Home / arthmitra / Financial Rules Change June 2026: 1 जूनपासून खिशाला बसणार कात्री! क्रेडिट कार्ड, UPI पेमेंट ते टॅक्सचे नियम बदलणार; तुमच्यावर काय होणार परिणाम?

Financial Rules Change June 2026: 1 जूनपासून खिशाला बसणार कात्री! क्रेडिट कार्ड, UPI पेमेंट ते टॅक्सचे नियम बदलणार; तुमच्यावर काय होणार परिणाम?

Financial Rules Change June 2026: जून महिना नोकरदार वर्ग, गुंतवणूकदार आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी अनेक मोठे बदल घेऊन आला आहे....

By: Team Navakal
Financial Rules Change June 2026: 1 जूनपासून खिशाला बसणार कात्री! क्रेडिट कार्ड, UPI पेमेंट ते टॅक्सचे नियम बदलणार; तुमच्यावर काय होणार परिणाम?
Social + WhatsApp CTA

Financial Rules Change June 2026: जून महिना नोकरदार वर्ग, गुंतवणूकदार आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी अनेक मोठे बदल घेऊन आला आहे. या महिन्यातील सर्वात महत्त्वाची तारीख 15 जून ही आहे. ज्या नागरिकांची अंदाजे कर दायित्व (टॅक्स लायबिलिटी) 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना आर्थिक वर्ष 2026-27 साठी ॲडव्हान्स टॅक्सचा पहिला हप्ता जमा करावा लागेल.

नियमनूसार, एकूण अंदाजित कराच्या 15 टक्के रक्कम पहिल्या हप्त्यात भरणे आवश्यक आहे. यामध्ये उशीर झाल्यास दरमहा 1 टक्का व्याज मोजावे लागू शकते. विशेष म्हणजे, नवीन आयकर कायदा 2025 आणि आयकर नियम 2026 अंतर्गत पूर्णपणे लागू होणारा हा पहिलाच ॲडव्हान्स टॅक्स असेल.

Financial Rules Change June 2026: जुनी कर रचना निवडणाऱ्यांना मोठा दिलासा

जर तुम्ही आयकरासाठी जुनी कर रचना (ओल्ड टॅक्स रिजीम) निवडली असेल, तर तुमच्यासाठी काही अतिशय दिलासादायक बदल करण्यात आले आहेत:

  • शैक्षणिक भत्ता वाढवला: मुलांच्या शिक्षण भत्त्यावर (चाइल्ड एज्युकेशन अलाउन्स) मिळणारी सूट आता दरमहा केवळ 100 रुपयांवरून थेट 3,000 रुपये प्रति मूल करण्यात आली आहे.
  • हॉस्टेल अलाउन्समध्ये मोठी वाढ: हॉस्टेल अलाउन्सची टॅक्स सूट मर्यादा आता वाढवून दरमहा 9,000 रुपये करण्यात आली आहे.
  • HRA मध्ये बंपर सवलत: पुणे, बेंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या शहरांचा आता 50 टक्के एचआरए सूट श्रेणीत समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे कर बचत वाढेल.

Financial Rules Change June 2026: क्रेडिट कार्ड आणि बँकिंग सेवा महागणार

वेगवेगळ्या बँकांनी आपल्या नियमांमध्ये आणि शुल्कांमध्ये बदल केल्यामुळे जून महिन्यापासून तुमच्या खिशावरील भार वाढू शकतो:

  • आयसीआयसीआय बँक (ICICI Bank): 18 जूनपासून ॲमेझॉन पे क्रेडिट कार्डद्वारे घराचे भाडे भरल्यास मिळणारा 1 टक्का रिवॉर्ड पॉइंटचा फायदा पूर्णपणे बंद केला जात आहे.
  • कोटक महिंद्रा बँक (Kotak Bank): वीज-पाणी बिल, पेट्रोल-डीझेल, विमा प्रीमियम आणि भाडे भरण्यावर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच क्रेडिट कार्डने भाडे किंवा शैक्षणिक फी भरल्यास 1 टक्का अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.
  • बँक ऑफ बडोदा (BoB): जर तुम्ही या बँकेचे वन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर 23 जूनपासून थकीत रकमेवरील व्याजदर दरमहा 3.49 टक्क्यांवरून वाढून 3.75 टक्के होणार आहे.
  • एचडीएफसी बँक (HDFC Bank): 25 जूनपासून लहान व्यवहारांचे एसएमएस अलर्ट बंद होणार आहेत. आता केवळ 100 रुपयांपेक्षा जास्तच्या यूपीआय पेमेंटवर आणि 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम खात्यात जमा झाल्यावरच मेसेज येईल. मात्र, ईमेलवर सर्व माहिती मोफत मिळत राहील.

Financial Rules Change June 2026: UPI पेमेंट अधिक सुरक्षित; आर्थिक फसवणूक थांबणार

डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना ऑनलाईन स्कॅम आणि फ्रॉडपासून वाचवण्यासाठी एनपीसीआय (NPCI) नवीन सुरक्षा फिचर आणत आहे. आता तुम्ही कोणत्याही दुकानात क्यूआर कोड स्कॅन कराल किंवा मोबाईल नंबरवर पैसे पाठवाल, तेव्हा स्क्रीनवर त्या व्यक्तीचे तेच वेरिफाइड नाव दिसेल जे त्याच्या बँक खात्यात नोंदणीकृत आहे. यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जाणे थांबेल. यासोबतच, ईपीएफओ (EPFO) देखील यूपीआयद्वारे पीएफचे पैसे त्वरित ट्रान्सफर करण्याच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे.

Financial Rules Change June 2026: शेअर बाजार आणि सोलर पॅनेलच्या नियमांमध्ये बदल

शेअर बाजारात फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) मध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सेबीचा (SEBI) 50:50 मार्जिन नियम पूर्णपणे लागू झाला आहे. आता ट्रेडर्सना त्यांच्या एकूण ट्रेडिंग मार्जिनचा किमान 50 टक्के हिस्सा रोख स्वरूपात किंवा रोखीच्या समतुल्य मालमत्तेत ठेवावा लागेल. केवळ पोर्टफोलिओमधील शेअर्स गहाण ठेवून पूर्ण मार्जिन घेता येणार नाही.

दुसरीकडे, जर तुम्ही घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्याचा विचार करत असाल, तर सरकारने एएलएमएम (ALMM) नियम अनिवार्य केला आहे. सरकारी सबसिडी किंवा नेट मीटरिंगचा लाभ घेण्यासाठी आता फक्त मंजूर यादीतील (अप्रूव्ड लिस्ट) भारतीय बनावटीच्या सोलर मॉड्यूल्सचाच वापर करावा लागेल. यामुळे स्थानिक कंपन्यांना फायदा होईल, परंतु ग्राहकांसाठी सोलर पॅनेल बसवण्याचा सुरुवातीचा खर्च थोडा वाढू शकतो.

हे देखील वाचा – Abhishek Banerjee Attacked: “शासकच बनले मारेकरी!”; पुतण्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ममता बॅनर्जींचा भाजप सरकारवर हल्लाबोल

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या