Vaibhav Sooryavanshi India Debut: भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, ते नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी! अवघ्या 15 वर्षांचा हा युवा फलंदाज लवकरच टीम इंडियाच्या निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरताना दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी आशियाई खेळांसाठी (Asian Games) भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे (IOA) सोपवलेल्या 30 संभाव्य खेळाडूंच्या यादीत वैभव सूर्यवंशीला स्थान देऊन सर्वांनाच चकित केले आहे.
हे आशियाई खेळ 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत आयची-नागोया येथे होणार आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारताच्या मुख्य संघातील अनेक बड्या खेळाडूंची नावे वगळण्यात आली असली, तरी निवडकर्त्यांनी वैभवच्या गुणवत्तेवर मोठा विश्वास दाखवला आहे.
टीम इंडियाची जर्सी मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू ठरणार?
वैभव सूर्यवंशीने देशांतर्गत क्रिकेट आणि वयोगटातील क्रिकेट स्पर्धांमध्ये आपल्या फलंदाजीने धावांचा पाऊस पाडला आहे. अत्यंत लहान वयात त्याची थेट आशियाई खेळांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या संभाव्य संघात निवड झाल्यामुळे, तो भारतीय जर्सी परिधान करून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.
त्याची ही निवड केवळ त्याचा वैयक्तिक टॅलेंट दर्शवणारी नसून, भारतीय क्रिकेटच्या भविष्याची नवीन पहाट मानली जात आहे. जर तो अंतिम 15 खेळाडूंच्या मुख्य संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला, तर भारताकडून खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक ठरेल.
दोन वेगवेगळ्या संघांमुळे वैभवला मिळाली सुवर्णसंधी
सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आशियाई खेळ सुरू असतानाच भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध घरगुती मर्यादित षटकांची मालिका देखील खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिका एकाच वेळी येत असल्याने बीसीसीआयला दोन वेगळे टी-20 संघ तयार करावे लागत आहेत.
मुख्य खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत व्यस्त असणार असल्यामुळे, आशियाई खेळांसाठी युवा आणि गुणवान खेळाडूंचा पूल तयार करण्यात आला आहे. याच रणनीतीचा मोठा फायदा वैभव सूर्यवंशीला झाला असून त्याच्यासाठी टीम इंडियाच्या जर्सीचे दरवाजे उघडले आहेत.
कर्णधारपदासाठी तीन दावेदार; युवा वैभव सूर्यवंशीला लॉटरी
सूर्या आणि गिल यांच्या अनुपस्थितीत आशियाई खेळांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या शर्यतीत श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या तीन खेळाडूंची नावे आघाडीवर आहेत.
या यादीतील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा या 30 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याच्या कामगिरीची दखल घेत निवडकर्त्यांनी त्याला ही मोठी संधी दिली आहे. दुसरीकडे, गेल्या आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारा कर्णधार ऋतुराज गायकवाड फॉर्ममध्ये नसतानाही या यादीत आपले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.
गोलंदाजीची धुरा कोणाच्या खांद्यावर?
संभाव्य खेळाडूंच्या यादीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे नाव समाविष्ट आहे, परंतु 2027 च्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने त्याला वन-डे मालिकेत प्राधान्य दिले जाऊ शकते. त्याशिवाय दुखापतीतून सावरणारा हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांचा वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात समावेश आहे.
फिरकीपटूंमध्ये कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्ष दुबे या चौघांना स्थान मिळाले आहे. मात्र, यापैकी केवळ दोनच खेळाडू आशियाई खेळांसाठी निवडले जातील आणि उर्वरित दोन खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसतील.
आशियाई खेळांसाठी भारताची ३० सदस्यीय संभाव्य यादी:
यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, आयुष बदोनी, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, रवी बिश्नोई, शाहबाज अहमद, शिवम दुबे, विप्रज निगम, हर्षित राणा, यश ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर.
हे देखील वाचा – Abhishek Banerjee Attacked: “शासकच बनले मारेकरी!”; पुतण्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ममता बॅनर्जींचा भाजप सरकारवर हल्लाबोल










