तेहरान – अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून धुमसत असलेले आखाती युद्ध संपण्याच्या दृष्टीने आता निर्णायक घडामोडी घडत आहेत. गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चांमधून दोन्ही देश शांतता करार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत, असे वृत्त आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितले की, इराणसोबतचा शांतता कराराच्या बहुतांशी वाटाघाटी निश्चित झाल्या आहेत. औपचारिक घोषणेपूर्वी कराराच्या अंतिम तपशिलावर चर्चा सुरू आहे. भारताच्या दौर्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनीही काही तासांत चांगली बातमी ऐकायला मिळेल, असे वक्तव्य केल्याने अमेरिका-इराण कराराला दुजोरा मिळाला आहे.इराण आणि अमेरिकेची चर्चा यापूर्वी अनेकदा फिस्कटली होती. दोन्ही देशांनी एकदाही समोरासमोर बसून बोलणी केली नाही. दोन्ही देश सामंजस्याची भूमिका घ्यायला तयार नसल्याने वाटाघाटी होत नव्हत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय दबाव आणि बदलत्या परिस्थितीत पाकिस्तानसारख्या मध्यस्थामार्फत ही चर्चा सुरू होती. तिला आता यश मिळताना दिसत आहे. करारानुसार इराणने आपला अत्यंत समृद्ध युरेनियमचा साठा सोडण्यास तत्त्वतः सहमती दर्शवली आहे, असे सांगितले जात आहे. सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी यापूर्वी हा युरेनियम साठा देशाबाहेर पाठवण्यात येणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे ही सहमती एक मोठा बदल मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनुसार, इराणकडे सुमारे 400 किलो इतका 60 टक्के शुद्धतेपर्यंत समृद्ध युरेनियमचा साठा आहे. तो शस्त्रनिर्मितीच्या जवळच्या स्तरावर मानला जातो. हा मुद्दा आतापर्यंत चर्चेतील सर्वात मोठा अडथळा होता. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चांमध्ये सुरुवातीला किमान तत्त्वतः सहमती आवश्यक असल्याचे अमेरिकेचे मत होते. आता पुढील 30 ते 60 दिवसांत इराणच्या युरेनियम साठ्याच्या व्यवस्थापनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, हा साठा नष्ट करायचा, कमी करायचा की, देशाबाहेर हस्तांतरित करायचा, याबाबत अद्याप अंतिम स्पष्टता नाही. मात्र इराणने वाटाघाटींमध्ये समृद्ध युरेनियमचा विषय असल्याचा इन्कार केला.अमेरिका आणि इराण होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास सहमत झाल्याचे सांगितले जात आहे. होर्मुजची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल व्यापार मार्गांपैकी एक मानली जाते. जागतिक तेल वाहतुकीपैकी 20 टक्के तेल वाहतूक या मार्गाने होते. युद्धामुळे ती बंद झाल्याने जागतिक तेल बाजारपेठ आणि पुरवठा साखळीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक देशांनी ती खुली करण्याचे आवाहन अमेरिका आणि इराणला केले होते. परंतु याबाबतीत दोन्ही देशांनी ताठर भूमिका घेतल्याने गेले 12 आठवडे होर्मुजमधून तेलवाहतूक जवळजवळ ठप्प झाली होती. आता दोन्ही देशांत करार झाल्यास ही सामुद्रधुनी टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल. ट्रम्प यांनी संभाव्य कराराचे वर्णन ‘शांततेशी संबंधित सामंजस्य करार’ असे केले आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ वरीलआपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिका, इराण आणि इतर विविध देशांमध्ये करार अंतिम करण्याच्या अधीन राहून मोठ्या प्रमाणात वाटाघाटी झाल्या आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बिबी नेतान्याहू यांच्याशी माझा दूरध्वनीवरून संवाद झाला, जो देखील खूप चांगला झाला. कराराच्या अंतिम बाबी आणि तपशिलांवर सध्या चर्चा सुरू असून, ते लवकरच जाहीर केला जाईल. तर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई म्हणाले की, या टप्प्यावर लादलेले युद्ध संपवण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. सर्वप्रथम 14 कलमे असलेल्या सामंजस्य करारावर सहमती होण्याचा मुद्दा आहे. ज्या मुद्यांवर चर्चा होत आहे, ते (लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील) युद्ध संपवण्यावर केंद्रित आहेत. अमेरिकेचे सागरी हल्ले, नौदल नाकेबंदी थांबवणे आणि इराणची गोठवलेली मालमत्ता सोडण्याशी संबंधित इतर मुद्दे हे प्रमुख विषयांपैकी आहेत. प्रस्तावित सामंजस्याचा भाग म्हणून होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यात येईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. परंतु इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावत म्हटले की, तेहरान होर्मुजवर आपले नियंत्रण कायम ठेवेल. इराणने केवळ ये-जा करणार्या जहाजांची संख्या युद्धापूर्वीच्या पातळीवर परत आणण्यास परवानगी देण्याचे मान्य केले आहे. परंतु याचा अर्थ युद्धापूर्वी अस्तित्वात असलेल्या मुक्त वाहतूक पुन्हा सुरू करणे असा अजिबात नाही.
ट्रम्प यांची गूढ पोस्ट
अमेरिका-इराणमध्ये करार अंतिम टप्प्यात आहे, असे सांगणार्या ट्रम्प यांनी संध्याकाळी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने सगळेच चक्रावून गेले. ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये Adios (एडिओस) हा शब्द लिहून लिहून एक एआय-जनरेटेड छायाचित्र शेअर केले आहे. या चित्रात अमेरिकन विमानांद्वारे हवाई हल्ले होताना दाखवले आहेत. या चित्रात इराणचा झेंडाही दिसत आहे. या पोस्टचा राजनैतिक अर्थ काय, यावरून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मूळ स्पॅनिश शब्द असलेल्या Adiosचा अर्थ निरोप घेणे असा होतो. तो अनौपचारिक आणि सहजपणे निरोप घेण्यासाठीही वापरला जातो.










