसार त्याचा विधानसभा मतदारसंघ, मतदान केंद्र क्रमांक आणि अनुक्रमांक द्यावा लागेल. ही माहिती उपलब्ध नसल्यास तिसरा पर्याय निवडता येईल, मात्र त्याचा अर्जावर काय परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
बिहार पॅटर्न आता देशभर लागू; बोगस मतदानाला बसणार चाप
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रयोग सर्वप्रथम गेल्या वर्षी जून महिन्यात बिहारमधील विशेष पुनरिक्षण मोहिमेदरम्यान राबवण्यात आला होता. तिथला अनुभव यशस्वी झाल्यानंतर आता ज्या ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही विशेष मोहीम राबवली गेली आहे, तिथे हा नियम लागू करण्यात आला आहे.
या नवीन सुविधेमुळे नवीन मतदारांचे मॅपिंग करणे सोपे होणार आहे. तसेच, यामुळे नवीन मतदारांना अर्जासोबत जोडाव्या लागणाऱ्या इतर कागदपत्रांची संख्या देखील कमी होणार आहे. सध्याच्या नियमांनुसार फॉर्म 6 मध्ये कुटुंबातील सदस्यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक देणे आवश्यक होतेच, आता या नव्या नियमाने त्याला अधिकृत स्वरूप दिले आहे.
देशभरात मतदार याद्यांची कडक पडताळणी सुरू
निवडणूक आयोगाकडून सध्या देशभरात मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे, स्थलांतरित झालेले नागरिक, अनुपस्थित मतदार आणि परदेशी नागरिकांची नावे मतदार यादीतून शोधून काढून टाकणे हा आहे.
पश्चिम बंगाल, बिहार, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये ही मोहीम आधीच पूर्ण झाली असून सध्या इतर राज्यांमध्ये हे काम वेगाने सुरू आहे. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर बोगस आणि संशयास्पद नावे वगळण्यात आल्यामुळे, आगामी निवडणुका आणि नवीन अर्जदारांच्या नोंदणीवर याचा मोठा प्रभाव पडणार आहे.











