Puri Rath Yatra : ओडिशा राज्यातील जगप्रसिद्ध पुरी क्षेत्रात आज भगवान जगन्नाथ, त्यांचे ज्येष्ठ बंधू भगवान बलभद्र आणि भगिनी देवी सुभद्रा यांच्या ऐतिहासिक व अत्यंत भव्य रथयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. या अद्भूत आणि भक्तीमय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून तसेच जगभरातून लाखो भाविक पुरीत दाखल झाले आहेत. मात्र, रथयात्रेदरम्यान उसळलेल्या जनसागरामुळे गुरुवारी एक अत्यंत चिंताजनक प्रसंग निर्माण झाला होता. प्रचंड गर्दी आणि उकाड्यामुळे काही भाविक एकाच ठिकाणी अडकले आणि त्यांचा श्वास गुदमरू लागला. या आणीबाणीच्या प्रसंगी ओडिशा अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाने (Odisha Fire and Emergency Services) अत्यंत तत्परता दाखवत किमान ३३ भाविकांची गर्दीतून सुरक्षित सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रथ ओढण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली होती. याच दरम्यान गर्दीचा दाब वाढल्यामुळे काही वृद्ध आणि महिला भाविकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच तैनात असलेल्या आपत्कालीन पथकाने गर्दीत वाट काढत बाधितांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
पुरी रथयात्रेत भाविकांची सुरक्षा चोख; पोलिसांच्या तत्परतेमुळे बेशुद्ध भाविकाला जीवदान, विशेष बचाव पथकाकडून ३३ जणांचे यशस्वी रेस्क्यू-
ओडिशामधील पुरी येथे जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथांच्या भव्य रथयात्रा सोहळ्यादरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा अत्यंत सतर्क असल्याचे पाहायला मिळत आहे. ओडिशा पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘ओडिशा अग्निशमन व आपत्कालीन सेवा’ विभागाच्या विशेष बचाव पथकाने (SRU – Special Rescue Unit) सकाळपासूनच गर्दीच्या ठिकाणी चोख कामगिरी बजावली. रथ ओढण्यासाठी झालेल्या अलोट गर्दीत अडकून श्वसनाचा त्रास झालेल्या ३३ भाविकांना या विशेष पथकाने अत्यंत कौशल्याने सुरक्षित बाहेर काढले.
या मोहिमेदरम्यान बाहेर काढण्यात आलेल्या सर्व भाविकांना वाढत्या उकाड्यामुळे आणि गर्दीतील दाबामुळे श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. बचाव पथकाने कोणतीही वेळ न दवडता या सर्व भाविकांना घटनास्थळीच तातडीने प्रथमोपचार उपलब्ध करून दिले. काहींची प्रकृती चिंताजनक वाटल्यामुळे त्यांना तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्राथमिक उपचारानंतर सर्व भाविकांना पुढील आवश्यक वैद्यकीय देखरेखीसाठी आणि उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या बचाव मोहिमेपूर्वी देखील मुख्य रथ मार्गावर अलोट गर्दीमुळे एक भाविक अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची घटना घडली होती. कर्तव्यावर तैनात असलेल्या ओडिशा पोलिसांच्या जवानांनी ही बाब तत्परतेने हेरली. त्यांनी गर्दीतून वाट काढत त्या बेशुद्ध भाविकाला तातडीने उचलून प्राथमिक वैद्यकीय कक्षात नेले आणि त्यानंतर रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या या संवेदनशील आणि जलद कृतीमुळे त्या भाविकाला वेळेत उपचार मिळणे शक्य झाले.
अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथांची १४९ वी रथयात्रा उत्साहात; गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मंगला आरती, मुख्यमंत्र्यांनी सोन्याच्या झाडूने बुजवला मार्ग-
ओडिशामधील पुरीप्रमाणेच गुजरातच्या अहमदाबाद शहरातही भगवान जगन्नाथांची भव्य आणि पारंपरिक रथयात्रा अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात सुरू झाली आहे. या ऐतिहासिक मिरवणुकीत यंदा सामाजिक संदेश देणारे आणि विविध सांस्कृतिक वारसा दर्शवणारे देखणे चित्ररथ (Tableaux) आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. गेल्या वर्षीच्या अनुभवातून धडा घेत प्रशासनाने यंदा सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली आहे. गेल्या वर्षी रथयात्रेदरम्यान तीन हत्ती अचानक अनियंत्रित झाल्यामुळे मोठी धावपळ उडाली होती. हा धोका टाळण्यासाठी यंदा मिरवणुकीतील हत्तींच्या पायात साखळदंडांचे अतिरिक्त कवच बांधून त्यांना आणण्यात आले होते. हे हत्ती जसे खरिया पोल या संवेदनशील भागात पोहोचले, तसे पोलिसांनी तत्परता दाखवत सुरक्षेच्या कारणास्तव सर्व नागरिकांना रस्त्यावरून बाजूला करून मार्ग पूर्णपणे मोकळा केला.
पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘मंगला आरती’
रथयात्रेच्या पवित्र सोहळ्याची सुरुवात जमालपूर येथील ऐतिहासिक जगन्नाथ मंदिरात पहाटे ४ वाजता भक्तिभावाने करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दरवर्षीप्रमाणे आपली परंपरा कायम राखत कुटुंबासह या पहाटेच्या ‘मंगला आरती’ला विशेष उपस्थिती लावली. त्यांनी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे दर्शन घेऊन देशाच्या समृद्धीसाठी आणि शांततेसाठी प्रार्थना केली. या मुख्य आरतीनंतर मंदिराच्या आवारात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पहिंड विधी’; सोन्याच्या झाडूने स्वच्छ केला मार्ग
आरती संपन्न झाल्यानंतर सकाळी ७ वाजता मुख्य रथयात्रेला अधिकृतपणे प्रारंभ झाला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी जमालपूर मंदिरात पोहोचून रथांचे पूजन केले. गुजरातच्या परंपरेनुसार, मुख्यमंत्र्यांनी भगवान जगन्नाथांच्या रथासमोरील मार्ग सोन्याच्या झाडूने स्वच्छ करून ‘पहिंड विधी’ (Pahind Vidhi) संपन्न केला.









