Eknath Shinde’s Delhi Visit Suddenly Cancelled; Parth Pawar’s Remarks to Fadnavis Spark Buzz – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर काल रात्री नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीसाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला. त्यानंतर पार्थ पवार यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीगाठी होत असतानाच रवि राणा यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे दोन्ही गट विलीन होतील. सुप्रिया सुळे केंद्रात जातील आणि राज्य सुनेत्रा पवारांच्या ताब्यात राहील. पुढील 15 दिवसांत हे घडेल. या एकूणच राजकीय घडामोडींमुळे चर्चेला ऊत आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जयंत पाटील यांना राज्याचे अर्थमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांनी वारंवार ही शक्यता फेटाळली असली तरी वारंवार होणार्या भेटीमुळे ही चर्चा थांबलेली नाही.शरद पवार एनडीएमध्ये सहभागी झाले तर त्यांच्या पक्षाकडे राज्यात अर्थमंत्रिपद जाऊ शकते. जयंत पाटील यांच्याकडे हे खाते जाईल. यासाठी अनेक हालचाली सुरू आहेत. मात्र अजित पवार गटाला अर्थखाते आपल्याकडेच हवे आहे, ही भूमिका पक्षाकडून मांडली जात आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अर्थखात्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे.
त्याआधीच आमदार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. त्यानंतर जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्थखात्याबाबत वेगळी बैठक झाल्याची चर्चा आहे. अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याबाबत एकनाथ शिंदे यांचा विरोध असल्याची चर्चा आहे.
वर्षा बंगल्यावर फडणवीस आणि जयंत पाटील यांची भेट झाली. त्यावेळी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. जयंत पाटील आणि तटकरे यांनी या एकत्र भेटीचा इन्कार केला.
सुप्रिया सुळे यांनीही या भेटीचा इन्कार केला. मात्र या भेटीची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. या भेटीनंतर त्याच दिवशी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीने भेट घेतली. या भेटीत घटक पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठींबाबत समन्वय ठेवण्यावर चर्चा झाली. सुनेत्रा पवार यांना न सांगता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेऊ नये असे फडणवीस यांना सांगण्यात आले. नाराज झालेल्या सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावून जाब विचारला.
या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांबाबत उबाठा खासदार संजय राऊत यांनी नागपुरात मिश्किल भाष्य केले. संजय राऊत म्हणाले की, जर जयंत पाटील हे रामदास आठवले यांना भेटायला गेले, तर ते त्यांच्या पक्षामध्ये जाणार आहेत का? महाराष्ट्रात आणि देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. नेते एकमेकांना भेटत असतात. याचा अर्थ ते त्या पक्षात गेले किंवा त्या पक्षातून बाहेर पडले असा होत नाही. जयंत पाटील असोत किंवा जितेंद्र आव्हाड, हे दोघेही विविध पक्षांच्या नेत्यांशी सातत्याने संवाद साधत असतात. ते फ्री बर्ड आहेत. त्यांना भेटू द्या.
खासदार सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते मिळावे ही आमची मागणी आहे. आमच्या पक्षाचे प्रमुख नेते सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ही मागणी करणार आहोत. जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यामध्ये काही वेगळे राजकारण असेल असे मला वाटत नाही. जयंत पाटील हे मुरब्बी राजकारणी आहेत, ते 7 वेळा विधिमंडळात निवडून आले आहेत, ते वेगवेगळ्या कामांसदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात.
यावर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, वर्षावर बैठक झाली. पण राजकीय माहिती जोपर्यंत जयंत पाटील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देत नाही, तोपर्यंत सत्यता काहीच नाही. शरद पवार एनडीएसोबत चर्चा करत आहेत. आठ दिवसात कळेल. मी पूर्वी केलेले भाकीत खरे ठरले होते. जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल. दिल्लीत काही बदल झाल्यास याचे परिणाम राज्यात
होत आहे.
15 दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी
एकत्र येणार! रवी राणांचा दावा
आगामी संसदीय पावसाळी अधिवेशनामुळे देशातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच महायुतीतील मित्रपक्ष युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष रवी राणा यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. येत्या 15 दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील, असा दावा त्यांनी केला असून, त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. रवी राणा यांनी दावा केला की, राजकारणात जे अशक्य वाटते ते शक्य होते. येत्या 15 दिवसांत सुनेत्रा पवार आणि शरद पवार गट हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. दिल्लीचे राजकारण सुप्रिया सुळे पाहतील, तर राज्यातील राजकारणाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल. केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळेल आणि राज्यातील राजकीय जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळतील.










